Vibrant Gujarat Global Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गांधीनगर येथील महात्मा मंदिरात व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ चे उद्घाटन केले. या समिटमध्ये संपूर्ण देश आणि जगभरातील मोठे व्यवसायिक सहभागी झालेले आहेत. अदाणी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदाणी हेदेखील या समिटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आगामी पाच वर्षात हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रात दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.

गांधीनगर येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची दहावी शिखर परिषद होत आहे. या शिखर परिषदेत बोलत असताना गौतम अदाणी यांनी महत्त्वकांक्षी प्रकल्पात गुंतवणूक करण्याबाबतचा विचार व्यक्त केला. भारताला स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा देण्यासाठी भविष्यकाळात अदाणी समूह महत्त्वाची कामगिरी बजावेल, असे यावेळी ते म्हणाले. “आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत आम्ही हरित ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा विस्तार करत असताना एकात्मिक आणि अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी आगामी पाच वर्षात अदाणी समूह गुजरातमध्ये दोन लाख कोटीहून अधिकची गुंतवणूक करणार आहे.

हे वाचा >> ‘व्हायब्रंट गुजरात समिट’ म्हणजे काय?

गौतम अदाणी पुढे म्हणाले, या कोट्यवधींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून नवकल्पनांना चालणा देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि गुजरातमध्ये अक्षय ऊर्जेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे ध्येय गाठले जाईल. तसेच या गुंतवणुकीतून किमान एक लाख रोजगार निर्मिती होईल, असेही त्यांनी सांगितले.

अदाणी समूह गुजरातमध्ये आगामी पाच वर्षात कशापद्धतीने गुंतवणूक करू इच्छितो याची रूपरेषा सांगत असताना अदाणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगती साधली असल्याचेही ते म्हणाले. २०१४ पासून भारताचा जीडीपी सातत्याने वाढत आहे, तसेच दरडोई उत्पन्नातही वाढ झाल्याचे यावेळी अदाणी यांनी अधोरेखित केले. आणखी चांगल्या बाबी भविष्यात समोर येईल, असेही ते म्हणाले.

व्हायब्रंट गुजरात समिटबद्दल बोलत असताना अदाणी म्हणाले, व्हायब्रंट गुजरात ही शिखर परिषद पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दूरदृष्टी ठेवून आखलेली एक सर्वोकृष्ट संकल्पना आहे. मोदी यांनी या शिखर परिषदेच्या माध्यमातून भव्य महत्त्वकांक्षा राबविण्यासाठी प्रशासन आणि प्रकल्पांची निर्दोश अंमलबजावणी कशी होईल, याचीही काळजी घेतली. यातून भारताच्या इतर राज्यांनीही प्रेरणा घेतली असून सर्वच राज्य औद्योगिक लक्ष्य गाठण्यासाठी निकोप स्पर्धा करत एकमेकांच्या सहकार्याने पुढे जात आहेत.

Story img Loader