Anand Mahindra On Tesla vs Mahindra: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांनी एलॉन मस्क यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर टेस्लाने भारतातील दिल्ली, मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये नोकऱ्यांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नोकरी भरतीच्या घोषणेसह, हे स्पष्ट झाले आहे की, टेस्ला लवकरच भारतात दाखल होणार आहे.
दरम्यान, टेस्ला भारतात आल्यानंतर, येथील ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या टेस्लाशी कशी स्पर्धा करतील याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात आता ‘एक्स’वर एका युजरने महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना, ‘टेस्ला’ भारतात आल्यावर तुमचं काय होणार? असा प्रश्न विचारला. ज्यावर आनंद महिंद्रा यांनी दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या युजरने त्याच्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांना टॅग केले आणि लिहिले, “जर प्रिय एलॉन मस्क यांनी त्यांची टेस्ला कार भारतात आणली, तर तुम्ही त्यांच्याशी कशी स्पर्धा कराल? तुम्ही तयार आहात का साहेब?.” युजरच्या या प्रश्नाचे उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “१९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वांसाठी खुली झाल्यापासून, आम्हाला असेच प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही टाटा, मारुती आणि सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांशी कशी स्पर्धा कराल? पण आम्ही अजूनही इथेच आहोत. आणि शतकानंतरही जिवंत आणि प्रासंगिक राहण्यासाठी वेड्यासारखे काम करत आहोत. तुमच्या प्रोत्साहनाने, आम्ही असेच काम करत राहू.”
दरम्यान, टेस्ला कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा विचार करत होती, परंतु अतिरिक्त आयात शुल्कामुळे यामध्ये अडथळे येत होते. पण, अलीकडेच सरकारी धोरणात बदल झाला आहे. ज्यामध्ये ४०,००० डॉलर्स पेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी इलेक्ट्रिक कारवरील कस्टम ड्युटी ११०% वरून ७०% पर्यंत कमी करण्यात आली. सरकारच्या या नवीन धोरणामुळे भारतीय बाजारपेठ परदेशी कंपन्यांसाठी आणखी आकर्षक बनली आहे.
एलॉन मस्क यांच्या कंपनीला…
टेस्लाच्या भारतीय बाजारपेठेतील नियोजित प्रवेश योजनेमुळे महिंद्राला कोणताही फरक पडणार नसल्याचे महिंद्राने स्पष्ट केले आहे. एनडीटीव्ही प्रॉफिट कॉन्क्लेव्हमध्ये, टेस्ला ईव्ही मार्केटमध्ये व्यत्यय आणि देशांतर्गत वाहन उत्पादकांवर दबाव आणेल का असे विचारले असता, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनिश शाह यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, ते एलॉन मस्क यांच्या कंपनीला घाबरलेले नाहीत आणि त्यांच्या उत्पादनांवर पूर्ण विश्वास ठेवतात.