Zomato Name Change: घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये मोबाइल किंवा संकेतस्थळावरून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी लोकप्रिय ठरलेल्या झोमॅटोचे नाव आता बदलण्यात आले आहे. झोमॅटोच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत झोमॅटोचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. यापुढे आता झोमॅटो इटर्नल या नावाने ओळखले जाणार आहे. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात याची घोषणा केली असून या बदलाला समर्थन द्यावे, अशी विनंती केली आहे. कंपनीच्या नावात बदल केला असला तरी अन्नपदार्थ डिलिव्हरी ब्रँडचे नाव आणि मोबाइल ॲपचे नाव झोमॅटोच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी आपल्या पत्रात म्हटले की, आम्ही जेव्हा ब्लिंकिट विकत घेतले, तेव्हा कंपनी आणि ब्रँडमध्ये फरक करण्यासाठी अंतर्गतरित्या इटर्नल हे नाव वापरण्यास सुरुवात केली होती. आता कंपनीचे संकेतस्थळ झोमॅटो.कॉम वरून इटर्नल.कॉम होणार आहे. शेअर मार्केटमध्येही झोमॅटोचे नाव बदलणार आहे. इटर्नल या ब्रँडखाली आता झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअर या कंपन्या असतील.
गोयल पुढे म्हणाले की, १७ वर्षांपूर्वी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीची सुरुवात करण्यात आली होती. मागच्या वर्षी २३ डिसेंबर रोजी आमची कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली होती. आजवरच्या प्रवासात झोमॅटोने फक्त संचालकांनाच नाही तर आमचे कर्मचारी, संस्थांत्मक भागीदार, सामान्य गुंतवणूकदार यांना चांगला नफा कमावून दिला. पण मी झोमॅटो पैसे कमविण्यासाठी सुरू केले नव्हते. मला आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करायचे होते, म्हणून मी याची सुरुवात केली होती. एके दिवशी मी शहरभर फिरून काही मेन्यू कार्ड जमा केले आणि ते एका संकेतस्थळावर अपलोड केले. मला वाटले नव्हते की, निस्वार्थी भावनेने केलेल्या या सेवेचे व्यवसायात रुपांतर होईल.
आज शेअरची स्थिती काय?
झोमॅटोने नाव बदलण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आज त्याची शेअर बाजारातील किंमत अर्ध्या टक्क्याने वाढली असून हा शेअर २३० रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षभरात झोमॅटोच्या शेअरमध्ये ६४ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली होती. तर पाच वर्षांत यात ८२ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.