सरलेल्या आठवड्यात, जगभरात सर्वत्रच भांडवली बाजारात खरेदीला बहर आला आणि त्या त्या बाजारपेठांचे निर्देशांक उच्च स्तर गाठताना दिसले. जगभरातील गुंतवणूकदारांकडून अर्थव्यवस्थेच्या आरोग्याशी निगडित आणि अर्थव्यवस्थेच्या उभारीचे लाभार्थी ठरणारे समभाग खरेदी हिरीरीने केली गेली. त्याची ठोस कारणे-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. अमेरिकेचे सकल देशांतर्गत उत्पादनाने तिसऱ्या तिमाहीत २.६ टक्क्यांनी वाढ दर्शविली. अमेरिकी अर्थव्यवस्थेने आधीच्या दोन तिमाहींमध्ये शून्याखालील दराची नोंद केली होती, म्हणजेच अनुक्रमे ती ०.६ टक्के आणि १.६ टक्क्यांनी आकुंचन पावली होती.

२. युरोपीय मध्यवर्ती बँकेने सरलेल्या गुरुवारी आणखी पाऊण टक्क्यांची व्याज दरवाढ जाहीर केली. मागील तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ असून, सामाईक युरो चलन वापरणाऱ्या १९ राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युरोपीय महासंघातील बँकांसाठी आवश्यक समर्थनच ठरेल.

३. बँक ऑफ जपानने पतविषयक धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहनाची भूमिका कायम ठेवली. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेल्या कठोरतेची कास नाकारत आणि कमकुवत बनलेले चलन – येनला सावरण्यासाठी तेथील मध्यवर्ती बँकेच्या धोरण मंडळाने एकमताने उणे ०.१ टक्के असा नकारात्मक व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर, येत्या आठवड्यातील (३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर) नियोजित घडामोडींचा वेध घेऊया.

चालू आठवड्यात, अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हसह तीन मध्यवर्ती बँका व्याजदर वाढीचा निर्णय घेतील. भारताच्या प्राथमिक भांडवली बाजारात गेल्या काही महिन्यांनंतर प्रथमच, चार कंपन्यांची प्रारंभिक खुली भागविक्री अर्थात ‘आयपीओ’ गुंतवणूकदारांचा कल आजमावतील. या माध्यमातून या चार कंपन्यांकडून ४,५०० कोटींचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे. शिवाय, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि स्टेट बँक या बड्या कंपन्या त्यांची दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय कामगिरी जाहीर करतील.

सोमवार, ३१ ऑक्टोबर २०२२

० तिमाही निकाल – लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, टाटा स्टील, कॅस्ट्रॉल इंडिया, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फिनो पेमेंट्स बँक, व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर

० भारताची वित्तीय तूट, पायाभूत सुविधा उत्पादन – भारताची एप्रिल-सप्टेंबर कालावधीसाठी महसुली प्राप्ती आणि महसुली व्यय यांची आकडेवी सोमवारी अधिकृतपणे जाहीर केली जाईल. या दोहोंमधील तफावत अर्थात वित्तीय तूट ही आधीच्या एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत वाढत आली असून, सप्टेंबरची आकडेवारीचा याला अपवाद असण्याचे कारण दिसून येत नाही. सप्टेंबरसाठी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कणा असलेल्या पायाभूत क्षेत्रांतील उत्पादनाची आकडेवारीही जाहीर केली जाईल.

० ऑक्टोबरमधील जीएसटी संकलन – गेले काही महिने निरंतर १.४० लाख कोटींपेक्षा अधिक अशी जोमदार वसुली वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीपोटी देशात सुरू आहे. दसरा-दिवाळी सणोत्सव आणि लोकांकडून दागदागिने, कपडेलत्ते व तत्सम खरेदी मोठ्या प्रमाणात झालेल्या ऑक्टोबरच्या आकडेवारीकडून कोणता नवीन विक्रम स्थापित केला जातो, हे सोमवारी प्रसिद्ध होणारी आकडेवारी दाखवून देईल.

मंगळवार, १ नोव्हेंबर २०२२

० तिमाही निकाल – सन फार्मा, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (नायका), टाटा पॉवर, टेक महिंद्र, यूपीएल, व्होल्टास, व्हर्लपूल ऑफ इंडिया, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, धानुका अॅग्रीटेक, कन्साई नेरोलॅक पेंट्स, कर्नाटक बँक.

० भारतातील वाहन विक्री – ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात वाहन विक्रीलाही गती मिळालेली दिसू शकेल. ‘सियाम’ या वाहन निर्मात्यांच्या संघटनेकडून जाहीर होणारी आकडेवारी म्हणूनच उत्सुकतेची गोष्ट असेल.

० भारताच्या निर्मिती क्षेत्राचा ‘पीएमआय’ – औद्योगिक क्रियाकलापांमधील सक्रियतेचा वेध घेणारा ऑक्टोबरचा एस अँड पी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय निर्देशांक मंगळवारी जाहीर होईल. या निर्देशांकाने सप्टेंबरमध्ये ५५.१ असा तीन महिन्यांची नीचांकी पातळी नोंदविली आहे.

० भारताचा आयात-निर्यात व्यापार – ऑक्टोबरसाठी भारतातील प्राथमिक निर्यात व आयातीची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाकडून जारी केली जाईल. सप्टेंबरपासूनच निर्यात आणि आयात दोन्ही वाढण्याचा अंदाज असून व्यापार तूट ऑक्टोबरमध्ये नवीन विक्रमी स्तर गाठण्याचा अंदाज आहे..

० ऑस्ट्रेलियात व्याजदराचा निर्णय – रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाकडून व्याज दरात आणखी २५ आधार बिंदूंनी अर्थात पाव टक्क्यांनी वाढ केली जाण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबरमध्येही तेथील मध्यवर्ती बँकेने पाव टक्क्यांनी व्याज दरवाढ केली आहे.

बुधवार, २ नोव्हेंबर २०२२

० तिमाही निकाल – ईआयएच, महिंद्र अँड महिंद्र फायनान्शियल सर्व्हिसेस, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ सर्व्हिसेस, रिलॅक्सो फूटवेअर्स

० अमेरिकेतील व्याजदराचा निर्णय – अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह उच्च चलनवाढीची स्थिती पाहता व्याजदरात आणखी वाढ करण्याचा अंदाज आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ सरत असले तरी चलनवाढ अद्याप चार दशकांच्या उच्चांकी स्तरावर कायम आहे.

० अमेरिकेतील रोजगार – ऑक्टोबरसाठी एडीपी रोजगार आकडेवारी बुधवारी जारी केली जाईल. अमेरिकी कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लोकांना नोकऱ्यांत सामावून घेतले आहे.

गुरुवार, ३ नोव्हेंबर २०२२

० तिमाही निकाल – हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, अदानी एंटरप्राइजेस, इंडिगो पेंट्स, इंडियन बँक, सनोफी इंडिया, एसआरएफ, अदानी विल्मर, बँक ऑफ इंडिया, ब्ल्यू स्टार, कोरोमंडल इंटरनॅशनल, देवयानी इंटरनॅशनल.

० रिझर्व्ह बँक पतधोरण समितीची विशेष बैठक – रिझर्व्ह बँकेने तिच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) विशेष बैठक गुरुवारी बोलावली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, एमपीसीची पुढील बैठक ५ ते ७ डिसेंबरला होणार असून, त्या दरम्यान होत असलेल्या मध्यावधी बैठकीच्या विषयपत्रिकेवर महागाई नियंत्रणासंबंधी केंद्र सरकारला सादर करावयाचा अहवाल असणार आहे.

० भारताच्या सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय’ – सप्टेंबरमध्ये अनपेक्षितपणे घसरण दाखविल्यानंतर ऑक्टोबरमध्ये सेवा क्षेत्र स्थिरावण्याचा अंदाज आहे, ते या आकडेवारीतून स्पष्ट होईल. निर्मिती आणि सेवा अशा दोहोंचा संमिश्र पीएमआय निर्देशांक देखील जारी केला जाईल.

० ब्रिटनमधील व्याजदराचा निर्णय – महागाईविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर वाढविण्याबाबत आपली भूमिका मागल्या पानावरून पुढे पद्धतीने सुरू ठेवणे अपेक्षित आहे. सप्टेंबरमध्ये तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदर ५० आधार बिंदूंनी (अर्धा टक्का) वाढवून २.२५ टक्क्यांवर नेले आहेत.

शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२

० तिमाही निकाल – टायटन, सिप्ला, मॅरिको, टीव्हीएस मोटर कंपनी, कमिन्स इंडिया, एस्कॉर्ट्स कुबोटा, जिलेट इंडिया, गो फॅशन (इंडिया), गोदरेज अँग्रोव्हेट, हेस्टर बायोसायन्स

० बँक ठेवी आणि वित्तपुरवठ्यातील वाढ : रिझर्व्ह बँकेकडून २१ ऑक्टोबरला संपलेल्या पंधरवड्यात देशातील सर्व बँकांमध्ये दिसून आलेला कर्ज आणि ठेव वाढीचा दर जारी केला जाईल. आधीच्या पंधरवड्यात, म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत बँकांकडून वितरीत कर्जाचे मूल्य १७.९ टक्के दराने वाढल्याचे दिसले आहे.

शनिवार, ५ नोव्हेंबर २०२२

० तिमाही निकाल – स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा

० गुंतवणूक-संधी

चार कंपन्यांचे ‘आयपीओ’ :

० इलेक्ट्रॉनिक सब-सिस्टम्स आणि केबल सामग्री उत्पादक डीसीएक्स सिस्टम्सचा ‘आयपीओ’ सोमवारपासून गुंतवणुकीसाठी खुला होईल. कंपनीने या प्रारंभिक भागविक्रीसाठी प्रति समभाग १९७ ते २०७ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

० फ्युजन मायक्रो फायनान्सचा ‘आयपीओ’ बुधवार, २ नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होईल. कंपनीने विक्रीसाठी प्रति समभाग ३५० रुपये ते ३६८ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे..

० ग्लोबल हेल्थ (मेदान्ता हॉस्पिटल्स) आणि बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचे ‘आयपीओ’ गुरुवारपासून गुंतवणुकीसाठी उघडतील. ग्लोबल हेल्थने या प्रारंभिक भागविक्रीसाठी प्रति समभाग ३१९ ते ३३६ रुपये किंमत निश्चित केली आहे.

० धन-लाभ

(प्रमुख कंपन्यांकडून जाहीर लाभांश, त्यांच्या तारखा व प्रमाण, गुंतवणूकदारांसाठी धनलाभ देणारे बोनस, बायबॅक वगैरेंचे तपशील)

३१ ऑक्टोबर २०२२ : एशियन पेंट्स – ४४०% अंतरिम लाभांश

३१ ऑक्टोबर २०२२ : नेस्ले इंडिया – १२००% दुसरा अंतरिम लाभांश

१ नोव्हेंबर २०२२ : हिंदुस्तान युनिलिव्हर – १७००% अंतरिम लाभांश

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whats happening next week date wise schedule market happenings and events asj
Show comments