गेल्या आठवड्यात इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील तरुणांना कार्य करण्याची उत्पादकता वाढवण्यासाठी आठवड्यातून ७० तास काम करण्याचे आवाहन केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. नारायण मूर्तींच्या वक्तव्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक जणांनी नारायण मूर्तींच्या विधानाचं समर्थन केलंय, तर काहींनी नारायण मूर्तींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे पॉडकास्ट केलेल्या या विधानानंतर नेटिझन्सनी इन्फोसिसच्या सह संस्थापकांवर टीकाही केलीय, तर काही सीईओंनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. जसे की, ओलाचे भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या वक्तव्याशी सहमत दर्शवली आहे. ते म्हणाले की, कर्मचार्यांना कामावर अधिक तास घालवण्याची गरज आहे. मूर्तींच्या पत्नी सुधा मूर्तीदेखील वादात सामील झाल्या असून, त्यांनी नारायण मूर्ती आठवड्यातून ८० ते ९० तास काम करीत असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांना त्यापेक्षा कमी तास काम करणं माहीत नसल्याचंही सुधा मूर्तींनी अधोरेखित केलं.
परंतु जास्त तास काम केल्यानं चांगली उत्पादकता वाढत असण्यावरही अनेकांनी जोर दिला आहे. RPG एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनीसुद्धा आपलं मत प्रदर्शन केलं आहे. ५० ते ७० तास काम करणेच फक्त महत्त्वाचे नाही, तर तुमची स्वतःची महत्त्वाकांक्षा, तुमचा उद्देश आणि तुमची उत्पादकता वाढवणेही आवश्यक आहे. खरं तर पारंपरिकरीत्या पाच दिवसीय कामाची पद्धत ही “मृत” संकल्पना आहे, त्यामुळे आपण भविष्य आणि वर्तमान विचारात घेता हायब्रिड कामाची पद्धत अंगीकारणे गरजेचे आहे. कामाच्या तासांची संख्या आणि उत्पादकता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. जगभरातील कर्मचारी किती तास काम करतात? कोणत्या देशांमध्ये सर्वात लांब आणि सर्वात लहान कामाचा आठवडा आहे? हेसुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
यूएई, गांबिया, भूतान, लेसोथो, कांगो, कतार, भारत, मॉरिटानिया, लायबेरिया, बांगलादेश या देशांमध्ये तरुण सर्वाधिक काम करतात, असं पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे काही देशांमध्ये लोक कमी तासही काम करतात, मायक्रोनेशिया, इराक, फ्रान्स, सोमालिया, इथिओपिया, ऑस्ट्रिया, रवांडा, मोझांबिक, किरिबाती, व्हानुआतू या देशातील लोक कमी तास काम करतात.
हेही वाचाः LPG Price Hike : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ, ‘एवढ्या’ रुपयांनी महागला; तुमच्या शहरातील दर काय?

तसेच जगातील दहा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तरुण किती तास काम करतात, याचीही आकडेवारी खाली दिलेली आहे.

काय म्हणाले होते नारायण मूर्ती?
भारतात कार्य करणाऱ्यांची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. ती वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करावे. देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन हा देश माझा आहे म्हणा. मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे केले होते, असं नारायण मूर्ती म्हणाले होते.