राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी पुण्यात भेट घेतली होती. शनिवारी सायंकाळी झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकावंर तुफान टीका केली होती. परंतु, तरीही या दोघांनी पुण्यातील एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरी भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया दोघांनीही दिली आहे. तरीही या भेटीमागे राजकीय अर्थ काढला जातोय. तसंच, ज्यांच्या घरी भेट घेतली ते अतुल चोरडिया नक्की कोण? असा प्रश्न विचारला जातोय. अतुल चोरडिया हे जगप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे पुण्यात अनेक प्रकल्प आहेत. एवढंच नव्हे तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ते व्यावसायिक भागिदारही आहेत.
पुण्यात पंचशील रिअॅल्टी ही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कंपनी आहे. २००२ साली याची स्थापन झाली होती. अतुल चोरडिया हे या कंपनीचे मालक आहेत. देशातील रिअॅल्टी आणि हॉस्पिटालिटी क्षेत्रात या कंपनीचे योगदान आहे. ऑफिस पार्क, निवासी, रिटेल मॉल्स आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या अनेक बांधकामांत लक्झरीसाठी नवीन बेंचमार्क सेट करण्यात पंचशील रियल्टीची भूमिका महत्त्वाची आहे. पंचशील रियल्टी प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फिट आउट मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि रेसिडेन्शियल लीजिंगसारख्या सेवादेखील पंचशील रिअॅल्टीकडून देण्यात येतात.
हेही वाचा >> शरद पवारांची भेट चोरडियांच्याच घरी का घेतली? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण!
उद्योगक्षेत्रात असलेले अतुल चोरडिया यांना कला, क्रिडा, राजकारण याचीही आवड आहे. ते विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सहाय्य करत असतात. अतुल चोरडिया हे मुळचे पुण्याचेच असून त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
अतुल चोरडिया यांना मिळालेले पुरस्कार
- राष्ट्रीय मोटोक्रॉस चॅम्पियनशिप १९८५-८६ चे विजेते
- वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC) काऊन्सिलचे सदस्य
- FICCI रिअल इस्टेट समितीचे सदस्य
- अर्न्स्ट आणि यंग एंटरप्रेन्युरियल स्पिरिट, २०१५ साठी नामांकित
- वार्षिक हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साउथ एशिया (HICSA) मध्ये प्रतिनिधी.
- महाराष्ट्राचे महापुरुष म्हणून ओळखले जाणारे आणि व्यवसाय विकासातील समर्पण आणि सेवेसाठी जैन समाज पुरस्काराचे प्रतीक
- ‘टाइम्स मेन ऑफ द इयर अवॉर्ड’, एशिया वन वर्ल्डचे महान नेते, ‘ईटी एज महाराष्ट्र अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये बिझनेस इम्पॅक्ट ऑफ द इयर अवॉर्ड, हॉटेलियर इंडिया अवॉर्ड्समध्ये रिट्झ कार्लटनसाठी ‘डेव्हलपर ऑफ द इयर अवॉर्ड’, कौतुक राऊंड टेबल इंडियाकडून दृढ समर्थन आणि प्रयत्नांसाठी पुरस्कार, लेक्सिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड एक्सलन्स येथे नेतृत्व चर्चेसाठी पुरस्कार आणि ITP मीडिया येथे उत्कृष्ट वक्ता म्हणून ट्रिनिटी सक्सेस अवॉर्ड मिळाला
- २०२२ सालासाठी रिअल इस्टेट आयकॉन्स ऑफ पुणे पुरस्काराने सन्मानित
डोनाल्ड ट्र्म्प यांच्याशी व्यावसायिक संबंध
पंचशील समूहाने पुण्यातील कल्याणी नगर येथे ट्रम्प टॉवर्स हा प्रकल्प उभारला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रकल्प असून अतुल चोरडिया हे या प्रकल्पात व्यावसायिक भागिदार असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. साडेचार एकर भूखंडावर हा प्रकल्प तयार करण्यात आला असून येथे दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीत २३ फ्लॅट असून प्रत्येक फ्लॅट ६ हजार स्क्वेअर फुटांचा आहे. रितिक रोशन, रणबीर कपूरसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांचे या टॉवरमध्ये फ्लॅट्स आहेत. काही परदेशी नागरिकांनी ४ ते ५ लाख प्रति महिना भाडे तत्त्वावरही येथे फ्लॅट्स घेतले आहेत.
पवार कुटुंबियांशी काय संबंध?
“चोरडिया यांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत. चोरडियाचे वडील शरद पवारांचे वर्गमित्र होते. शरद पवार व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. माझा कार्यक्रम चांदणी चौकात होता. तो कार्यक्रम संपवून माझे पुढचे कार्यक्रम होते. चोरडियांनी शरद पवारांना जेवायला बोलवलं होतं. जयंत पाटील शरद पवारांबरोबर होते. कारण तेही त्या व्हीएसआयच्या कमिटीत आहेत. मीही व्हीएसआयला आहे. पण नितीन गडकरींनी चांदणी चौकातल्या एका कार्यक्रमाबाबत मला महिन्याभरापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे मला त्या मीटिंगला हजर राहायचं होतं. व्हीएसआयमध्ये मी सांगितलं की मी येऊ शकत नाही. त्यामुळे जर दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्यातून वेगळा अर्थ काढायचयं काहीच कारण नाही”, असं अजित पवारांनी आज स्पष्ट केलं.