Share Market Today’s Update : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजार आता रुळावर येताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात ३०७७ अंकांनी वधारल्यानंतर शेअर बाजाराने या आठवड्यातही चांगली सुरुवात केली आहे. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने मोठी उडी घेतली आहे. ज्यामुळे बाजारात सर्वत्र हिरवे कंदील दिसत आहेत. आज (२४ मार्च) बाजार उघडताना ५०० अंकांनी वधारला होता. त्यानंतर दुपारपर्यंत सेन्सेक्सने १,२०० अंकांची उसळी घेतली आहे. सध्या सेन्सेक्स ७८,१०८ अंकांवर व्यवहार करत आहे. सकाळी ११ वाजता सेन्सेक्सने ७७,९०० चा टप्पा पार केला. तर, दुपारी दोननंतर सेन्सेक्सने ७८,००० अंकांचा टप्पा ओलांडला.
दुसऱ्या बाजूला निफ्टीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. सकाळी निफ्टीने ३०० अंकांची उसळी घेतली असून आता निफ्टी २३,७०० अंकांवर व्यवहार करत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील दर ३० पैकी २५ शेअर्स (समभाग) तेजीत दिसत आहेत. प्रामुख्याने बँकिंग, रिअल इस्टेट, मेटल व मीडिया शेअर्स वधारले आहेत. कोटक बँक, एनटीबीटी, सरकारी बँका, मेटल इंडेक्समध्ये ३ टक्क्यांची वाढ दिसत आहे.
परदेशी गुंतवणूकदारांच्या एंट्रीने चित्र बदलण्यास सुरुवात
मुंबई शेअर बाजारात गेल्या आठवड्यातील वाढीचा ट्रेंड सोमवारीही कायम राहिला. सलग सहाव्या सत्रात व्यवसायात तेजी पाहायला मिळाली. या काळात बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारलेले पाहायला मिळआली. परदेशी गुंतवणूकदारही भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. भारतीय शेअर्सना आता चांगले दिवस येत असल्याचं चित्र दिसत आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफपीआयने रोख बाजारातीस ७,५०० कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत. गेल्या चार महिन्यातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्याचा शेअर बाजारावर अनुकूल परिणाम झाला आहे.
दुसऱ्या बाजूला, टाटा मोटर्स, इन्फोसिस सारख्या उत्तम फंडामेंटल असलेले शेअर घसरल्याने लोकांनी या शेअर्सच्या खरेदीवर भर दिला आहे. यासह आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ६.२ टक्क्यांच्या दराने वाढत आहे. किरकोळ बाजारातील महागाई ३.६१ टक्के राहिली आहे. तर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जानेवारी महिन्यात ५ टक्के वाढलं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरत होती. ही घसरण आता थांबली असून रुपया वधारू लागला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे वळले आहेत.