Trump Tariffs hit Indian Billionaires: भारतातील अब्जाधीशांसाठी २०२५ या वर्षाची सुरुवात म्हणावी तितकी चांगली झालेली नाही. नव्या वर्षाच्या पहिल्या साडे तीन महिन्यात भारतातील श्रीमंतांची एकूण ३०.५ बिलियन डॉलर्स अर्थात २.६३ लाख कोटींची संपत्ती घटली आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने यासंबंधी आकडेवारी जाहिर केली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. ज्यामुळे श्रीमंताच्या संपत्तीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अनेक देशांवर आयातकर लागू केला. ज्यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारात गदारोळ उडाला. शेअर बाजारात घसरण आल्यामुळे मुकेश अंबानी, गौतम अदाणी, शिव नाडर यांच्यासह अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये घसरण झाली.

आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी यावर्षी आपल्या संपत्तीमधील ३.४२ बिलियन डॉलर्स एवढा हिस्सा गमावला आहे. आता ते ब्लुमबर्गच्या श्रीमंताच्या यादीत १७ व्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचे मूल्य ८७.२ बिलियन डॉलर्स इतके आहे. या पडझडीच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने स्थिर कामगिरी केली आहे, तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये २४ टक्क्यांची घसरण झाली.

मुकेश अंबानी यांच्या खालोखाल गौतम अदाणी हे भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे उद्योगपती आहेत. या वर्षात त्यांची संपत्ती ६.५ बिलियन डॉलर्सने घसरली. अदाणी एंट्रप्राइजेसमध्ये २०२५ साली ९ टक्क्यांची घसरण दिसली. मार्केटमध्ये अस्थिरता आल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतल्यामुळे अधिक घसरण झाली.

याशिवाय तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश शिव नाडर यांनाही मोठा फटका बसला आहे. एचसीएल या टेक कंपनीचे संस्थापक असलेल्या नाडर यांची संपत्ती १०.५ बिलियन डॉलर्सने घटली. २०२५ या वर्षात भारतातील श्रीमंतापैकी सर्वाधिक फटका शिव नाडर यांना बसला.

दरम्यान जिंदाल समूहाच्या सावित्री जिंदाल यांनाही २.४ बिलियन डॉलर्सचा फटका बसला. तर सन फार्माचे दिलीप संघवी यांचीही संपत्ती ३.३४ बिलियन डॉलर्सने कमी झाली. सन फार्माच्या शेअर्समध्ये यावर्षी तीनच महिन्यात ११ टक्क्यांची घसरण झाली.

शेअर बाजाराला बसला हादरा

ट्रम्प यांच्या आयातकर धोरणामुळे भारतीय शेअर बाजाराला या वर्षात मोठा फटका बसला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीसारखे प्रमुख निर्देशांकांत ४.५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत अनुक्रमे १४ आणि १७ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढता पाय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. तसेच जागतिक बाजारात मंदिचे सावट असल्यामुळे भारतीय शेअर बाजारावर त्याचे परिणाम दिसून आले.