अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून ‘इंडस्ट्रिअल व्हिजिट’ अर्थात ‘आयव्ही’ला सर्वानाचा जावे लागते. यामध्ये अभ्यास, चर्चासत्र याचबरोबर मजा-मस्तीचीही जोड असते. सध्या सर्वच महाविद्यालयांमध्ये ‘आयव्ही’ची धूम रंगली आहे. याचबरोबर पर्यटन व्यावसायिकही महाविद्यालयांना आपल्या जाळय़ात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. या वर्षी सिमला-मनालीसोबतच गुजरात आणि राजस्थानलाही अनेक महाविद्यालयांनी पसंती दिली आहे.
‘ए जयपूरचा राजवाडा पाहायचा हं..’, ‘हो.. आणि मला तर तेथे उंटावर बसून सेल्फी काढायचाय..’ अशी चर्चा सध्या महाविद्यालयांच्या कट्टय़ांवर ऐकू येत आहे. हे विद्यार्थी कुठे सहलीला नव्हे, तर चक्क अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या ‘आयव्ही’ला अर्थात इंडस्ट्रिअल व्हिजिटला जाणारी आहेत. इतर वेळी आपली वर्गखोली नेमकी कोणती याचा पत्ताही नसलेले विद्यार्थी या आयव्हीच्या आयोजनात पुढाकार घेतात आणि तेथे जाऊन (धम्माल) अभ्यास करून येतात.
अभ्यासक्रमांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या ‘थिअरी’चे ‘प्रॅक्टिकल’ ज्ञान करून घेण्यासाठी आयव्ही आयोजित केल्या जातात. एखाद्या कार्यक्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा अभ्यास करणे, आपापल्या विषयाची सखोल माहिती मिळवण्यासाठी त्या विषयाचा उपयोग करून केल्या जाणाऱ्या उद्योग-व्यवसायांच्या स्थळांना भेटी देणे हे आयव्ही आयोजित करण्यामागचे खरे कारण; परंतु या अभ्यासाबरोबरच मित्रमैत्रिणींसह पाच-सात दिवस केली जाणारी धम्माल-मस्ती हेही आयव्हीचे सुप्त आकर्षण असते. गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांमध्ये आयव्हीचा ट्रेंड सुरू झाला आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन यांच्याबरोबरच विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, वाणिज्य, मास मीडिया, एवढेच काय कला शाखांचे अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या महाविद्यालयांमध्येही दरवर्षी आयव्ही आयोजित केल्या जात आहेत. आता तर वेगवेगळ्या विभागांच्या तसेच विषयांनुसारही आयव्हीचे आयोजन केले जाते. व्यावसायिक अभ्यासक्रमांना आयव्ही सक्तीची असली तरी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना हा भाग सक्तीचा नसतो; परंतु प्राध्यापक स्वत: पुढाकार घेत आपापल्या विषयांच्या आयव्ही आयोजित करत असतात. सुरुवातीला तृतीय वर्षांत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीच आयव्ही जात असे; पण सध्या प्रथम व द्वितीय वर्षांला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही आयव्ही जात आहेत. आयव्हीचा मूळ उद्देशच महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या थिअरीचा खराखुरा उपयोग कसा केला जातो हे पाहणे; परंतु सेमेस्टर पद्धतीमुळे सतत परीक्षा, असाइनमेंट्स, प्रकल्प यांच्यात व्यग्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना आयव्हीमुळे मात्र अभ्यासाबरोबरच काही दिवस मौजमजाही करता येते. आयव्हीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना रोजचे लेक्चर्स, क्लास यांपासून दूर वेगळ्या वातावरणात वावरायला मिळत असते. त्यामुळे कधी एकदा आयव्ही जाते याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये असते.
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत या आयव्ही आयोजित केल्या जातात. मात्र यासाठीची तयारी डिसेंबरमध्ये महाविद्यालयांतले फेस्टिव्हल्स सुरूअसतानाच केली जाते. यंदाही महाविद्यालयांमध्ये आयव्ही फीव्हर सुरू आहे. बहुतेक महाविद्यालयांची ठिकाणंही ठरलेली आहेत. काही महाविद्यालयांच्या आयव्ही जाऊनही आल्या आहेत, तर काहींच्या या महिन्यात जाणार आहेत. आयव्हीसाठी कोणत्या ठिकाणाला भेट द्यायची, तिकिटे, तिथे काय काय पाहायचे इथपासून शॉपिंग, भटकंती असे प्लॅनिंग विद्यार्थी करत असतात. बरेचदा विद्यार्थी स्वत: आयव्हीसाठी ठिकाण ठरवतात. या वेळी वर्गात सहसा न दिसणारे विद्यार्थीही हिरिरीने यात भाग घेतात. सर्व वर्गच आयव्हीमुळे एकत्र येत असतो. गेल्या वर्षीच्या बॅचकडून त्यांच्या आयव्हीचे अनुभव ऐकल्यामुळे आपली आयव्ही अधिक अविस्मरणीय करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुपीक डोक्यातून वेगवेगळ्या कल्पना बाहेर येत असतात. मात्र काही वेळा महाविद्यालय आयव्हीसाठी ठिकाण ठरवत असते. महाविद्यालयाने ठरवलेली जागा विद्यार्थ्यांना बोअर वाटत असेल, तर ती बदलण्यासाठी शिक्षकांची मनधरणीही विद्यार्थी करत असतात. शेवटी अगदीच नाइलाज झाला तर काहीच न मिळण्यापेक्षा हे बरे म्हणत मात्र जायची तयारी करतात; पण याआधी त्यांना पालकांकडून आयव्हीसाठी परवानगी आणि पैसे दोन्ही मिळवावे लागतात; परंतु आईवडिलांना विनंत्या करून भरलेली आयव्हीची फी, त्यासाठी केली जाणारी खरेदी, आयव्हीला जाताना विविध वस्तूंनी भरगच्च भरलेली बॅग, मित्रमैत्रिणींच्या ग्रुपबरोबर केलेली धम्माल, वेगवेगळ्या ठिकाणांना दिलेल्या भेटी हे सारे विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातात. साधारणपणे पाच ते सात दिवसांसाठी आयव्ही आयोजित केली जाते. यासाठी भारतभरातील वेगवेगळ्या ठिकाणांची चाचपणी करत अभ्यास व पर्यटन असा मेळ बसणारे ठिकाण ठरवले जाते. बहुतेक वेळा विषय व अभ्यासक्रमानुसार ही ठिकाणे ठरवली जातात. काही महाविद्यालयांतील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी नेले जाते; परंतु तिथे गेल्यावर भेट देण्याचे कार्यालये किंवा कारखाने हे मात्र त्या त्या अभ्यासक्रमानुसार वेगवेगळी असतात. यात ज्या ठिकाणी भेट द्यायची असेल त्या कार्यालयाची किंवा कारखान्यांची आधीच रीतसर परवानगी घ्यावी लागते. हे सर्व केल्यावर प्रवास, राहण्याची सोय, हॉटेलची व्यवस्था याची सोय करावी लागते. विद्यार्थी व प्राध्यापक मिळून हे सर्व करत असतात; पण बहुतेक वेळा विद्यार्थ्यांच्या अधिक संख्येमुळे महाविद्यालयाला हे सर्व करणे तितके सोपे नसते. यासाठी मग टूर ऑपरेटर्सच्या माध्यमांतून या गोष्टी केल्या जातात. हे टूर ऑपरेटर्स प्रवास, राहण्याची व तिथे फिरण्याची व्यवस्था करत असतात. त्यांची वेगवेगळी पॅकेजेस ठरलेली असतात; परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांला परवडेल, कमीत कमी खर्चात येता येईल तसेच तिथे गेल्यावर त्यांना अधिकाधिक शिकायला मिळेल याचा विचार करून पॅकेज ठरवले जाते. आयव्हीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला साधारणपणे तीन ते आठ हजार इतका खर्च येत असतो. हा खर्च ठिकाण व दिवस यांवर अवलंबून असतो. एवढे सारे करून आयव्हीसाठी एकदाचे प्रस्थान केले जाते. बस, ट्रेनच्या प्रवासात अंताक्षरी, गप्पा, मस्ती करत इच्छित स्थळी पोहोचल्यावर मात्र वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन आधीच ठरलेले असते. यात विषयाशी संबंधित अशी चर्चासत्रे, कारखान्यांना भेटी, काही मान्यवर व्यक्तींच्या भेटी, त्यम ठिकाणी असणाऱ्या लेणी, किल्ले किंवा प्रसिद्ध स्थळांना भेट यांच्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा, कार्यक्रम यांचा समावेश असतो. हे सारे पार पाडत सहलीचा आनंदही घेतला जात असतो. काही वेळा एक दिवस फक्त भटकंतीसाठी मोकळा ठेवला जातो.
आयव्ही हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचे वर्गाबाहेरील जगातील ज्ञान देण्याचा प्रयत्न असतो. वर्ग व खरे जग यांच्यातील दुवाच आयव्हीमुळे सांधला जात असतो; परंतु काही वेळा आयव्हीचा मूळ उद्देशापेक्षा फक्त धम्माल करण्याच्या हेतूनेच आयव्हीकडे पाहिले जात असते. पिकनिक म्हणून आयव्ही एंजॉय करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत असतो. यामुळे आयव्हीच्या मूळ उद्देशापासून काही जण दूर जात असले तरी बहुतांश विद्यार्थी मात्र आयव्हीकडे गंभीरपणे पाहत असतात. आपल्या विषयातील थिअरीची प्रात्यक्षिके पाहायला मिळतील, अवाढव्य कंपन्याचे कामकाज जवळून समजावून घेण्याची संधी मिळेल या दृष्टिकोनातूनही हे विद्यार्थी आयव्ही एंजॉय करत असतात. यंदा व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांनी बंगलोरला हॉटस्पॉट केले असले तरी पुणे, नागपूर, गोवा, चेन्नई, कन्याकुमारी, दिल्ली, जयपूर, सुरत, अहमदाबाद, म्हैसूर, सिल्वासा अशी काही ठिकाणेही बहुतेक महाविद्यालयांनी आयव्हीसाठी ठरवलेली आहेत. एकूणच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाहेरच्या जगाचा अनुभव देणारी, सहलीच्या आनंदाबरोबरच ज्ञान उपयोजनाच्या प्रक्रियेशी ओळख करून देणारी आयव्ही आता महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा