Zomato Layoffs: अन्न आणि किराणा वितरण क्षेत्रात गेल्या काही काळापासून मंदीसदृश्य परिस्थिती आहे. याचा फटका झोमॅटो सारख्या ऑनलाइन खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या मोठ्या कंपनीला बसला आहे. झोमॅटोने त्यांच्या ग्राहक सेवा विभागातील ६०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. एकाबाजूला कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून दुसऱ्या बाजूला कंपनीने खर्चात कपात आणि ग्राहकांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित प्रणाली वापरण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
कर्मचारी कपात केल्याची बातमी मनीकंट्रोल या वृत्त संकेतस्थळाने दिली आहे. तसेच त्यांनी झोमॅटोची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र २६ मार्चपर्यंत कंपनीच्या वतीने कोणतेही उत्तर आले नव्हते.
गुरुग्राम येथे मुख्यालय असलेल्या कंपनीने झोमॅटो असोशिएट एक्सलेटर प्रोग्राम (ZAAP) साठी वर्षभरापूर्वी १,५०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचाऱ्यांना वर्षभरात विक्री, ऑपरेशन्स, प्रोग्राम मॅनेजमेंट, सपोर्ट, सप्लाय चेन अशा विविध विभागांमध्ये बढती देण्यात आली. तर अनेक कर्मचाऱ्यांचा करार वर्ष झाल्यानंतर पुढे सुरू ठेवलेला नाही.
मनीकंट्रोल संकेतस्थळाच्या वतीने काही माजी आणि विद्यमान कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला गेला, त्यांना एक महिन्याचे वेतन देण्यात आले आहे. तसेच खराब कामगिरी, वेळेचे पालन न केल्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. “मागच्या वर्षी झॅप या कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेल्या बहुतेक कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. गुरुग्राम आणि हैदराबादमधील त्यांच्या कार्यालयांमधून ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वातावरण खूपच तणावपूर्वक झाले आहे”, असे नाव न उघड करण्याच्या अटीवर ग्राहक सेवा विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले.
काही कर्मचाऱ्यांनी असेही म्हटले की, एआयचा वापर वाढल्यामुळे आता ग्राहक सेवेसारख्या सुविधा तंत्रज्ञानाद्वारे देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यामुळेही सदर कपात केलेली असावी.
झोमॅटोकडून ‘नगेट’ प्लॅटफॉर्मची घोषणा
झोमॅटोने ‘नगेट’ या एआयवर आधारित ग्राहक सपोर्ट प्लॅटफॉर्मची सुरुवात त्यांच्या समूहातील सर्व व्यवसायांसाठी सुरू केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, नगेटद्वारे झोमॅटो, ब्लिकिंट आणि हायपरप्युअरसाठी दरमहा १५ दशलक्षाहून अधिक सेवेसंदर्भातील प्रश्नांना उत्तरे दिली गेली.
झोमॅटोचा खाद्यपदार्थ वितरणाचा मुख्य व्यवसाय गेल्या काही काळापासून मंदावला आहे. कंपनीला टॉप आठ शहरांच्या पलीकडे जाण्यातही आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असेही मनीकंट्रोलच्या वृत्त म्हटले आहे.