Adani Group Stocks: काल शेअर बाजारातील सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स एक हजार अंशांनी गडगडला. तर निफ्टीमध्येही ३४५.५५ अंशाची घसरण दिसून आली. तसेच भारतीय रुपया डॉलर ५८ पैशांच्या दोन वर्षांतील सर्वाधिक घसरणीसह ८६.६२ च्या सर्वकालीन नीचांकावर गेला. एकूणच काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली असली तरी आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बाजारात तेजी दिसून येत आहे. त्यातही अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे.
अदाणी पॉवरच्या शेअरमध्ये सर्वाधिक १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बीएसइ इंडेक्सवर हा शेअर ४५० वरून ५४० वर पोहोचला. तर अदाणी ग्रीन एनर्जीमध्ये १७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. आजच्या दिवसात या शेअरने ११९ रुपयांची कमाई केली असून तो १,००९.०० च्याही पुढे गेला. अदाणी एंटरप्राइजेस ७.८४ टक्के तर अदाणी विल्मोर २.५२ टक्के आणि अदाणी पोर्ट्समध्ये ५.३३ टक्क्यांनी वाढ झाली. अदाणी एनर्जी सोल्यूशनमध्येही १३ टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. तर एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही शेअर्सही हिरव्या रंगात दिसत होते.
हे वाचा >> JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
तेजी येण्याचे कारण काय?
बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार, मोठ्या प्रमाणात निधी गोळा केल्यामुळे अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. लक्ष्मीश्री इन्वेस्टमेंट अँड सिक्युरिटीजच्या संशोधन विभागाचे प्रमुख अंशुल जैन यांनी लाईव्ह मिंटशी बोलताना सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प जिंकून आल्यानंतर अदाणी समूहाला विदेशातून निधी गोळा करणे आणखी सोपे जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळेच आज अदाणी समूहाच्या शेअर्सची खरेदी वाढल्याचे चित्र दिसले.
मिंटने दिलेल्या बातमीनुसार, अदाणी समूहाच्या प्रवक्त्यांनी मात्र या अंदाजावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र व्यवसाय वृद्धीसाठी अदाणी समूह वेगवेगळ्या संस्थांशी वार्तालाप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांकडून सावधानतेचा इशारा
आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसत असली तरी गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. “सट्टेबाजीतून अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. त्यामुळे यावर जोपर्यंत अधिकृत काही माहिती येत नाही, तोपर्यंत नवी खरेदी करण्याचा सल्ला आम्ही देत नाही”, असे हेन्सेक्स सिक्युरिटीजचे महेश ओझा यांनी सांगितले. अदाणी समूहाने अधिकृत विधान करेपर्यंत खरेदी करू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.