गुजरातमधील गांधीनगर येथे दहावे ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४’ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून अनेक उद्योजक या शिखर परिषदेला उपस्थित राहून गुंतवणुकीबाबतच्या घोषणा करत आहेत. गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी या आघाडीच्या उद्योजकांनीही लाखो कोटींची गुंतवणूक करत असल्याची घोषणा शिखर परिषदेत केली. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनीही आज या शिखर परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी गुजरात मॉडेलचे आणि शिखर परिषदेचे कौतुक केले.

काय म्हणाले नारायण राणे?

“व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटममध्ये मला येऊन आनंद वाटला. गुंतवणुकीसाठी इथे खूप चांगले वातावरण आहे. पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्राला सहकार्य करण्यात गुजरात सरकार सकारात्मक भूमिका घेत असते. गुजरातने आतापर्यंत इतर राज्याच्या तुलनेत जी प्रगती केली, त्यामुळे गुजरात विकासाचे मॉडेल झाले आहे. उद्योगातही ते मॉडेल बनू शकते. २०४७ पर्यंत भारत आत्मनिर्भर आणि जगातील महासत्ता करणार असल्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे. त्यादिशेने गुजरात मार्गक्रमण करत आहे”, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.

“गुजराती असल्याचा अभिमान, ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी”; मुकेश अंबानींचे वक्तव्य, म्हणाले, “हरित ऊर्जेत…”

नारायण राणे पुढे म्हणाले की, व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेत एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. गुजरात प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्यासाठी ही शिखर परिषद फायदेशीर ठरेल. या परिषदेत अनेक उद्योगपतींनी नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. येत्या काही वर्षांत या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली पाहीजे, असेही ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातमधून येतात. त्यामुळे त्यांच्यासमोर जर उद्योगपती काही आश्वासने देत असतील तर त्यांना ते पूर्ण करावे लागतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच शिखर परिषदेत रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करत राहणार असल्याची घोषणा केली. तसेच मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असेही मुकेश अंबानी म्हणाले.

गौतम अदाणी गुजरातमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार; व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये घोषणा

गुजरातला आपली मातृभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगताना मुकेश अंबानी म्हणाले की, गेल्या १० वर्षांत रिलायन्सने देशात सुमारे १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे. सात कोटी गुजरातींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रिलायन्स कोणतीही कसर सोडणार नाही.

दरम्यान अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनीही आगामी पाच वर्षात हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रात गुजरातमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. यामाध्यमातून एक लाख रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. रिलायन्स जर गुजराती कंपनी असेल आणि तुमची कर्मभूमी जर गुजरात असेल तर तुम्ही मुंबईत काय करता? तुम्ही अँटेलियासह आपला गाशा गुंडाळून गुजरातमध्ये जाऊन बसा, अशी संतप्त प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली होती.

Story img Loader