Ratan Tata Will: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदी त्यांचे भाऊ नोएल टाटा यांची निवड करण्यात आली. आता त्यांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी चार लोकांची निवड करण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. वकील दारियस खंबाटा, रतन टाटा यांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री, सावत्र बहिणी शिरीन आणि डिआना जीजीभॉय यांची यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते.
मेहल मिस्त्री हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या दोन ट्रस्टकडे टाटा सन्सची ५२ टक्के मालकी आहे, अशीही माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे. मेहल मिस्त्री हे रतन टाटा यांचे जवळचे मित्र आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सॉयरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत. २०१६ रोजी रतन टाटा यांनी सॉयरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर केले होते.
रतन टाटा यांच्या दोन सावत्र बहिणी यादेखील त्यांच्याप्रमाणेच समाज कल्याणाच्या कामात अनेकदा गुंतलेल्या दिसतात. तसेच त्या दोघीही रतन टाटा यांच्या जवळच्या मानल्या जातात. तर वकील खंबाटा हे सात वर्षांनंतर टाटा ट्रस्टच्या विश्वस्तपदावर पुन्हा आले होते.
रतन टाटा यांची संपत्ती किती?
हुरून इंडिया रिचलिस्ट २०२४ ही यादी ऑगस्ट २०२४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. या यादीनुसार रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्समधील ०.८३ टक्के समभाग होते. त्यांची एकूण संपत्ती ७,९०० कोटी असल्याचे सांगितले गेले. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीमधील मोठा वाटा धर्मदाय संस्था आणि समाज कल्याणासाठी दान केला. दरम्यान त्यांच्या मृत्यूपत्राबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे.
टाटा सन्सच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांचे सूचीबद्ध मूल्य जवळपास १७.७१ लाख कोटी एवढे असल्याचे सांगितले जाते.