Deepinder Goyal Billionaire : प्रसिद्ध फूट डिलिव्हरी स्टार्टअप झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल हे आता अब्जाधीश बनले आहेत. देशातील इतर उद्योजकांप्रमाणे अब्जाधीश होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला आहे. मागच्या वर्षी जुलै २०२३ पासून झोमॅटोच्या समभागात ३०० टक्केंची वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे गोयल यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. झोमॅटोच्या समभागात आज अडीच टक्क्यांची वाढ होऊन २३० या विक्रमी उंचीवर झोमॅटोचा समभाग पोहोचला. त्यामुळे झोमॅटोचे बाजार मूल्य १.८ ट्रिलियनने वाढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत दीपंदर गोयल यांची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गोयल २१७३ व्या क्रमाकांवर आहेत.

हे वाचा >> ग्राहक न्यायालयाचा झोमॅटोला दणका; १३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न दिल्याने ६० हजारांची भरपाई देण्याचे आदेश

झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर समभागाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता हे शुल्क पाच रुपयांवरून सहा रुपये करण्यात आले आहे. दिल्ली आणि बंगळुरूच्या काही भागातच सध्या ही वाढ करण्यात आली आहे. यामुळे कंपनीच्या नफ्यावर सकारात्मक परिणाम होईल, असे सांगितले जाते.

मनीकंट्रोल या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, झोमॅटोचे संस्थापक ४१ वर्षीय दीपंदर गोयल हे सर्वात श्रीमंत सीईओ बनले आहेत. गोयल यांच्याकडे झोमॅटोचे ३६.९५ कोटी समभाग असून त्यांची कंपनीतील भागीदारी ४.२४ टक्के एवढी आहे. २०२३ पासून झोमॅटोच्या समभागात वाढ नोंदविली जात आहे. या वाढीमुळे आता क्विक कॉमर्स व्यवसायातही तेजी येण्याची शक्यता आहे. ब्लिंकिट आणि इतर कंपन्यांनाही चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे वाचा >> ४१ व्या वर्षी झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी मॉडेलसह केलं दुसरं लग्न; पत्नीची ‘ती’ पोस्ट व बायो पाहून भारतीय खुश

कोण आहेत दीपंदर गोयल?

मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या दीपंदर गोयल यांनी आयआयटी दिल्लीतून गणित आणि कंम्प्युटिंगमध्ये पदवी मिळवली आहे. खाद्यप्रेमी असलेल्या गोयल यांनी याच आवडीला व्यवसायात रुपांतरीत केले. ऑनलाइन फूड डिलीव्हरी APP विकसित करून त्यांनी घरबसल्या जेवण मागविण्याची सोय उपलब्ध करून दिली. २००८ मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरातूनच ही कंपनी सुरु केली होती व त्यावेळेस त्याचे नाव फूडीबे असे ठेवण्यस्त आले होते. सध्या झोमॅटोचा व्यवसाय हा भारतातील १००० हुन अधिक शहरांमध्ये पसरला आहे.

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी मेक्सिकन उद्योजक आणि मॉडेल ग्रेसिया मुनोजशी लग्न केले आहे.

बहुचर्चित व प्रसिद्ध असा हा झोमॅटोचा प्लॅटफॉर्म अनेकदा वादात सुद्धा सापडला आहे, अलीकडेच झोमॅटोने ‘शुद्ध शाकाहारी’ डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हजना वेगळी ओळख देण्यासाठी हिरव्या रंगाचा ड्रेस कोड घोषित केला होता. पण यावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाल्याने कंपनीतर्फे हा निर्णय मागे घेण्यात आला.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato founder ceo deepinder goyal joins billionaire club kvg
Show comments