पीटीआय, नवी दिल्ली : जागतिक बँकेने आगामी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीच्या दरासंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ६.६ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. मात्र भारत जगातील सात सर्वात मोठ्या उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असे जागतिक बँकेच्या ताज्या आर्थिक अहवालात म्हटले आहे.

येत्या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६.९ टक्के वेगाने वाढेल, असा जागतिक बँकेने यापूर्वी अंदाज वर्तविला होता. याचबरोबर चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत विकासवेग मागील वर्षातील ८.७ टक्क्यांच्या तुलनेत ६.९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर त्यापुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये विकासदर आणखी खालावून तो ६.१ टक्के असा राहण्याचा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढती अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळा आणि वाढत्या महागाईमुळे गुंतवणूक आणि निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यापरिणामी अर्थव्यवस्थेची चाल अपेक्षेपेक्षा संथ राहण्याची शक्यता असल्याने जागतिक बँकेने बुधवारी हा खालावलेला अंदाज जाहीर केला. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवरील खर्च आणि विविध व्यवसाय सुलभीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यामुळे केवळ खासगी गुंतवणूक आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार होईल. जागतिक बँकेने पुढील आर्थिक वर्ष ६.६ टक्के वाढीचा अंदाज वर्तविला असला तरी तो ६ टक्क्यांपर्यंत खालावण्याचा कयास व्यक्त करण्यात आला आहे.