Zerodha CEO Nithin Kamath: श्रीमंत लोकांबद्दल भारतीय नागरिकांमध्ये एकप्रकारची असूया किंवा तिरस्कार दिसून येतो का? या प्रश्नाचे उत्तर झिरोधा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. बंगळुरू येथे ‘टेकस्पार्क्स २०२४’ या कार्यक्रमात बोलत असताना नितीन कामत यांना सदर प्रश्न विचारण्यात आला होता. युअर स्टोरीच्या संस्थापक श्रद्धा शर्मा म्हणाल्या की, श्रीमंत लोकांबद्दलचा भारत आणि अमेरिकन नागरिकांमधील दृष्टीकोन वेगवेगळा का आहे?
श्रद्धा शर्मा म्हणाल्या की, अमेरिकेत एखाद्याने खूप सारे पैसे कमवले आणि ते खूप यशस्वी झाले तर ते महागडे वाहन आणि इतर वस्तू घेतात. त्यांना प्रसिद्धी मिळते. अमेरिकेत हे खूप सामान्य आहे. खासगी विमान वैगरे विकत घेणे, हेदेखील तिथे सामान्य मानले जाते. समाजाला यात काही वावगे वाटत नाही. पण जर भारतात तुम्ही पाहाल, जर एखादा व्यक्ती खूप पैसे मिळवायला लागला, तर लोक त्याच्याबाबतीत वेगळा विचार करतात. याने काही तरी गडबड करून पैसे कमविलेले असू शकतात, अशी शंका उपस्थित केली जाते. असे का होते?
हे वाचा >> Zerodha चे संस्थापक नितीन अन् निखिल कामत यांना आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ‘एवढं’ मानधन मिळालं
नितीन कामत काय म्हणाले?
४४ वर्षीय नितीन कामत यांनी उत्तर देत असताना श्रद्धा शर्मा यांच्या मताशी सहमती दर्शविली. ते म्हणाले, भारतात संपत्ती धारणेत कमालीची असमानता आहे. तसेच भारतीयांचा दृष्टीकोन हा समाजवादी आहे. दुसरीकडे अमेरिका हा भांडवलशाही लाभलेला देश आहे. आपल्या इथे भांडवलशाहीचे ढोंग आणणारा समाजवादी समाज आहे. आपल्याही मनात कुठेतरी समाजवाद वसलेला आहे.
यात मानसिकतेत काही बदल होतील का? असे विचारले असता नितीन कामत म्हणाले की, यात बदल होतील, असे मला वाटत नाही. कारण जोपर्यंत आपल्या देशात संपत्तीबाबत असमानता आहे. तोपर्यंत या परिस्थितीत बदल होईल, असे मला वाटत नाही.