Stock Market Updates Today : मागील ५ महिन्यांपासून सातत्याने भारतीय शेअर बाजारात घसरण चालू होती. टाटा, रिलायन्स व इन्फोसिस सारख्या तगड्या कंपन्यांना देखील या स्थितीचा फटका बसला आणि त्यांच्या शेअर्सची घसरण झाली. बाजाराची गंभीर स्थिती पाहून अनेक गुंतवणूकदारांनी माघार घेतली. मात्र जे गुंतवणूकदार आपले पाय रोवून उभे राहिले त्यांना आता त्यांच्या संयमाची फळं मिळू लागली आहेत. कारण गेल्या आठवड्यात बाजार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. तर आता बाजार सुस्थितीत दिसू लागला आहे.
अनेक दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजार आता रुळावर आला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेअर बाजार गेल्या आठवड्यात ३,०७७ अंकांनी वधारल्यानंतर या आठवड्यातही चांगली सुरुवात झाली आहे. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने मोठी उडी घेतली. ज्यामुळे बाजारात सर्वत्र हिरवे झेंडे दिसत आहेत. सोमवारी (२४ मार्च) बाजार उघडताना ५०० अंकांनी वधारला होता. त्यानंतर दुपारपर्यंत सेन्सेक्सने १,२०० अंकांची उसळी घेतली आहे. सध्या सेन्सेक्स ७८,१०८ अंकांवर व्यवहार करत आहे. सकाळी ११ वाजता सेन्सेक्सने ७७,९०० चा टप्पा पार केला. तर, दुपारी दोननंतर सेन्सेक्सने ७८,००० अंकांचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना आणखी चांगली आकडेवारी दिसू शकते.
सेन्सेक्ससह निफ्टीतही मोठी वाढ झालेली दिसत आहे. सकाळी निफ्टीने ३०० अंकांची उसळी घेतली असून आता निफ्टी २३,७०० अंकांवर व्यवहार करत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील दर ३० पैकी २५ शेअर्स (समभाग) तेजीत दिसत आहेत. प्रामुख्याने बँकिंग, रिअल इस्टेट, मेटल व मीडिया शेअर्स वधारले आहेत. कोटक बँक, एनटीबीटी, सरकारी बँका, मेटल इंडेक्समध्ये ३ टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
‘हे’ १० शेअर्स चमकले
शेअर बाजारात आज ८० टक्क्यांहून अधिक शेअर्सने भरारी घेतली आहे. दिवसभरात सर्वाधिक धावणाऱ्या शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास रिलायन्सचा व कोटक बँकेचा वरचष्मा पाहायला मिळाला. लार्जकॅप श्रेणीतील एटीपीसी शेअर ४.५० टक्क्यांनी वधारला. पाठोपाठ कोटक बँक (४.४४ टक्के), रिलायन्स (२.१० टक्के), अॅक्सिस बँक (२ टक्के), एचडीएफसी बँकेचे (१.७० टक्के) शेअर्स तेजीसह ट्रेड करत आहेत.
तर, मिडकॅप श्रेणीबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये आयजीएल शेअर (३.४६ टक्के), आयआरईडीए (३.२९ टक्के), आरव्हीएनएल शेअर (३ टक्के) तेजीत व्यवहार करत आहेत. स्मॉलकॅप शेअर्समध्ये रेलटेल हा तब्बल ८.८३ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. यासह झेनटेक ८.६५ टक्के तेजीसह व्यवहार करत आहे.