व्यवस्थापनाचे धडे देणारे विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘कॉलेज फेस्टिव्हल’. उत्सवाच्या प्रारंभापासून ते सांगता करेपर्यंत इत्थंभूत तयारी करण्यासाठी विद्यार्थी दोन ते तीन महिन्यांपासून कंबर कसून तयारीला लागलेले असतात. एरवी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये मागे मागे राहणारी मुले महाविद्यालयीन उत्सव यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत असतात. या उत्सवातून बऱ्याचदा अभ्यासात काहीसे मागे असलेले मात्र इव्हेन्ट मॅनेजमेंटमध्ये अव्वल असणारे हिरेही सापडतात. वयाच्या सुरुवातीलाच मोठय़ा कॅनव्हासवर काम करण्याची संधी या उत्सवातूनच मिळते. त्यामुळे महाविद्यालयीन उत्सवात फक्त मजा-मस्ती आणि धांगडधिंगा नसतो तर त्याच्यामागे अनेक महिन्यांची मेहनत, शेकडो मुलांची सर्जनशीलता आणि विद्यार्थ्यांचे नेतृत्व पणाला लागलेले असते. काही महाविद्यालयांमध्ये तर वर्षांच्या सुरुवातीलाच या उत्सवांच्या तयारीला सुरुवात होते. अकरावी आणि तेरावीच्या नवीन विद्यार्थ्यांची ‘फ्रेशर्स पार्टी’ झाली की त्यांनाही या उत्सवांमध्ये सामील करून घेतले जाते. सध्या मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये आगामी उत्सवांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. झेव्हिअर्सचा ‘मल्हार’, एनएमचा ‘उमंग’, जीएसचा ‘कॉन्फ्लुएन्स’ आणि मुंबई विद्यापीठाचा ‘यूथ फेस्टिव्हल’ हे उत्सव येत्या जुलै, ऑगस्टमध्ये साजरे केले जाणार आहेत. हे सर्व उत्सव इतके यशस्वी आहेत की बऱ्याचदा या उत्सवांच्या नावाने महाविद्यालयांना ओळखले जाते. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव राखायचे म्हणजे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपणही असते. गेल्यावर्षीपेक्षा या वर्षांचा उत्सव अधिक चांगला कसा करता येईल यासाठी डोक्यालिटीचा वापर करून नवीन कल्पना घेऊन येतात. या वर्षीदेखील लोकांना अचंबित करणाऱ्या कल्पना आपल्या हुश्शार आणि मेहनती विद्यार्थ्यांनी आणल्या आहेत.

‘चला फेस्टिव्हलला चला’ ..असे म्हणत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर नारळ फोडून फेस्टिव्हलचा श्रीगणेशा केला आहे. हातांच्या बोटावर नाचणारे आणि नाचवणाऱ्या सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी आपल्या उत्सवांबद्दलचे अपडेट लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवात उत्सवांच्या टीम निवडीपासून सुरू झाली आहे. टीम निवडीच्या प्रक्रियेसाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित असतात मात्र यात टीमचे नेतृत्व करण्यासाठी अनुभवी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यांच्या हाताखाली नवीन विद्यार्थी चांगलेच तयार होतात असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. महाविद्यालयात नवीन अ‍ॅडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचे उत्सवांच्या निमित्ताने नव्या मुलांशी परिचय होतो. एकत्र काम करणे यातून चांगल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार होतो. अनेक उत्सवांमध्ये भारतभरातील महाविद्यालये समाविष्ट होतात. उत्सवांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. बुद्धिमत्ता चाचणी, नाच, गाणे, वाद्य, वादविवाद, साहित्य, नाटक अशा विविध विषयांवर या स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रत्येक विषयांच्या स्पर्धासाठी वेगवेगळी टीम तयार करण्यात आलेली असते आणि या सर्वाच्यावर उत्सवप्रमुख काम करीत असतो. या दोन महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे एकच ध्येय असते- कॉलेज फेस्टिव्हल.. ज्या महाविद्यालयांमध्ये हे उत्सव असतात त्याच्याबरोबरच इतर महाविद्यालयांमध्येही यासाठी जय्यत तयारी सुरू असते.

तास संपल्यानंतर महाविद्यालयाच्या जिमखान्यामध्ये जमून सर्व मंडळी विषयांची ठरवाठरव करीत आहेत. ‘या वेळेस मल्हारमध्ये आपल्या कॉलेजला अधिक प्रायझेस मिळायला हवीत हं’.. ‘यूथ फेस्टिव्हलला मागच्या वेळेस रुईया कॉलेजने कसला जबराट डान्स केला होता आपण या वेळी असं काही तरी करू या’ अशा चर्चा महाविद्यालयांच्या कट्टय़ांवर आणि कॅन्टीनमध्ये ऐकू येत आहेत. त्यामुळे गेट सेट गो म्हणत इतर महाविद्यालयातील विद्यार्थीही स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. गाण्यांची निवड केली जात आहे, नाटकासाठी संहिता शोधली जात आहे तर कॅन्टीनमध्ये गिटार वाजवून प्रॅक्टिस केली जात आहे. येत्या काही दिवसांत उत्सवांच्या स्पर्धाची नोंदणी सुरू होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत उत्सवांमध्ये सामील व्हायला.

यूथ फेस्टिव्हलचे ४८वे वर्ष

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात मुंबई विद्यापीठाच्या यूथ फेस्टिव्हलचा प्रारंभ होतो. यासाठी अनेक महिन्यांपासून महाविद्यालयांमध्ये यूथ फेस्टिव्हलची तयारी सुरू होते. या वर्षी यूथ फेस्टिव्हलला ४८ वर्षे पूर्ण होत आहे. या फेस्टमध्ये आंतरमहाविद्यालयीन नृत्य, गाणे, नाटक, वाद्य अशा वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा आयोजित केल्या जातात. नृत्यामध्येही शास्त्रीयपासून ते लोकनृत्य आणि पाश्चात्त्य नृत्यांचा समावेश केला जातो. यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्य़ातील विद्यार्थी सामील होण्यासाठी उत्सुक असतात. सध्या यूथ फेस्टिव्हलची तयारी सुरू झाली असून विद्यार्थ्यांच्या बैठका घेऊन विषयांची निवड केली जाणार आहे, असे विद्यापीठाच्या मनाली लोंढे यांनी सांगितले.

मल्हारची कॉलेजविश्वात धूम

झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या मल्हारला ३७ वर्षे पूर्ण होत आहे. काही लहान विद्यार्थ्यांनी सुरू केलेला मल्हार कॉलेजविश्वात चांगलाच गाजतो आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ात तीन दिवसांच्या मल्हारची सुरुवात होते. सध्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेचे विभाग करून मुलांना सहभागी करून घेत आहे त्याचबरोबर फेसबुकवर मल्हारचे अपडेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. सध्या १२०० विद्यार्थ्यांची मल्हार आयोजक टीमची निवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या मल्हारमध्ये नवीन महाविद्यालयांना समावून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यात दिल्ली आणि मुंबई उपनगरातील अनेक महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षी मल्हार पाहण्यासाठी सुमारे ३० हजार प्रेक्षकांची नोंद झाली होती. डान्स, गाणे, नाटक, पथनाटय़ अशा वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी ४० महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले आहे. येत्या आठवडय़ात मल्हारचा विषय जाहीर करण्यात येणार आहे, असे आयोजक टीममधील विद्यार्थ्यांनी सांगितले. मल्हारमधील स्पर्धेचे विषय हे दरवर्षी वेगळे आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे असतात. काही वर्षांपूर्वी पथनाटय़ासाठी कायदा हा विषय देण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांनी संविधानातील कायद्याची निवड करून पथनाटय़ सादर केले. यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना अनेक कायद्यांविषयी माहिती झाली. अशा प्रकारचे विद्यार्थ्यांच्या जवळचे आणि सध्या चर्चेचे विषय मल्हारमध्ये समाविष्ट केले जातात.

Story img Loader