Donald Trump Reciprocal Tariff on India : अमेरिकेची सत्ता हाती येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत जे पाहून जग अचंबित झालं आहे. यापैकीच एक निर्णय म्हणजे अमेरिकेने आयात मालावरील शुल्क अर्थात टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडा व मेक्सिकोतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के शुल्क किंवा टॅरिफ लागू केलं आहे. याची अंमलबजावणी ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. तर, त्यांनी भारत व चीनवर अतिरिक्त आयात शुल्क लादलं आहे.
संसदेत केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की “भारत अमेरिकेवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. ही चुकीची बाब आहे. आम्ही देखील येत्या २ एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल, त्या देशावर आम्ही देखील तितकंच आयात शुल्क (Reciprocal Tariff) लादू. ट्रम्प यांच्या या निर्णयांचा जगभरातील कित्येक देशांमधील शेअर मार्केटवर परिणाम झाला आहे. दरम्यान, भारतीय स्टेट बँकेने सोमवारी एक संशोधन अहवाल सादर केला आहे. या अहवालात बँकेने म्हटलं आहे की अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा भारतावर फार कमी परिणाम दिसेल.
भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर केवळ ३.५ टक्के परिणाम होईल : एसबीआय
एसबीआयने म्हटलं आहे की ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाचा भारतावर नाममात्र परिणाम दिसेल. अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर केवळ ३.५ टक्के परिणाम होईल. भारताने आपली निर्यात काही प्रमाणात वाढवली तर अमेरिकेच्या टॅरिफचा काहीच परिणाम दिसणार नाही. कारण भारताने आता आपल्या निर्यातीत विविधता आणली आहे.
“ट्रम्प यांच्या निर्णयाचा मोठा फटका बसणार नाही”
एसबीआयने आपल्या संशोधन अहवालात म्हटलं आहे की अमेरिकेने रेसिप्रोकल टॅरिफ लागू केल्यास भारतातून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत ३ ते ३.५ टक्के घट होईल. मात्र तेच निर्यातदार आपला माल इतर देशांना पाठवतील. तसेच भारताने आपल्या निर्यातीत विविधता आणली आहे. त्याचबरोबर भारत युरोप, मध्य पूर्वमार्गे अमेरिकेपर्यंत निर्यात करतो. मात्र आता भारत इतर मार्गांवर काम करत आहे. नवी पुरवठा साखळी तयार करत आहे. या सगळ्या प्रयत्नांमुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा मोठा फटका बसणार नाही.