देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झेरोधाचे संस्थापक निखिल कामत यांनी कुटुंब आणि वारसा यासंबंधीचे आपले विचार व्यक्त केले. ‘डब्लूटीएफ’ या पॉकास्टसाठी निखिल कामत यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. मुलांना जन्म देण्यात आपल्याला फारसा रस नाही, असे मत व्यक्त केले. म्हातारा झाल्यानंतर आपली मुलं आपल्याला सांभाळतील, या आशेवर मला मुलांच्या संगोपनात दोन दशक वाया घालवायचे नाहीत. त्यामुळेच मी मुलांना जन्म दिला नाही, असेही ते म्हणाले. निखिल कामत हे भारतातील सर्वात कमी वयात मोडणाऱ्या अब्जाधीशांपैकी एक आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत नुकताच त्यांचा समावेश करण्यात आला होता.
निखिल कामत काय म्हणाले?
पॉडकास्टमध्ये बोलताना निखिल कामत म्हणाले की, मी मुलांच्या संगोपनावर १८ ते २० वर्ष घालविल्यानंतर जर नशीबाने साथ दिली तरच मुलांकडून माझी देखभाल केली जाईल. जर १८ वर्षांचे झाल्यानंतर मुलांनाच हे सर्व आवडले नाही आणि ते पालकांना सोडून गेले तर? तसेच आपला वारसा सोडून जाण्याच्या पद्धतीवर आपला विश्वास नसल्याचेही कामत यांनी सांगितले. ते म्हणाले, आपण स्वतःला आहे त्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मानतो. आपण इतर प्राण्यांप्रमाणेच जन्म घेतो आणि काही वर्षांनी मृत पावतो. आपण गेल्यानंतर इथलं काहीही आपल्या आठवणीत राहणार नाही.
…म्हणून निखिल कामत यांनी आपली बहुतांश संपत्ती केली दान; झिरोधा सहसंस्थापक यांनी सांगितले ‘कारण’
‘गिव्हिंग प्लेज’बाबत निखिल कामत यांचे मत काय?
जगातील काही निवडक श्रीमंत लोकांनी त्यांच्या कमाईतील मोठा हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द गिव्हिंग प्लेज’ या संकल्पनेखाली जगभरातील २४१ परोपकारी व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. भारतातून चार धनाढ्यांचा यात समावेश असून त्यातपैकी निखिल कामत हे एक आहेत. याबाबत अधिक माहिती देताना कामत म्हणाले, मृत्यूनंतर आपण लोकांच्या कायम स्मृतीत राहावे, हा अट्टाहास कशासाठी? उलट जिवंत असताना आपण जितक्या लोकांना भेटू तेव्हा त्यांच्याशी चांगले वर्तन केले पाहीजे.
बँकेत ठेवण्यापेक्षा पैशांचा योग्य विनियोग करावा
जीवनाबाबतच्या दृष्टीकोनाविषयी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक भारतीयाने याबाबत गंभीर विचार करण्याची गरज आहे. माझे वय आता ३७ आहे. भारतीय नागरिकाचे सरासरी वयोमान ७२ वर्षांचे आहे, असे मानले तर माझ्या आयुष्याची आता ३५ वर्ष बाकी आहेत. त्यामुळे बँकेत पैसे अडकवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. यापेक्षा ते पैसे मी माझ्या आवडीच्या कामावर खर्च करेन. मागच्या २० वर्षांत मी जितके पैसे कमविले किंवा पुढच्या २० वर्षांत जितके पैसे कमावणार आहे, ते मी परोपकारी कार्यावर खर्च करेन.