विद्यार्थी-शिक्षकांच्या एकोप्याने स्वप्नपूर्ती

महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवे वळण दिले जाते. आपल्या ध्येयांची परिपूर्ती करणाऱ्यासाठी मुले महाविद्यालयात दाखल होतात. अनेकदा त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळते तर अनेकदा त्यांच्या पंखांना बळ देण्यात महाविद्यालये कमी पडतात. मात्र काही महाविद्यालये नवीन प्रकल्प घेऊन मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटत असतात. शिक्षण आणि विद्यार्थी एकोप्याने येणाऱ्या संकटांवर मात करतात. अशी महाविद्यालये विद्यार्थ्यांबरोबरच सर्वाच्याच कौतुकास पात्र ठरतात. या वर्षी ग्रामीण आणि शहरी भागातील चार महाविद्यालयांना सवरेत्कृष्ट महाविद्यालयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थिकेंद्री अभ्यास, शिक्षण आणि व्यवस्थापनाच्या एकोप्याने हे यश साध्य करता आले, असा या महाविद्यालयातील शिक्षकांचा अनुभव आहे. मुंबईतील महर्षी दयानंद आणि जयहिंद महाविद्यालयांना शहरी भागातून तर कॉ. गोदावरी श्यामराव परुळेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि पिल्लई महाविद्यालयांना ग्रामीण भागातून गौरविण्यात आले. या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षेभिमुख शिक्षण न देता उत्तम नागरिक म्हणून जगण्यासाठीचे प्रशिक्षण दिले आहे. शाळेत शिक्षणाचा पाया पक्का केला जातो तर महाविद्यालयात या पायावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेप्रमाणे उंच उंच इमले चढविले जातात. यामध्ये शिक्षकांचा वाटा मोलाचा असतो. सध्या या महाविद्यालयांनी भविष्याची आखणी करण्याची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या यशात समाधान न मानता विद्यापीठ पातळीपलीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी या महाविद्यालयांनी कंबर कसली आहे.

 

‘महर्षी दयानंद’

महर्षी दयानंद महाविद्यालय नाटय़ आणि क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत. मालिका आणि सिनेमा क्षेत्रांतील अनेक माजी विद्यार्थी सध्याच्या नाटय़ांगनच्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी येतात. यामध्ये भरत जाधव, शिवाजी साटम, अनुजा बागवे असे अनेक कलाकार मुलांना अभिनयाचे धडे देण्यासाठी आवडीने महाविद्यालय येतात. या वर्षी आम्ही प्रामुख्याने शैक्षणिक आणि अध्ययन विभागात लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षी महाविद्यालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज कार्यक्रमात स्वीडनच्या ग्लोबला महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांनी धारावी झोपडपट्टीतील समस्यांबाबत सर्वेक्षण केले. तर एमडीतील १५ मुलांनी स्वीडनमध्ये जाऊन बाल्टिक समुद्रातील वाढणाऱ्या प्रदूषणाच्या कारणांचा अभ्यास केला. या उपक्रमामुळे महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. तर आविष्कार, पुकार या सामाजिक संस्थांच्या मदतीने वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करण्यासाठी विद्यार्थी सहभागी होत आहेत. ज्या मुलांमधील अध्ययन क्षमता कमी आहे अशा मुलांसाठी अधिक वर्ग भरविले जातात. सुरुवातीला हुशार विद्यार्थी त्यांना विषय समजून सांगतात. तर शिक्षकही विद्यार्थ्यांना विषयांचे मार्गदर्शन करतात. याबरोबरच मुलांना पुस्तकांची आणि वाचनाची गोडी लागावी यासाठी मुलांना बक्षीसही दिले जाते. जी मुले अधिक वेळ वाचनालयात बसतात किंवा जास्त पुस्तके वाचतात त्यांना महाविद्यालयांकडून बक्षीस दिले जाते. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सामाजिक विषयांवर कामे करून घेतली जातात. स्वप्नपूर्ती या उपक्रमाअंतर्गत रस्त्यांवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या मदतीने या मुलांच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च केला जातो. गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू असून या वर्षी चार मुलांना एम.डी. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांत दाखल करण्यात आले. सामाजिक विषयांबरोबरच पर्यावरण वाचविण्यासाठी स्त्री-मुक्ती संघटनेच्या वतीने कचऱ्यापासून खतनिर्मितीचे उपक्रम राबविले जात आहेत. असे अनेक उपक्रम राबविण्याची इच्छा असून यापुढे नॅकचे ‘अ’ नामांकन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या एकोप्यामुळे महाविद्यालयाला हे यश संपादन करता आले. महाविद्यालयातील सर्वच शिक्षक एकत्र येऊन नवनवे प्रयोग करीत असतात. यात विद्यार्थीही उत्सुकतेने सहभागीही होतात. विद्यार्थिकेंद्री शिक्षण हाच एम.डी. महाविद्यालयाच्या यशाचे रहस्य आहे.

  •  डॉ. छाया पानसे, उपप्राचार्य, महर्षी दयानंद महाविद्यालय 

 

‘पिल्लई’

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नोकरीच्या संधी

नवी मुंबईतील पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे निकाल, हजेरी अशा सर्व गोष्टी ऑनलाइन असल्यामुळे सर्व विभागांत पारदर्शकता पाळली जाते. विद्यार्थिवर्गामध्ये हजर आहेत की नाहीत, मुलांची प्रगती पालकांना ऑनलाइन पाहता येते. त्यानंतर कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून मुलांना १०० टक्के नोकरीची हमी दिली जाते. त्यामुळे सवरेत्कृष्ट अभ्यासक्रमाबरोबरच नोकरीभिमुख शिक्षण देण्यावरही भर दिला जात आहे. यूएन सेंटरच्या वतीने हुशार अभियांत्रिकी मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दर वर्षी इन्फोसिस, एल अ‍ॅण्ड टी, विप्रो अशा अनेक कंपन्या महाविद्यालय सुरू असताना नोकरीच्या संधी मिळवून देतात. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकरीसाठी धावाधाव करण्याची गरज नसते. नवी मुंबईतील पिल्लई महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त वसतिगृह उभारण्यात आले आहे. यामध्ये ८०० मुला-मुलींच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. अभ्यासाबरोबरच फुटबॉल, व्हॉलीबॉल, रायफल शूटिंगसारखे खेळही सुरू असतात. त्यामुळे अभ्यासाबरोबरच मुले खेळात आनंदाने सहभागी होतात.

  •  डॉ. डॅफनी पिल्लई, पिल्लई महाविद्यालय सचिव 

 

‘परुळेकर’

आदिवासींचे गुणवत्तापूर्ण महाविद्यालय

प्रतिकूल परिस्थितीत सवरेत्कृष्ट महाविद्यालयाचा मान मिळविणाऱ्या कॉ. गोदावरी श्यामराव परुळेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे आदिवासी भागातील आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील हे महाविद्यालयाची सुरुवात १९९४ मध्ये झाली. तेव्हा फक्त कला आणि वाणिज्य शाखेचे वर्ग भरीत होते. मात्र २०११ मध्ये विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. तर २०१४-१५ मध्ये कला आणि वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. आदिवासींची पहिली पिढी या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आदिवासी पाडय़ातील मुले येथे शिक्षण घेत आहे. येथे शिक्षणाबरोबरच स्वच्छता बंधारे, जलसंधारणाचे उपक्रम राबविले जातात.  प्रथम या संस्थेसोबत संलग्न राहून या भागातील शाळांचे सर्वेक्षण करणे, गरजू मुलांना शिक्षण देणे असे अनेक प्रकल्प येथील विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहेत. तर एल अ‍ॅण्ड टी या कंपनीच्या माध्यमातून महाविद्यालयात विज्ञान केंद्राची बांधणी करण्यात आली आहे. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात जवळील शाळेतील अनेक मुले भेट द्यायला येतात. येथे अनेक वैज्ञानिक उपकरणे, वैज्ञानिकांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयासाठी अनेकदा आर्थिक चणचण जाणवते. नवीन उपक्रम करण्यासाठी पैशांअभावी मर्यादा येते. तरी आहे त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. यापुढे विज्ञानावर लक्ष केंद्रित करून विज्ञान विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएच.डी. सुरू करण्याची इच्छा आहे. आदिवासी मुले शिक्षणाच्या मदतीने नव्या प्रवाहात येऊ शकतात. त्यांना योग्य पद्धतीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर येत्या काळात चांगल्या अधिकारी पदावर, वैज्ञानिक क्षेत्रात ही मुले आपले नाव मोठे करतील असा विश्वास आहे. यासाठी समाज आणि मुंबई विद्यापीठाची मदत लाभली तर नवे उपक्रम राबविता येऊ शकतात.

  •  डॉ. भगवान अभिमानसिंह राजपूत, प्राचार्य, कॉ. गोदावरी श्यामराव परुळेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय.

Story img Loader