डॉ. आशीष थत्ते
(भाग पहिला)
हा कुठला खेळ नसून, तुम्ही-आम्ही जे रोज काम करतो ते म्हणजेच ‘गेम थेअरी’ आणि याचा मूळ गाभा म्हणजे आपण जे काही करतो ते कोणत्या तरी उद्देशाने करत असतो. धोरणात्मक विचार करून जर प्रत्येक जण काही तरी करत असेल तर निश्चित ‘गेम थेअरी’ त्याला लागू पडेल. कुठल्याही गोष्टीचा परिणाम हा त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांच्या क्रिया (ॲक्शन) आणि निवड (चॉइस) यावर अवलंबून असतो. प्रत्येकाचे उद्दिष्ट काही तरी मिळवण्याचे असते. एखाद्या खेळाडूचा फायदा हा दुसऱ्याने निवडलेल्या धोरणावरदेखील अवलंबून असतो. ‘गेम थेअरी’ बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. उदा. उद्योग, युद्ध, अर्थशास्त्र, राजकारण, मानसशास्त्र इत्यादी. ‘गेम थेअरी’चा उगम मागील शतकातील असला तरीही तसा याचा अभ्यास बाल्यावस्थेतलाच आहे. आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये ‘गेम थेअरी’चा पुरेपूर वापर केला जातो कदाचित कळत किंवा नकळतसुद्धा.
उद्योगातील कित्येक निर्णय हे ‘गेम थेअरी’ने प्रेरित असतात. प्रत्येक उद्योग हा अंतर्गत आणि बाह्य गोष्टींशी लढत असतो. जसे की, आपल्या उत्पादनाची किंमत काय ठेवावी? कोणते उत्पादन कधी सुरू आणि बंद करावे जेणेकरून स्पर्धेत टिकून राहता येईल. विशेषतः जेव्हा स्पर्धा अतिशय चढाओढीची असते. तसेच बाह्य स्पर्धा कदाचित कमी आहे पण कुठला कर्मचारी कुठे काम करेल? आणि किती पगार घेऊन करेल? हे देखील ठरवण्याची स्पर्धाच असते. ज्यांना दोन्ही करायचे आहे त्यांना स्पर्धेत टिकून राहणे अतिशय कठीण असते. म्हणजे बांधकाम करणारी कंपनी मजुरांना अधिक पगार देऊन लवकर इमारत बांधा असे सांगते, मात्र मजूर आपल्या सुरक्षेला प्राधान्य आणि महत्त्व देतात. म्हणजे बांधकाम व्यावसायिकाला आणि मजुरालादेखील तिथेही एक निवड करावी लागते.
ही एक थेअरी असल्यामुळे याची रचना सैद्धांतिक (स्ट्रॅटेजिक) असते. पण तरीही संशोधकांनी याचे बरेच अनुप्रयोग शोधून काढले आहेत. प्राध्यापक जॉन नॅश हे त्यातले अग्रणी होते. ते १९९४ चे नोबेल पुरस्कार विजेते असून त्यांनी ‘नॅश समतोल’ शोधून काढला. प्राध्यापक जॉन नॅश असे एकमेव व्यक्ती असावेत ज्यांना नोबेल पुरस्कार आणि त्यांच्या जीवनावरील ‘ए ब्यूटिफुल माइंड’ नावाच्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला असेल. ‘गेम थेअरी’ समजून घ्यायची असेल तर त्यामधील काही दृश्ये निश्चित चांगली आहेत. २०१५ साली त्यांचे ‘सीट बेल्ट’ न लावल्यामुळे ८६ व्या वर्षी अमेरिकेत अपघाती निधन झाले. पुढील भागांत दैनंदिन जीवनातील ‘गेम थेअरी’ने प्रेरित झालेली काही उदाहरणे बघू. तुमच्याकडे जर काही उदाहरणे असतील तर जरूर पाठवा.
(लेखक कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत)
ashishpthatte@gmail.com
Twitter : @AshishThatte