महाविद्यालयांतील अभ्यासक्रमात जरी आंग्लभाषेचे वर्चस्व असले तरी कॅम्पसमध्ये मराठीचा झेंडा फडकवत राहण्याचे काम वाङ्मय मंडळाचे शिलेदार करत असतात. मराठी संस्कृती, कला, भाषा यांचा प्रसार करण्यासाठी वाङ्मय मंडळाकडून वर्षभर निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जात असतात. अशा कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवक, निवेदक, कलाकार अशा भूमिका पार पाडत वाङ्मय मंडळाचे विद्यार्थी कार्यकत्रे सर्वाचेच लक्ष वेधून घेत असतात. महाविद्यालयातील इंग्रजी भाषेच्या वर्चस्वामुळे मराठीशी संपर्क कमी येत असला तरी वाङ्मय मंडळांच्या कार्यक्रमांमधून त्याची कसर भरून काढली जाते. मराठी साहित्य, कला यांची गोडी असणारे अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे यात सहभागी होत असतात. अभिव्यक्तीसाठी भाषा हे प्रमुख साधन असल्याने आणि मातृभाषेतूनच ती सहज, सुलभ व प्रभावीपणे करता येत असल्याने प्रत्येकाच्या जीवनात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व असते. यामुळे महाविद्यालय सुरू होताच वाङ्मय मंडळाचे उपक्रम केव्हा एकदा सुरू होतात याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली असते. मुंबईमधील अनेक अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्येही अशी वाङ्मय मंडळे कार्यरत आहेत. येत्या २७ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या मराठी भाषा दिवसाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या विविध कार्यक्रमांमुळे मराठी भाषा व संस्कृती यांचा प्रसार करत सर्व भाषिक विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या वाङ्मय मंडळांची ओळख-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खालसा महाविद्यालय, माटुंगा
माटुंगा येथील शीख अल्पसंख्याक असलेल्या खालसा महाविद्यालयातही गेली सुमारे चाळीस वष्रे मराठी वाङ्मय मंडळ कार्यरत आहे. दीर्घ परंपरा लाभलेल्या या वाङ्मय मंडळात महाविद्यालयातील मराठी विद्यार्थ्यांबरोबरच अमराठी विद्यार्थीही मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असतात. संत नामदेवांमुळे मराठी व शीख समाजातील संबंधांना गेल्या सातशे वर्षांची परंपरा लाभली असल्याने त्याचे प्रतििबबही येथील वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात पडत असते. वाङ्मय मंडळातर्फे दरवर्षी नामदेव पुण्यतिथीला संत नामदेवांचे अभंग, त्यांचे कार्य यांची ओळख करून देणारया कार्यक्रम, व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही जयराज साळगावकर यांचे ‘नामदेव कार्य आणि कर्तृत्व’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. या वर्षी तर वाङ्मय मंडळाकडून सर्व भाषिक विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा ‘मंगळागौर’चा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यात सर्व भाषिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तसेच दरवर्षी मराठी भाषेसमोरची आव्हाने, मराठीतील करियरच्या संधी आदी विषयांवरील व्याख्यानांमधून भाषेच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांना सजग करण्यात येत असते.

मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंम्ड
मुलुंड येथील मुलुंड वाणिज्य महाविद्यालयात सुमारे ४५ वर्षांपासून मराठी वाङ्मय मंडळ कार्यरत असून मंडळाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जात असतात. वाणिज्य शाखेसारखा क्लिष्ट अभ्यासक्रम आणि अमराठी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी वाङ्मय मंडळाचे सारेच कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडत असतात. मराठी विद्यार्थ्यांप्रमाणेच अमराठी विद्यार्थीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रयत्न करत असतात. वर्षभर केल्या जाणार्या कार्यक्रमांमध्ये स्वरसंध्या हा सांगीतिक कार्यक्रम, काव्यफुलोरा ही काव्यस्पर्धा अशा उपक्रमांना विद्यार्थ्यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती असते. याशिवाय मराठी कलाकार, साहित्यिक यांना महाविद्यालयात आणून विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही दिली जाते. विशेष म्हणजे मंडळाच्या कार्यक्रमांचे आमंत्रण देताना ‘मराठीप्रेमी भारतीयांना आमंत्रण’ अशा शब्दांत जाहिरात केली जाते. एकप्रकारे आंतरभारतीच्या कल्पनेचा प्रयोगच केला जातो आणि दरवर्षी तो यशस्वी होतो. मागच्या वर्षी कवी मंगेश पाडगावकरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदा त्यांना आदरांजली देण्यासाठी ‘आणिक स्मृती ठेवूनी जाती’ हा लघुपटही विद्यार्थ्यांनी तयार केला आहे.

झुनझुनवाला, घाटकोपर
घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ हे वर्षभर सतत विविध कार्यक्रम राबवणारे म्हणून ओळखले जाते. यंदा डिसेंबरमध्ये मुंबई मराठी साहित्य संघाच्या सहकार्याने महाविद्यालयात झालेल्या १२ व्या आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलनामुळे तर वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव घेता आला. कवी अरुण म्हात्रे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात डॉ.नरेंद्र जाधव, अभिनेते अरुण नलावडे, कवी किरण येले, अभिनेत्री स्पृहा जोशी आदी मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली होती. यंदा मंडळाच्या कार्यक्रमांची सुरुवात लेखिका अरुणा ढेरे यांच्या कथासाहित्य या विषयावरील व्याख्यानाने करण्यात आली होती. त्यात कथा या साहित्यप्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. वाङ्मय मंडळाकडून दरवर्षी काव्यपूर्ती ही अनोखी स्पर्धाही घेण्यात येते. यात कोणत्याही प्रसिद्ध कवितेच्या दोन ओळी दिल्या जातात. त्यावरून कवितेची पूर्ती करायची असते. याशिवाय जुगलदास मोदी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन मंडळाकडून केले जात असते. याशिवाय कथारंग हा कार्यक्रम, सुरा मी वंदिले हा गीतगायनाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम दरवर्षी केले जात असते. तसेच विद्यार्थ्यांच्या भावना, विचार प्रकट करण्यासाठी ‘आविष्कार’ हे भित्तीपत्रक ही विद्यार्थ्यांकडून चालवले जाते. विशेष म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘एक क्षण फक्त मराठी’ ही प्रश्नमंजुषाही आयोजित करण्यात येत असते. अकरावी ते पदवीपर्यंतचे कला व विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थी मंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.

कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालय, तलासरी, ठाणे</strong>
ठाणे जिल्ह्य़ातील तलासरी येथील आदिवासी समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे केंद्र ठरलेल्या कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच तिथे वाङ्मय मंडळ कार्यरत आहे. वारली, कोकणी, वाडवळी, मांगेली, कातकरी आदी बोलीभाषा बोलणारे विद्यार्थी महाविद्यालयात आहेत. त्यामुळे मराठी बरोबरच येथील लोकसाहित्य व बोलीभाषांनाही वाङ्मय मंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थान दिले जाते. दरवर्षी मान्यवर साहित्यिकांना आमंत्रित करून वाङ्मय मंडळाचे उद्घाटन केले जाते. यंदाही लेखक उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम राबवणाऱ्या वाङ्मय मंडळात यंदा सुमारे ४५० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. निबंध, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शन याबरोबरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी वाङ्मय मंडळाकडून यंदा स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली होती. वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून आदिवासी लोकसाहित्य व स्वरचित साहित्याचे हस्तलिखितही तयार करण्यात येत असते. याशिवाय वार्षिक अंकातून विद्यार्थ्यांचे साहित्य तसेच लोकसाहित्याचे संकलन विविध बोलीभाषेतून प्रकाशित केले जाते. आदिवासी स्त्री साहित्यिक व रसिकांचा मेळावाही वाङ्मय मंडळाकडून आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तलासरी व डहाणू तालुक्यातील सुमारे ६०० महिला सहभागी झाल्या होत्या. अशाप्रकारे आपले स्थानिक लोकसाहित्य, संस्कृती, कला, बोली यांच्याविषयीचे भान विद्यार्थ्यांमध्ये यावे यासाठी वाङ्मय मंडळाकडून नेहमीच निरनिराळे उपक्रम राबवले जात असतात.

इस्माईल युसुफ, जोगेश्वरी
उत्तर मुंबईमधील सर्वात जुने महाविद्यालय असा लौकिक असलेल्या जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ महाविद्यालयातही मराठी भाषा व वाङ्मय मंडळातर्फे मराठी संस्कृतीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठी साहित्य-संस्कृती यांच्याशी त्यांचा परिचय व्हावा यासाठी वाङ्मय मंडळाकडून वर्षभर निरनिराळे कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जात असते. यंदाही मराठी भाषेसंदर्भातील निबंध स्पर्धा तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ानिमित्त काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता. तसेच नोव्हेंबरमध्ये कला शाखेत शेवटच्या वर्षांला असणाऱ्या मराठी साहित्य या विषयाच्या विद्यार्थ्यांना दादर येथील शिवाजी मंदिर नाटय़गृहात महेश एलकुंचवार लिखित ‘सोनाटा’ या अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या नाटकाचा प्रयोग दाखविण्यात आला होता. याशिवाय नुकतेच काही दिवसांपूर्वी वाङ्मय मंडळातर्फे ‘मायमराठी शब्दोत्सव’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काव्यवाचन, काव्यसुलेखन, कथावाचन आदी उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. नृत्य, गायन, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धा तसेच विविध कार्यक्रम, उपक्रम राबवत वाङ्मय मंडळातर्फे संस्कृती बरोबरच मराठी भाषेच्या प्रसारासाठीही प्रयत्न केले जात असतात. याचाच एक भाग म्हणून यंदा मराठी लेखन नियमांबाबत विद्यार्थ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांना मराठीतील लिखाणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.