शेअर बाजाराचं कामकाज शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बंद असतं. मात्र आता शेअर बाजार आज सुरु राहणार आहे. कारण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची २२ जानेवारी रोजी शेअर बाजाराला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आज २० जानेवारी २०२४ या दिवशी शेअर बाजार सुरु ठेवण्यात आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ही माहिती दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजाराचं दार शनिवारी उघडलं जाणार आहे. याआधी शनिवारी शेअर बाजार कधीही सुरु नव्हता.
देशांतर्गत मार्केट शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत खुला राहील आणि सोमवारी बंद राहील. सोमवार, २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीमुळे इक्विटी, कर्ज आणि मनी मार्केटमधील व्यवहार बंद राहतील.
The Mint च्या वृत्तानुसार सकाळी ९ ते दुपारी ३.३० पर्यंत शेअर बाजाराचं कामकाज सुरु राहणार आहे.नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने २९ डिसेंबर २०२३ ला माहिती दिली होती की, शनिवारी म्हणजेच २० जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाज सुरु राहणार आहे. या दिवशी तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने रिकव्हरी साइटवर इंट्राडे (Intraday) स्विच-ओव्हरसाठी हे खास सत्र ठेवलं आहे. उद्या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजमध्ये छोट्या छोट्या दोन सत्रात ट्रेडिंग करु शकता.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दोन विशेष सत्रांचं आयोजन केलं गेलं आहे. पहिलं लाईव्ह सेशन सकाळी ९. १५ वाजता सुरु होईल. पहिलं सत्र ४५ मिनिटांचं असेल, हे सत्र १० वाजता संपेल. याचं ट्रेडिंग प्रायमरी वेबसाइट असेल. तर दुसरं सत्र ११.३० वाजता सुरु होईल. हे सत्र एक तासाचं असेल, जे १२.३० ला बंद होईल. तसंच प्री क्लोजिंग सत्र दुपारी १२.४० ते १२.५० य वेळेत असणार आहे.