Nike and Adidas Trump’s tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातल्या देशांवर समन्यायी व्यापारकर लागू केला आहे. ट्रम्प यांनी लागू केलेल्या व्यापारकराचा फटका जगातिक पातळीवर प्रसिद्ध अशा फूटवेअर ब्रँड्सना बसणार आहे. व्हिएतनामवर ४६ टक्के कर लावण्यात आला आहे. या देशात जगातील प्रसिद्ध अशा नायकी आणि अदिदास फूटवेअर ब्रँड्सचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नायकी आणि अदिदासचे बूट आगामी काळात महाग होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

क्रीडा साहित्य, बूट आणि कपडे तयार करणारे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध असे नायकी आणि अदिदास हे ब्रँड्स मागच्या दशकभरापासून त्यांच्या वस्तूंची निर्मिती व्हिएतनाममध्ये करत आहेत. नायकीच्या २०२४ च्या वार्षिक अहवालानुसार सध्या नायकीचे अर्ध्याहून अधिक बूटाचे उत्पादन व्हिएतनाममध्ये होत आहे. तर अदिदास कंपनीचे २७ टक्के उत्पादन व्हिएतनाममध्ये घेतले जाते.

ब्लुमबर्गच्या अहवालानुसार व्हिएतनाममधून नायकी आणि अदिदासचे सर्वाधिक उत्पादने जगभरात जातात. या दोन्ही कंपन्यांना व्हिएतनाममधून एकत्रित वार्षिक महसूल २० बिलियन डॉलर इतका मिळतो.

समन्यायी व्यापारकराचा फूटवेअर ब्रँड्सवर काय परिणाम होणार?

अमेरिकेने लादलेल्या समन्यायी व्यापारकराचा फटका फूटवेअर ब्रँड्सना आधीपासूनच बसला आहे. चीन आणि मेक्सिकोवर अमेरिकेने व्यापारकर लावल्यामुळे नायकीला या तिमाहित कमी नफा मिळण्याची शक्यता आहे.

ब्लुमबर्ग इंटेलिजेंसच्या विश्लेषक पूनम गोयगल यांनी लाइव्हमिंटला दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्यांना पुरवठा साखळी बदलणे किफायतशीर ठरणार नाही. फूटवेअरचे उत्पादन घेण्यासाठी विशिष्ट कौशल्ये आणि तशी कारखाने स्थापने महत्त्वाचे असते. पण व्यापारकर वाढविल्यामुळे थेट ग्राहकांना याचा किती बोजा सहन करावा लागेल, हे आताच सांगता येणार नाही.

व्हिएतनाममध्ये कपड्यांचेही मोठे ब्रँड्स

नायकी आणि अदिदास यांच्याशिवाय व्हिएतनाममध्ये अनेक कपड्यांचे ब्रँड्सही आहेत. युनिक्लोची मूळ कंपनी, फास्ट रिटेलिंग कंपनी, हेनेस अँड मॉरिट्झ एबी (एच अँड एम) आणि गॅप इंक अशा प्रसिद्ध ब्रँड्सच्या कपड्यांची निर्मिती इथे होते. व्हिएतनाममध्ये तयार झालेल्या उत्पादनांची अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. व्हिएतनाम टेक्सटाइल अँड अपेरल असोसिएशनच्या माहितीनुसार व्हिएतनाममधून दरवर्षी ४४ बिलियन डॉलर्सची निर्यात होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात चीनबरोबर व्यापारयुद्ध छेडले गेल्यामुळे फूटवेअर आणि टेक्स्टटाइल कंपन्यांनी व्हिएतनाममध्ये उत्पादन घेण्यास सुरुवात केली होती.

व्हिएतनाममध्ये उत्पादन का?

जगातील मोठे ब्रँड्स त्यांचे उत्पादन आता व्हिएतनाममध्ये घेण्यास प्राधान्य देतात. कौशल्यावर आधारित मनुष्यबळ अतिशय किफायतशीर दरात मिळत असल्यामुळे कंपन्यांना व्हिएतनाम खुणावते. तसेच व्हिएतनामला जोडणारा रस्ता हा भू-राजकीयदृष्ट्या कमी संवेदनशील मानला जातो. याशिवाय युरोपियन संघ आणि युनायटेड स्टेट्स यांच्याशी व्हिएतनामचा व्यापारी करार झालेला आहे.