तुम्ही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असू शकतो. कारण ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या निफ्टी निर्देशांकात ८ % वाढ झाली असून, तो शेअर्स अव्वल स्थानावर आहे. म्हणजेच काही तासांत टाटा मोटर्सने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आज सकाळी ०९:४० च्या सुमारास राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा समूहाचे शेअर ७.६२ टक्क्यांच्या वाढीसह ४७२ रुपयांवर व्यवहार करीत होते. टाटा समूहाच्या जागतिक घाऊक विक्रीत ८ टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे चित्र समोर आले असून, यात जग्वार लँड रोव्हरचाही समावेश आहे.
तुम्हालाही चांगली कमाई करायची असल्यास तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. कारण अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा समूहाच्या शेअरवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यात. ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने गुंतवणूकदारांना ५४४ रुपयांच्या मूल्यासह शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जे सध्या मूळ किमतीच्या २४ टक्क्यांहून अधिक आहेत.
गोल्डमन सॅक्सचा अंदाज
Goldman Sachs ने देखील टाटा मोटर्ससाठीचा आर्थिक वर्ष २०२४-२५ EBITDA अंदाज १५ ते १६ टक्क्यांनी वाढवला आहे. ब्रोकिंग फर्मला असेही वाटते की, बाजार जग्वार लँड रोव्हरच्या EBIT (व्याज आणि करापूर्वीची कमाई) मार्जिन संभाव्यतेला कमी लेखत आहे. दुसरीकडे नोमुराने जेएलआर व्हॉल्यूममध्ये वाढ होण्याचे श्रेय सेमीकंडक्टर्सच्या पुरवठ्यात सुधारणेला दिले आहे, तर चौथ्या तिमाहीत EBIDTA (व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई) १३.८ टक्के असल्याचा अंदाज आहे. ब्रोकिंग फर्मने टाटा मोटर्सवर ५०८ रुपयांच्या रेटिंगसह शेअर खरेदीची शिफारस केली आहे.
जागतिक घाऊक विक्री इतकी वाढली
Tata Motors ने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत ३,६१,२६१ युनिट्सवर Jaguar Land Rover (JLR) सह जागतिक घाऊक विक्रीत ८ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत टाटा मोटर्स आणि टाटा इतर श्रेणींच्या सर्व व्यावसायिक वाहनांची जागतिक घाऊक विक्री १,१८,३२१ युनिट्स झाली, जी आर्थिक वर्ष २०२२च्या तुलनेत ३ टक्के जास्त आहे. चौथ्या तिमाहीत मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत सर्व प्रवासी वाहनांची निर्यात १० टक्क्यांनी वाढून १,३५,६५४ युनिट्सवर पोहोचली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, मार्च तिमाहीत JLR ची जागतिक विक्री १,०७,३८६ वाहने एवढी होती, ज्यामध्ये जग्वारच्या १५,४९९ युनिट्स आणि लँड रोव्हरच्या ९१,८८७ युनिट्सचा समावेश होता.
हेही वाचाः बँकेत एफडीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खुशखबर; ‘या’ बँकेने व्याजदर वाढवले