भारतात SBI, ICICI आणि HDFC अशा तीन बँका आहेत, ज्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या बँका बुडणे केंद्र सरकारला परवडणारे नाही. RBI या बँकांना D-SIB यादीत ठेवते आणि त्यांच्यासाठी कठोर नियम बनवलेत. गेल्या आठवडाभरात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका बुडाल्या आहेत. तिसरी बँक म्हणजेच फर्स्ट रिपब्लिक बँकेला इतर मोठ्या बँकांनी 30 अब्ज डॉलर्सची मदत देऊन वाचवलं आहे.
अमेरिकन बँका बुडाल्याचा भारताच्या बँकिंग व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नसला तरी एकामागून एक बँका बुडण्याच्या या घटनांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. आपली बँक कधी बुडाली तर आपल्या पैशाचे काय होईल, अशी भीती लोकांना वाटते, असे झाल्यास सरकार पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात अशा तीन बँका आहेत, ज्या इतक्या मोठ्या आहेत की, त्या बुडू शकत नाहीत. अशा बँकांना D-SIB म्हणतात. RBI ने ICICI बँक, SBI आणि HDFC बँकेचा D-SIB मध्ये समावेश केला आहे.
डी-एसआयबी म्हणजे काय?
डी-एसआयबी ही तांत्रिकदृष्ट्या देशांतर्गत प्रणालीतील महत्त्वाची बँक असते. म्हणजे ज्या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की, त्या बुडणे सरकारला परवडणारे नाही. कारण त्यांच्या बुडण्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे आर्थिक संकट आणि दहशतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 2008 च्या आर्थिक मंदीनंतर बँकांना डी-एसआयबी म्हणून घोषित करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर अनेक देशांच्या अनेक मोठ्या बँका बुडाल्या, त्यामुळे आर्थिक संकटाची स्थिती दीर्घकाळ राहिली. 2015 पासून RBI दरवर्षी D-SIB ची यादी आणते. 2015 आणि 2016 मध्ये फक्त SBI आणि ICICI बँक D-SIB होते. 2017 पासून या यादीत एचडीएफसीचाही समावेश करण्यात आला होता.
D-SIB कशी निवडली जाते?
RBI देशातील सर्व बँकांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर, त्यांच्या ग्राहकांच्या आधारावर पद्धतशीर महत्त्व स्कोअर देते. बँकेला D-SIB म्हणून सूचीबद्ध करण्यासाठी, तिची मालमत्ता राष्ट्रीय GDPच्या 2 टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. बँकेच्या माहितीनुसार, डी-एसआयबीला पाच वेगवेगळ्या टप्प्यांत ठेवले जाते. बकेट फाइव्ह म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक असते. डी-एसआयबी असलेल्या तीन बँकांमध्ये एसबीआय बकेट थ्रीमध्ये आहे, तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक बकेट वनमध्ये आहे.
बँक रन – बँक रन म्हणजे जेव्हा बँकेचे अनेक ग्राहक एकाच वेळी त्यांचे पैसे काढू लागतात आणि बँकेतील रोख ठेव कमी होते किंवा संपते, त्याला बँक रन म्हणतात. अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) यामुळे बुडाली आणि SVB बुडल्याने निर्माण झालेल्या दहशतीची सिग्नेचर बँकही बळी ठरली.
कॅपिटल बफर- कॅपिटल बफर म्हणजे बँकेच्या कामासाठी लागणाऱ्या रोख रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त रोकड ठेवणे. जेणेकरून जेव्हा रोख रकमेची मागणी जास्त असेल, तेव्हा ती पूर्ण करता येईल. याचा असा विचार करा, समजा घरखर्चासाठी तुमचे मासिक बजेट रुपये 10,000 आहे. साधारणपणे तुमचा खर्च 10,000 रुपयांत समाविष्ट केला जातो. यावर आपण आणीबाणीच्या परिस्थितीसाठी 5000 हजार अतिरिक्त ठेवतो.
D-SIB बँक असण्याचा अर्थ काय?
आरबीआय अशा बँकांवर बारीक नजर ठेवते. अशा बँका इतर बँकांच्या तुलनेत मोठे भांडवल बफर ठेवतात, जेणेकरून मोठी आणीबाणी आली किंवा तोटा झाला तरी त्याचा सामना करता येतो. D-SIB च्या व्यवहारासाठी RBI ने वेगळे नियम बनवले आहेत. भांडवली बफरसोबत अशा बँकांना कॉमन इक्विटी टियर 1 (CET1) भांडवल नावाचा अतिरिक्त निधीदेखील राखीव ठेवावा लागतो. RBIच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, SBI ला त्यांच्या रिस्क वेटेड अॅसेट्स (RWA) पैकी 0.60 टक्के CET1 भांडवल ठेवणे आवश्यक आहे, तर ICICI आणि HDFC बँकांना 0.20 टक्के अतिरिक्त CET1 भांडवल ठेवणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, जी बँक अधिक महत्त्वाच्या बकेटमध्ये आहे त्यांना अधिक अतिरिक्त CET1 भांडवल ठेवावे लागते. म्हणजेच जर एखादी बँक D-SIB असेल, तर RBI तिच्या कठोर नियमांद्वारे खात्री करते की, ती बँक सर्वात कठीण आर्थिक आणीबाणीसाठी तयार आहे. त्यामुळे तुमचे खाते अशा बँकेत असेल, तर तुमची बँक कोलमडणार नाही, असा दिलासा तुम्हाला मिळू शकतो.