UHNIs Investment: शेअर बाजारातील अस्थिरता सुरू असल्यामुळे भारतातील अतिश्रीमंत व्यक्ती (Ultra High Net Worth Individuals – UHNIs) इक्विटी शेअर्समध्ये पैसे गुंतवत आहेत, अशी माहिती कोटक बँकेने केलेल्या अहवालातून समोर आली आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्ती यांनी केलेल्या गुंतवणुकीवर आधारित ‘टॉप ऑफ दत पिरॅमिड’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अतिश्रीमंत व्यक्ती त्यांची ३२ टक्के गुंतवणूक इक्विटीजमध्ये तर ८९ टक्के गुंतवणूक त्यांच्या पसंतीच्या शेअर्समध्ये करत आहेत. त्यानंतर म्युच्युअल फंड ८३ टक्के, पीएमएस फंड ५५ टक्के, विमा / युलिप्स मध्ये ४० टक्के आणि सूचीबद्ध नसलेल्या स्टॉकमध्ये १५ टक्के गुंतवत आहेत.
कोटक बँकेच्या ‘टॉप ऑफ दत पिरॅमिड’ या अहवालाचा हा २० वा अंक आहे. श्रीमंत आणि अतिश्रींमतांच्या गुंतवणुकीचा कल, खर्च करण्याची पद्धत आणि श्रीमंताच्या आकांक्षा याबाबतची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, अतिश्रीमंतांच्या (UHNIs) आर्थिक गतीवीधींमुळे आयपीओला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. या अहवालासाठी कोटककडून १५० श्रीमंत (HNIs) आणि अतिश्रीमंतांच्या (UHNIs) मुलाखती घेण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

भारतात २०२४ च्या सुरुवातीला अतिश्रीमंतांची संख्या २.१८ लाख एवढी होती. जी २०२८ पर्यंत ४.३० लाख पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

विदेशात वाढती गुंतवणूक

अतिश्रीमंत व्यक्ती विदेशातही गुंतवणूक (Global Allocations) करण्यास प्राधान्य देत आहेत. यासाठी अमेरिकेला पसंती देण्यात येत असून त्यानंतर युके, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती यांचा क्रमांक लागतो. LRS ची (लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम) वाढलेली मर्यादा, अनुकूल नियम आणि धोरणे, त्याशिवाय बदलत्या जागतिक घडामोडी या घटकांमुळे जागतिक बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

अहवालासाठीच्या मुलाखतीमध्ये सहभागी झालेल्या ५८ टक्के लोकांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत चांगल्या परताव्याची अपेक्षा असल्यामुळे ते त्याठिकाणी पैसे गुंतवत आहेत. पोर्टफोलियोमध्ये विविधता आणण्यासाठी ४९ टक्के आणि व्यवसाय करण्याची सुलभता असल्यामुळे ४० टक्के लोक विदेशात गुंतवणूक करत आहेत.

जागतिक गुंतवणूकदारांपैकी ४७ टक्के गुंतवणूकदार निवासी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य देत आहेत. तर जागतिक इक्विटीमध्ये (४२ टक्के) म्युच्युअल फंडात (४२ टक्के) यांना प्राधान्य दिले जात आहे.

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढली

इक्विटीजनंतर रिअल इस्टेटला श्रीमंतानी अधिक पसंती दिलेली दिसते. अतिश्रीमंताच्या गुंतवणूक पोर्टफोलियोमध्ये व्यावसायिक आणि निवासी रिअल इस्टेटमध्ये अधिक गुंतवणूक केल्याचे दिसते.

कोटक महिंद्रा बँकेच्या बँकिंग विभागाचे सीईओ ओईशर्य दास म्हणाले की, आमच्या अहवालातून असे दिसून येते की, श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्ती त्यांच्या पोर्टफोलियो आणि गुंतवणुकीत विविधता आणू पाहत आहेत. यासाठी ते विदेशातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे २०२८ मध्ये त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खर्च होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where are indias richest people invest their money top of the pyramid report reveals kvg