Tupperware Bankrupt: प्लास्टिकचे रंगीबेरंगी डबे आणि बाटल्यांचा ब्रँड असलेल्या टपरवेअर ब्रँडला करोना काळानंतर घरघर लागल्यामुळे अखेर टपरवेअरने दिवाळखोरी जाहीर केली आहे. कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता ५०० दशलक्ष ते १ अब्ज इतकी आहे. तर त्यांची देणी १ अब्ज ते १० अब्जापर्यंत वाढले आहे. किचनमधील गृहपयोगी वस्तू तयार करणाऱअया टपरवेअरने जवळपास अनेक दशके या क्षेत्रावर राज्य केले. मात्र २०२० नंतर कंपनीचा तोटा वाढत गेला. यावर्षी जून महिन्यात कंपनीने अमेरिकेतील उत्पादन करणारा कारखाना बंद करून जवळपास १५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.
मागच्या महिन्याभरापासून डेलावेर येथे टपरवेअर आणि त्यांच्या कर्जदारामध्ये कायदेशीर कारवाई सुरू होती. ७०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कंपनीला द्यायचे आहे. कर्जदारांनी कंपनीला परतफेड करण्यासाठी वेळ देण्याचे कबूल केले आहे.
हे वाचा >> ब्रॅण्डनामा : टपरवेअर
करोना काळानंतर कंपनीच्या नफ्यात घसरण व्हायला सुरूवात झाली. महामारीमुळे लॉकडाऊन लागले, ज्यामुळे लोक घरीच होते. अशावेळी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर किचनच्या वस्तूंची विक्री रोडावली. करोना साथ ओसरल्यानंतर प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे दर वाढले. तसेच कामगारांच्या वेतन आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे तोटा वाढतच गेला.
ऑगस्ट महिन्यात कंपनीने व्यवसायात तग धरून राहण्याबद्दल साशंकता व्यक्त केली. कंपनीची गंगाजळी कमी झाल्यामुळे भविष्यात व्यापारात टिकून राहणे अवघड असल्याची कबुली देण्यात आली. त्यानुसार टपरवेअरने चॅप्टर ११ अंतर्गत दिवाळखोरी जाहीर करून संरक्षण मागितले आहे.
टपरवेअरची स्थापना कधी आणि कुठे झाली?
टपरवेअरची स्थापना १९४६ साली अमेरिकेत झाली होती. अर्ल टपर यांनी स्थापन केल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला टपरवेअर संबोधले गेले. गेली ७६ वर्ष बंद-उघड होत असलेले हे टपरवेअरचे डबे/ बाटल्या आता लवकरच कायमच्या बंद होणार आहेत.
हे ही वाचा >> अन्यथा : टपोरं ‘टपर’
टपरवेअरने निर्माण केलेल्या या साखळीमुळे अनेक गृहिणींना रोजगार मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मंदीच्या आणि महागाईच्या काळात घरच्या घरी होणारा हा व्यवसाय पाश्चिमात्य देशातील अनेक स्त्रियांना घरखर्चाच्या तरतुदीला हातभार लावणारा होता. टपरवेअरने आपल्या ग्राहक आणि विक्रेत्यांना बांधून ठेवण्यात बिलकूल कसर केली नाही. दर वर्षी ज्युबिली मीटिंगचे आयोजन, त्यात नवीन उत्पादनांचे प्रदर्शन आणि सर्वोत्कृष्ट डेमो देणाऱ्यांना भरघोस बक्षिसे हे कंपनीचे गणित ठरलेले होते. या जिव्हाळ्यातून टपरवेअरचा व्यवसाय वाढत गेला. टपरवेअरचे जाळे १०० देशात विस्तारलेले होते.