दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याकरता आता फक्त एक आठवडा उरला आहे. या आठवड्याभरात नागरिकांनी स्वतःजवळील दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत. दोन हजाराच्या नोटा बंद होणार असल्याची घोषणा मे महिन्यात करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्या होत्या. एका रात्रीत निर्णय घेऊन नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर, एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्याने दोन हजाराची नवी नोट लॉन्च करण्यात आली. ही सर्वांत मोठी चलनी नोट होती. परंतु, १९ मे रोजी निर्णय घेत दोन हजाराच्याही नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. हे आवाहन करण्याआधीआपासूनच दोन हजाराच्या नोटा चलनातून कमी झाल्या होत्या. परंतु, १ सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या एकूण ७ टक्के नोटा चलनात आजही आहेत.
३० सप्टेंबरनंतर या नोटांचं काय होणार?
३० सप्टेंबरनंतर या दोन हजारांच्या नोटांचं काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अजिबात घाबरू नका. ३० सप्टेंबरनंतरही या नोटा कायदेशीर राहतील, फक्त त्याचा व्यवहाराच्या उद्देशाने स्वीकार केला जाणार नाही. या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच बदलल्या जातील. परंतु, विहित कालावधीत नोटा का बदलून घेतल्या नाहीत, असं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.