राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्यांसाठी रोजगार मेळावा

राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (२८ मे ) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून या मेळाव्याला सुरुवात होईल. राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्वाना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. या मेळाव्यात युरेका फोब्र्ज या एजन्सी मार्फत ‘सेल्स ट्रेनी’ या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वष्रे पूर्ण असणे आवश्यक आहे. कर्वे रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या आवारात हा मेळावा होणार आहे. पत्ता : राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था,पुणे क्षेत्रीय केंद्र, जे. पी. नाईक रस्ता, कॉसमॉस बँकेच्या मागे, कोथरूड, कर्वे रस्ता, मारुती मंदिर बस स्थानकाजवळ, सोलारीस क्लबच्या पुढे. संपर्क क्रमांक: ०२०-२५४४४६६७

लॉजिस्टिक्स व ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट विषयावर कार्यशाळा

सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट (एसआयएसडी) आणि अभि इम्पॅक्ट लॉजिस्टिक्स यांच्यातर्फे ‘लॉजिस्टिक्स व ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट’ या विषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार (२८ मे) आणि रविवार (२९ मे) होणार आहे. सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लìनग (एससीडीएल), सिम्बायोसिस भवन, १०६५ बी, गोखले क्रॉस रस्ता, मॉडेल कॉलनी येथे सायंकाळी ४ वाजता कार्यशाळा होणार आहे. यासाठी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी ९५५२५०३८४० / ९५९५२६४०२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. लॉजिस्टिक्स क्षेत्रामधील मनुष्यबळाच्या गरजेची उमेदवारांना माहिती व्हावी. ही गरज भागविणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.

हॉस्पिटल अँड हेल्थ मॅनेजमेंटच्या पदविका

दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च’ या संस्थेतर्फे विविध पदविका अभ्यासक्रम चालवण्यात येतात. दोन वर्षांच्या हॉस्पिटल आणि हेल्थ मॅनेजमेंट पदविका अभ्यासक्रमासाठी सध्या अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता १२० आहे. पदवीधारक आणि व्यावसायिक अशा दोन्ही घटकांना उपयोग होईल अशी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. पदवीधारक विद्यार्थी कॅट /मॅट /सीमॅट /एटीएमए /झ्ॉट इत्यादी प्रवेश परीक्षांच्या गुणानुसार अर्ज करू शकतात. व्यावसायिक त्यांच्या दोन किंवा अधिक वर्षांच्या कामाच्या अनुभवाच्या आधारे थेट अर्ज करू शकणार आहेत. खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रातील रुग्णालये आणि आरोग्य संस्थांचे व्यवस्थापन, कौशल्याचे नियोजन अशा घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. पदवीतील गुण आणि व्यवस्थापनाने दिलेली प्रवेश परीक्षा / अनुभव, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीतील एकूण कामगिरी या निकषांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत आहे. याबाबतची अधिक माहिती  http://delhi.iihmr.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोबाइल अ‍ॅप

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैश्विक मल्टीबिझ प्रा. लि. या कंपनीने मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. चालू घडामोडी या घटकाची तयारी करण्यासाठी ‘आज का जीके’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन या विविध घटकांच्या प्रश्नांचा सराव करता येणार आहे. या घटकांवर रोज १० प्रश्न विचारण्यात येतील. त्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात बातमीची लिंकही देण्यात आली आहे.

शिव नादर विद्यापीठाचे प्रवेश अर्ज उपलब्ध

शिव नादर विद्यापीठाकडून चालवण्यात येणाऱ्या व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज उपलब्ध झाले असून ते भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत आहे. या विद्यापीठाकडून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यात येतात. त्यांचे प्रवेश अर्ज सध्या उपलब्ध झाले असून  जुलैपासून या अभ्यासक्रमाचे माहविद्यालय सुरू होणार आहे. याशिवाय स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, स्कूल ऑफ नॅचरल सायन्सेस यांच्याही प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्या आहेत. या अभ्यासक्रमांची माहिती http://www.snu.edu  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मिशिगन टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे पथक पुणे भेटीला

अमेरिकेतील मिशिगन टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या पथकाने नुकतीच पुण्यातील शिक्षणसंस्था आणि उद्योगांना भेट दिली. पुण्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रज्ञान संस्थांना या पथकाने भेट दिली. विविध संशोधन प्रकल्पांसाठी पुण्यातील शिक्षणसंस्थांबरोबर करार करण्याच्या दृष्टीने या पथकाने चर्चा केली. यानंतर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात कोहलर कंपनीच्या उपाध्यक्ष आणि मिशिगन टेक युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थिनी अ‍ॅमी मेयर यांनी तंत्रशिक्षणाच्या प्रवाहांत सातत्याने होणारे बदल, अमेरिकेत तंत्रशिक्षण देणारी महाविद्यालये, संशोधन प्रकल्पातील सहकार्य, परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर संवाद साधला.

मॉडर्न महाविद्यालयांत ई-कॉमर्स अभ्यासक्रम

शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयांत ‘ई-कॉमर्स’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. हा दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. चार सत्रांत या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आलेली आहे. थिअरी आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपांमध्ये या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. ‘ई-कॉमर्स’ या विषयातील पदव्युत्तर पदवी (एमकॉम) अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमाला ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाने बीबीए, बीबीए (कॉम्पुटर अ‍ॅप्लिकेशन), बीबीएम इंटरनॅशनल बिझिनेस हे नवे अभ्यासक्रम देखील सुरू केले आहेत.

Story img Loader