Why Market is Falling Today, Know Reason: आठवड्याच्या आज पहिल्याच दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीला उतरती कळा लागल्याचे दिसले. निफ्टीमध्ये १.१ टक्के तर सेन्सेक्समध्ये १.२० टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. बाजार बंद होताना ही घसरण कितीवर स्थिरावते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेअर बाजरात आज घसरण होण्याची तीन कारणे जाणून घ्या…
जागतिक बाजारात आलेली मंदी
शुक्रवारी यूएस शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, त्याचे परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारात दिसून आला. जॉब रिपोर्टमुळे अमेरिकन फेडरलकडून दर कपातीची शक्यता मावळल्यामुळे यूएस शेअर बाजारावर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून आले. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.२१ टक्क्यांनी घसरला. आशियाचा शेअर बाजार Dow हाही १.१५ टक्क्यांनी गडगडला. हाँगकाँगचा हँग सेंग १.१४ टक्क्यांनी खाली आला. नॅसडॅकमध्येही १.६३ टक्क्यांची घसरण झाली. जगातील प्रमुख शेअर बाजारात शुक्रवारी घसरण पाहायला मिळाल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ
WTI (West Texas Intermediate) वर सोमवारी सकाळी कच्च्या तेलाची किंमत १.८३ टक्क्यांनी वाढून ७७.९७ डॉलरवर पोहोचली आहे. तर ब्रेंट क्रूड तेलाची किंमत १.७४ टक्क्यांनी वाढून ८१.१५ डॉलरवर पोहोचली. मेहता इक्विटीजच्या संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी फायनान्शियल एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, अमेरिकेने रशियन तेलावर निर्बंध लादल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती तीन महिन्यातील उच्चांक गाठण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच उत्तर गोलार्धातील थंड हवामान आणि चीनमधील धोरण बदलाच्या अपेक्षेमुळे उर्जेच्या मागणीत वाढ झाली असून तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती केअरएज रेटिंग्जमधील सहयोगी अर्थशास्त्रज्ञ मिहिका शर्मा यांनी दिली.
विदेशी वित्त संस्थांकडून वाढलेली विक्री
विदेशी वित्त संस्था (FII) भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करत आहेत. NSDL च्या वेबसाईटवर दिलेल्या डेटानुसार, जानेवारीतील पहिल्या २ आठवड्यांमध्ये विदेशी वित्त संस्था किंवा FII नी २२,२५९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. २०२४ या वर्षाचा विचार केला तर या वित्तसंस्थांनी एकूण १.२० लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकून गुंतवणूक काढून घेतल्याचे दिसून आले. मागच्या तीन महिन्यात विदेशी वित्त संस्थांनी १,७७,४०२.४९ कोटींची निव्वळ विक्री केली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, डॉलर निर्देशांक सशक्त होत आहे. सध्या डॉलर निर्देशांक सारखा वर जात असून तो १०९च्या आसपास आहे. त्यामुळे भारतीय बाजारातील गुंतवणूक कमी केली जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.