Stock Market Update Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार आज सुस्थितीत आला आहे. अनेक दिवस नुकसान सहन करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज मोठा नफा कमावला. कारण, आज (१८ मार्च) सेन्सेक्सने उसळी घेतली. ९०० अंकांच्या उडीसह सेन्सेक्स ७५,००० अंकांच्या पुढे गेला. सकाळी बाजार उघडल्यानंतर काही वेळ धिम्या गतीने पुढे सरकणाऱ्या सेन्सेक्सने अचानक मोठी उसळी घेतली. सकाळी साडेदहा वाजता सेन्सेक्स ७५,००० अंकांच्या पुढे व्यवहार करत होता. तर निफ्टी २५२ अंकांनी म्हणजेच १.४ टक्क्यांनी वाढून २२,७६३ वर थांबला. सेन्सेक्स १.२ टक्के म्हणजेच ८९४ अंकांनी वधारला असून ७५,०५६ वर व्यवहार करत होता. सेन्सेक्स संध्याकाळी ७५,०५० वर थांबला. बँक निफ्टी ६५५ अंकांनी म्हणजेच १.३६ टक्क्यांनी वाढून ४९,०१२ पर्यंत गेला आणि ४९,००२ वर थांबला.

आज बाजार सुस्थितीत दिसत असला तरी हीच स्थिती पुढेही राहील असं सांगता येत नाही. कारण अमेरेकेने अनेक देशांवर आयात शुल्क लावल्यामुळे, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीच्या निर्णय आणि इतर भू-राजकीय कारणांमुळे अजूनही जोखीम तशीच आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत बाजारात काय घडेल याचा अंदाज वर्तवणं अवघड ठरेल.

आयसीआयसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, झोमॅटो व टाटा मोटर्सच्या समभागांमध्ये वाढ

दरम्यान, सेन्सेक्स वधारल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला आहे. आयसीआयसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, झोमॅटो व टाटा मोटर्सच्या समभागांमध्ये मोठी वाढ दिसली. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ४.०३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

मुंबई शेअर बाजारात उद्या आणि परवा काय घडेल हे अमेरिकेतील आर्थिक घडामोडींवर अवलंबून असणार आहे. उद्या यूएस फेडरल रिझर्व्हचे निर्णय जाहीर होणार आहेत. सर्व प्रकारचे व्याजदर कायम राहतील असं आर्थतज्ज्ञांना वाटतं. मात्र गुंतवणूकदारांना व्याजदर कपातीची अपेक्षा आहे. सर्व गुंतवणूकदार व्याजदर कपात/वाढ व चलनवाढीच्या सर्व आर्थिक अंदाजांवर आणि उद्या होणाऱ्या निर्णयांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

चीनमधील बाजाराचा प्रभाव

चीनमध्ये उद्योजकांना मदत निधी मिळण्याची अपेक्षा आहे. तिथल्या जिनपिंग सरकारने अपेक्षित निधी जाहीर केल्यास त्याचा स्टीलसह अनेक क्षेत्रातील कंपन्यांवर चांगला परिणाम दिसू लागेल. तत्पूर्वी १८ मार्च रोजी पोलाद कंपन्यांच्या समभागात वाढ झाली आहे. तसेच बहुतांश आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली.

रुपयाची मजबुती

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची पडझड चालू होती ती देखील अलीकडेच थांबली आहे. १८ मार्च रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत मजबुतीने उभा राहिला. चार पैशांनी रुपयाचं मूल्य वाढल्याचा शेअर बाजारावर हलका प्रभाव दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सध्या ८६.७६ रुपये इतकी स्थिर आहे. रुपयाच्या मजबुतीमुळे आयातीवरील खर्च कमी होईल. याचा अनेक क्षेत्रांमधील कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे.

हाँगकाँगच्या शेअर बाजार तीन वर्षांमधील उच्चांकावर

हाँगकाँग शेअर बाजाराने देखील आज मोठी उसळी घेतली. तीन वर्षांतील सर्वोच्च आकडेवारी आज पाहायला मिळाली. त्याचाही मुंबई शेअर बाजारावर अनुकूल परिणाम झाला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर

अमेरिकेच्या टॅरिफबाबतची अनिश्चितता, युक्रेनकडून युद्धबंदीसाठी चर्चेस पुढाकार, मध्य पूर्वेत कोणतीही मोठी भू-राजकीय उलथापालथ न होणे आणि तेलाचा पुरवठा सुरळीत राहिल्याने कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. याचाही बाजारावर चांगला परिणाम दिसला.

Story img Loader