भारतातील श्रीमंत व्यक्ती विदेशात जाऊन स्थायिक होण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यात आता आणखी वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील श्रीमंतापैकी २२ टक्के लोक विदेशात जाऊन स्थायिक होण्याची योजना आखत आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या टॉप ऑफ द पिरॅमिड या अहवालातून ही बाब समोर आले आहे. अहवालामधील माहितीनुसार, भारतातील पाच अतिश्रीमंत व्यक्तींपैकी एक जण विदेशात जात आहे किंवा तिथे स्थायिक होण्याची पूर्वतयारी करत आहे.

विदेशातील राहणीमान, चांगली जीवनशैली, व्यवसायासाठीचे सुलभ वातावरण यासारख्या अनेक घटकांमुळे सुमारे २२ टक्के अतिश्रीमंत भारतीय देश सोडून जाऊ इच्छितात.

२०२३ मध्ये, २५ कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या २.८३ लाख भारतीयांना अतिश्रीमंत (Ultra High Net Worth Individuals – UHNIs) व्यक्ती म्हणून गणले गेले. या लोकांकडून एकूण २.८३ लाख कोटींची संपत्ती आहे. २०२८ पर्यंत अतिश्रीमंतांचा आकडा ४.३ लाख होणार असून त्यांची संपत्ती ३५९ लाख कोटी होईल, असे या अहवालात म्हटले आहे.

कोटक बँकेच्या अहवालासाठी १५० श्रीमंतांचे सर्वेक्षण करण्यात आले. यादरम्यान श्रीमंतांनी सांगितले की, ते अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशात स्थायिक होऊ इच्छितात. युएइ मधील गोल्डन व्हिसा कार्यक्रम श्रीमंताना खुणावत आहे. या व्हिसाद्वारे श्रीमंतांना अधिक काळ त्या देशांत राहण्याची संधी मिळते.

श्रीमंत लोक देश का सोडत आहेत?

विदेशात जाऊन स्थायिक होण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. चांगली जीवनशैली, आधुनिक राहणीमान, आरोग्यच्या उत्तम सुविधा, उच्च प्रतीच्या शैक्षणिक सुविधा, अनुकूल कर नीती आणि व्यवसाय प्रिय वातावरण.. अशी काही प्रमुख कारणे आहेत.

श्रीमंतांनी देश सोडल्यास पैसा देशाबाहेर जाणार?

कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्ष गौतमी गवाणकर म्हणाल्या की, श्रीमंतांचे स्थलांतर होत असले तरी त्यांच्यासह भांडवलही जाईल, असे मानता येणार नाही. भारतीय नागरिक आपल्याबरोबर अडीच लाख डॉलर बाहेर नेऊ शकतात. अनिवासी भारतीयांसाठी ही मर्यादा १० लाख डॉलर इतकी आहे. काही श्रीमंतांना विदेशात स्थायिक व्हायचे आहे, मात्र त्याचबरोबर त्यांना भारताचे नागरिकत्वही गमवायचे नाही.