अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये कार्यरत असेलल्या आणि सर्वाधक वेतन घेणाऱ्या १० सीईओंची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वोच्च दहा जणांच्या यादीत केवळ एका भारतीय वंशाच्या नागरिकाचा समावेश आहे. आपण सिलिकॉन व्हॅलीमधील सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांना ओळखतो. पण या दोघांपेक्षाही आणखी एक भारतीय वंशाचा सीईओ सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांच्या यादीत आला आहे. त्यांचे नाव निकेश अरोरा असून ते पालो अल्टो नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘सी-स्यूट कॉम्प’ या डेटा ॲनालिटिक्स कंपनीने सोमवारी सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सीईओंची यादी जाहिर केली.

‘सी-स्यूट कॉम्प’ने सर्वाधिक वेतन मिळणाऱ्या सीईओंच्या दोन याद्या जाहिर केल्या आहेत. २०२३ मध्ये किती वेतन जाहिर करण्यात आले होते आणि प्रत्यक्षात किती वेतन अदा केले गेले, अशा दोन निकषांच्या याद्या आहेत. यापैकी एकाही यादीत गुगलचे सीईओ आणि भारतीय वंशाचे नागरिक सुंदर पिचाई यांचे नाव नाही. तसेच मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांचाही या दोन्ही यादीत समावेश आहे.

Apple iPhone बनविणाऱ्या Foxconn ने लग्न झालेल्या महिलांना नोकरी का नाकारली?

दरम्यान पालो अल्टो नेटवर्क्सच्या निकेश अरोरा मात्र दोन्ही याद्यांमध्ये सर्वात वरच्या दहामध्ये सामील आहेत. २०२३ मध्ये त्यांची १५१.४ दशलक्ष डॉलर्सची कमाई जाहिर करण्यात आली आहे. यानुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या सीईओंच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर प्रत्यक्षात त्यांना २६६.४ दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली आहे. या दुसऱ्या यादीत ते दहाव्या क्रमाकांवर आहेत.

प्रत्यक्षात मिळालेल्या कमाईच्या यादीत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा प्रथम क्रमांक लागतो. २०२३ मध्ये त्यांनी १.४ अब्ज डॉलर्सची कमाई केली. त्यांच्यानंतर १ अब्जाहून अधिक डॉलर्सची कमाई करणारे पॅलांटीर टेक्नॉलॉजीसचे अलेक्झांडर कार्प हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत.

अदानी समूहाचे १.३ लाख कोटींच्या भांडवली गुंतवणुकीचे नियोजन

निकेश अरोरा कोण आहेत?

निकेश अरोरा यांनी २०१८ साली पालो अल्टो नेटवर्क्सची कमान आपल्या हाती घेतली. त्याआधी त्यांनी गुगल आणि सॉफ्टबँक ग्रुपमध्येही काम केले होते. निकेश अरोरा (५६) यांचे वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते. निकेश यांनी दिल्लीच्या हवाई दल पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. तसेच नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून एमबीए तर बोस्टन कॉलेजमधून त्यांनी एमएससीचीही पदवी मिळवलेली आहे.

गुगलमध्ये अरोरा यांनी १० वर्ष वरिष्ठ पदावर सेवा दिली. २०१४ साली त्यांनी राजीनामा देऊन सॉफ्टबँक ग्रुपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.