US Revises India Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर व्यापार कर लादला आहे. या व्यापार करामुळे व्यावसायिकांवर आयात शुल्क लागू करण्यात येणार आहे. परिणामी यामुळे जगभरातील देश व्यापारी युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. दरम्यान, भारतावर २७ टक्के कर लादल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. परंतु, व्हाईट हाऊसच्या यादीत हा कर २६ टक्के आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांवर लादलेल्या करामध्ये गोंधळ घातल्याचं स्पष्ट झालं आहे. मनी कंट्रोलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दोन्ही याद्यांमध्ये फरक
ब्लूमबर्गने प्रकाशित केलेल्या डेटानुसार, ट्रम्प यांनी रोझ गार्डनमध्ये “लिबरेशन डे” टॅरिफची घोषणा केली तेव्हा सादर केलेल्या चार्टपेक्षा व्हाईट हाऊसने जारी केलेल्या यादीत तफावत आहे. किमान १४ अर्थव्यवस्थांसाठी भविष्यातील परस्पर टॅरिफ दरांची यादी व्हाईट हाऊसनंही जाहीर केली आहे. पण दोन्ही यादीत एक टक्क्याचा फरक असल्याचं दिसतंय.
भारतावर आता किती टक्के आयात शुल्क?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोझ गार्डनमध्ये २७ टक्के आयात शुल्क जाहीर केले होते. परंतु, व्हाईट हाऊसच्या यादीनुसार भारतावर २६ टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. दक्षिण कोरियासह इतर देशांच्याबाबतीतही असाच गोंधळ घालण्यात आला आहे. दक्षिण कोरियावर २५ टक्के कर असल्याचं सांगितल्यानं व्हाईट हाऊसच्या यादीत २६ टक्के होता. परंतु, आता पुन्हा २५ टक्के कर लावण्यात आला आहे. बोत्सवाना, कॅमेरून, मलावी, निकाराग्वा, नॉर्वे, पाकिस्तान, फिलीपिन्स, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, थायलंड, वानुआतु आणि फॉकलंड बेटे या देशांच्या बाबातीतही करांमध्ये तफावत आढळली आहे.
अनेक देशांना वगळण्यात आले
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “व्हाईट हाऊसने जारी केलेली यादीतील कर हे लागू होणारे दर आहेत.” एवढंच नव्हे तर काही देशांना व्हाईट हाऊसच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यामध्ये मॉरिशस, रियुनियन बेट, कॅनडाजवळील फ्रेंच द्वीपसमूह सेंट पियरे, मिकेलॉन आणि ब्रिस्बेनच्या पूर्वेला विमानाने दोन तासांच्या अंतरावर असलेले ऑस्ट्रेलियन प्रदेश नॉरफोक बेट यांना देखील अशाच प्रकारे शुल्क परिशिष्टातून वगळण्यात आले. युरोपियन युनियन सदस्य म्हणून फ्रान्सला २०% व्यापार शुल्क आकारले जाते, तर ऑस्ट्रेलियाला जागतिक किमान १०% कर आकारला जातो.