ऑलिम्पिकमधील चार खेळाडूंना यावर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. भारत सरकारकडून चांगली कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना या पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र यावर्षीचा पुरस्कार देण्यासाठी घाई केल्याची चर्चा क्रीडा क्षेत्रात सुरु आहे. ऑलिम्पिकमधील विजेत्या महिलांना खेळरत्न देण्याच्या निर्णयाचे विद्यार्थी वर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे.

पुरस्कार देताना सावध राहणे गरजेचे

यावर्षी चार जणांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आले. यामधील बॅडमिंटनपट्टू पी.व्ही.सिंधु, कुस्तीवीर साक्षी मलिक आणि जिमनॅस्ट दीपा कर्माकर यांना खेलरत्न दिला गेला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र जीतू राय यांची कामगिरी तपासण्याची गरज आहे. यापूर्वी खेलरत्न मिळविण्यासाठी खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची गरज होती. मात्र सध्या एका ऑलिम्पिकच्या पदकामुळे खेळाडूंना खेळरत्न दिले जात आहे. यामुळे या पुरस्कारचे महत्व कमी होईल, अशी भीती वाटणे साहजिकच आहे. खेळांडूंचे कौतुक करावे ते गरजेचे आहे. मात्र खेलरत्न देताना सावध असणे गरजेचे आहे.

– प्रणाली धुमाळे, डहाणूकर महाविद्यालय

 

वरिष्ठ खेळाडूचा विचार व्हावा

साक्षी आणि सिंधू यांनी ऑलिम्पिकमध्ये आपआपल्या क्रीडाक्षेत्रात मिळवलेल्या विजयाने प्रत्येक भारतीयाच्या मनात घर केले असून त्यांची ही कामगिरी अभिमानास्पद आहे. पण त्यांच्या पहिल्याच खेळीला पाहून सरकारने त्यांना खेळरत्न देण्याचा निर्णय फार लवकर घेतला आहे. माझ्या मते निवड समितीने इतर खेळाडूंचाही तितकाच विचार करायला हवा त्यासाठी निवड समितीने डोळे उघडे ठेऊनच क्रीडा क्षेत्रातील इतर खेळाडूंचा ज्यांची कामगिरी ऑलिम्पिकपेक्षाही अधिक आहे अशाचांही विचार करावा. हा पुरस्कार देऊन आपण साक्षी आणि सिंधू यांचे मनोबळ नक्कीच वाढवू पण इतर या दोघींपेक्षाही वरिष्ठ खेळाडूंचे मनोबळ तितकेच ढासळले जाईल.

– तेजश्री परब, साठय़े महाविद्यालय.

 

पुरस्काराचे मानकरी योग्यच

ऑलिम्पिकमध्ये मोलाची कामगिरी केलेल्या साक्षी आणि सिंधू यांना जाहीर झालेला खेलरत्न पुरस्कार हा माझ्या मते योग्यच आहे. २०१६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची आशा सोडलेल्या  भारतीयांना आणि देशाला या दोघींनीही पदक प्राप्ती करुन आनंद दिला आहे. या पुरस्काराने त्यांचे मनोधैर्य वाढून त्या २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आणखी उत्तम कामगिरी करतील.

– भारती मोरे, विद्यालंकार महाविद्यालय

Story img Loader