US Share Market Crashed May Impacts India : डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेड पार्टनर (ज्या देशांबरोबर व्यापार, आयात-निर्यात होत असते) देशांवर परस्पर आयात शुल्क लावल्यानंतर जगभरातील अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले. भारतीय शेअर बाजार देखील सोमवारी तीन हजारांहून अधिक अंकांनी घसरला. दुसऱ्या बाजूला, अमेरिकेवरही याचा परिणाम झाला आहे. अमेरिकेचा शेअर बाजारही गडगडला आहे. सोमवारी अमेरिकन शेअर बाजार उघडताच ५ टक्क्यांनी घसरला. वॉल स्ट्रीटने मोठ्या घसरणीसह व्यापाराला सुरुवात केली.

अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख स्टॉक निर्देशांकात घसरण झाली आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळे शेअर बाजार गडगडल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांनी ट्रेड पार्टनर देशांवर लावलेल्या आयात शुल्कामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेअर बाजारातील अनिश्चितता पाहून अनेक व्यापारी व गुंतवणूकदारांनी शेअर्सपासून दूर राहणं पसंत केलं आहे. अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सरकारी रोख्यांचा पर्याय निवडला आहे.

प्रमुख स्टॉक निर्देशांकात घसरण

डॉव्ह जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज १,२१२.९८ अंकांनी घसरून ३७,१०१.८८ वर पोहोचला आहे. ही ३.१७ टक्क्यांची घसरण आहे. एस अँड पी ५०० निर्देशांक १८१.३७ अंकांनी ( ३.५७ टक्के) घसरून ४,८९२.७१ अंकांवर पोहोचला आहे. नेस्डॅक कंपोझिटदेखील ४ टक्क्यांनी (६२३.२३ अंक) कोसळलं आहे. त्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

भारतीय गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

दरम्यान, अमेरिकेतील बाजाराची घसरण पाहता भारतातील गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय शेअर बाजार काल सव्वातीन हजार अंकांनी घसरला होता. आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारा लाल निशाण फडकावू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याचे भावही गडगडले आहेत.

आशियाई शेअर बाजार सावरला, भारतीय गुंतवणूकदार आशावादी

दरम्यान, आज सकाळी आशियाई शेअर बाजार सावरताना दिसतोय. जपानचा निक्की निर्देशांक आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक वधारला आहे. जपानचा निक्की निर्देशांक ५.५ टक्क्यांनी सावरला आहे जो काल आठ टक्क्यांनी कोसळला होता. निक्कीत व्यवहाराला सुरुवात होताच २२५ अकांची उसळी पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक दोन टक्क्यांनी काहीसा सावरला आहे. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियन शेअर बाजार देखील सावरले आहेत. त्यामुळे आता भारतीय शेअर बाजारही सावरू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे