एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात गरमागरम वडापाव खात पावसाचा आनंद घेणारे विद्यार्थी या दिवसात प्रत्येक महाविद्यालयाच्या बाहेर दिसतात. पावसाच्या सरी मनसोक्त अंगावर घेतल्यावर जाणवणाऱ्या थंडीवर चहा आणि गरम बटाटेवडय़ांचा उतारा हा ठरलेला असतो. ‘काय मस्त पाऊस आहे, या पावसात लोणावळ्याला जायला हवं यार,’ ‘नाही अगं माथेरानला जाऊ या’.. अशा स्वप्नांचे मजले चढवताना भिवपुरीचा धबधबा नाही तर मरिन लाइन्सवर विद्यार्थ्यांची स्वारी थबकते आणि धबधब्याचे पाणी अंगावर घेत मुले-मुली धम्माल मस्ती करतात. त्यात पावसाळा, कांदा-भजी आणि चहा हे समीकरण जगातील कुठल्याही खाद्यपदार्थापेक्षा सरस असतं. हीच मजा महाविद्यालयाच्या बाहेर मिळणाऱ्या भजी- पावमध्येही येत असतेच. महाविद्यालयाचे कॅन्टीन असूनही बाहेरील पदार्थ खाण्यामध्ये जी चंगळ असते ती एका ठिकाणी बसून खाण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेरील गाडीवर मिळणारी फ्रँकी, पॅटिस परमप्रिय असतं. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता स्वच्छतेची खबरदारी घेत चांगले खाद्यपदार्थ तयार केले जातात. विद्यार्थ्यांची हीच आवड लक्षात घेता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या फूड कॉनर्स व्यतिरिक्त काही हटके पण महाविद्यालयांजवळील फूड कॉर्नर्सची केलेली खाद्यसफर..

चेतनाचा ‘चिकन पेटी पाव’

वांद्रेच्या चेतना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मुलांना कॅन्टीनची सोय नसल्याने त्यांची सर्व मदार ही महाविद्यालयाच्याबाहेर मिळणाऱ्या खाद्यपदार्थावर होत असते. त्यातच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या समोरील चायनीज खाद्यपदार्थाचे हॉटेल आणि हाकेच्या अंतरावर असलेले डॉमिनोज अशी सर्व प्रलोभने असतानाही चेतनाच्या विद्यार्थ्यांचे खाद्यकेंद्र म्हणजे ‘डॅव्हिल्सचा चिकन पेटी पाव..’ काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या फूड कॉर्नरने कमी वेळात विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चिकनचे तळलेले कटलेट पावामध्ये भरून पेटीच्या आकाराचे कटलेट विद्यार्थ्यांचे आवडीचे खाद्य झाले आहे. शाकाहारींसाठीदेखील भाज्यांचे पेटी पावही येथे मिळते. महाविद्यालयाच्या जवळच असल्यामुळे दोन तासांच्या मध्ये येऊन विद्यार्थी आपली भूक भागवतात.

ठाकूरची चमचमीत ‘मिसळ’

कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयामधून बाहेर पडलात की समोरच ‘साई स्नॅक्स’ नावाच्या कॉर्नर तुमचे लक्ष वेधून घेते. या कॉर्नरवर खाद्यपदार्थाचे अनेक डबे पाहायला मिळतात. येथे पोहे, उपमा, शिरा, साबुदाण्याची खिचडी असे अनेक पदार्थ मिळतात. मात्र ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधील आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे इथली मिसळ. एका थाळीमध्ये प्रथम फरसाण त्यावर लाल रंगाची तरी आणि वरून भुरभुरलेली बारीक शेव आणि कोथिंबीर. मिसळीचे हे रूप पाहताच कोणालाही याला चाखण्याचा मोह आवरणार नाही. त्यामुळे ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर या मिसळीने मोहिनीच टाकली आहे. सकाळी साडेसातपासून येथे विद्यार्थ्यांची गर्दी जमा झालेली असते आणि दुपारी तास संपल्यावर मिसळीवर ताव मारायला विद्यार्थी हजर होतात. गेली आठ वर्षे नीता पवार हा फूडकॉर्नर चालवीत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून येथे स्वच्छता ही राखली जाते. येथील अनेक पदार्थापेक्षा मिसळ मला अतिशय आवडते. पावसाळ्यात जास्त संख्येने मुले या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी येतात. बाहेर कोसळता पाऊस आणि गरम मिसळ खाण्याची मजा काही वेगळीच असल्याचे या महाविद्यालयामधील ओमकार दळवी यांनी सांगितले.

एम.डी.चे स्पेशल ‘पॅटिस’

महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या डाव्या बाजूला पिवळ्या रंगाच्या पत्र्याचे कॉर्नर एमडीच्या विद्यार्थ्यांचे खाण्याचे प्रमुख ठिकाण. येथे मिळणारे पॅटिस विद्यार्थ्यांचे आवडचे खाद्य. ब्रेडमध्ये बटाटय़ाची भाजी भरलेले हे पॅटिस गरम मिळावे यासाठी मुले आल्यावर संजय गरम पॅटिस तळतो. हा संजय गेली अनेक वर्षे येथे पॅटिस आणि अनेक खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय करीत आहे. अपंगत्व आले असतानाही आपल्या वडिलांच्या मदतीने सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हे फूड कॉर्नरचा व्यवसाय करीत आहे. त्याबरोबरच या कॉर्नरमध्ये बटाटेवडे, बटाटा भजी आणि चहाही मिळतो. त्यामुळे मुलांना पर्यायी खाण्याचे पदार्थही येथे उपलब्ध असतात. त्याशिवाय एमडी महाविद्यालयाच्या उजव्या बाजूला असलेली वडापावची गाडीही एमडीकरांमध्ये प्रसिद्ध आहे. दोन्ही बाजूने एमडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खाण्याची चंगळ आहे.

Story img Loader