‘हल्ली तरुणाई काही वाचतच नाही, मराठी साहित्याची तर त्यांना गोडीच नाही, महाविद्यालयीन विद्यार्थी तर केवळ मोबाईल आणि इंटरनेट माध्यमांच्या आहारी गेले आहेत,त्यामुळे आता वाचनसंस्कृती लोप पावणार..’ अशा अनेक तक्रारी सध्या पालक, शिक्षकांकडून करण्यात येत असल्या तरी वास्तव मात्र निराळेच आहे. कारण सध्याची पिढी वाचत नसल्याचा सूर जून्याजाणत्यांकडून आळवला जात असतानाच नवी पिढी मात्र थोडय़ा वेगळ्याप्रकारे आपले वाचनविश्व घडवत आहे. प्रत्येक जूनी पिढी नव्या पिढीला वाचन करत नसल्याबद्दल दुषणे देत आली आहे. कारण मुळातच आवडीने वाचन करणारा वर्ग हा पूर्वीही कमीच होता व आताही कमीच आहे. परंतु, प्रत्येक पिढीत वाचनाच्या आवडीनिवडी, त्याची साधने यांच्यात वेगळेपणा दिसून येतो. त्यामुळेच वाचनसंस्कृतीच्या अस्तित्वाबद्द्लच्या वल्गना केल्या जात असतात. जून्या पिढीने अशा वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाच्या कितीही हाकाटय़ा पिटल्या तरी आजचे विद्यार्थी स्वत:चे असे एक वाचनविश्व घडवत आहेत. मोबाइल, इंटरनेट, दूरदर्शनवरील मालिका अशी अनेक व्यवधाने जवळ असली तरी तरुणाई आपल्या सवडीने वाचनही करत आहे. फरक इतकाच आहे की, काही वर्षांपूवीपर्यंत असणारी छापील माध्यमातील पुस्तकांची मातब्बरी सध्या कमी झाली असून डिजीटल स्वरुपातील पुस्तके, नियतकालिकांचे नवा अवकाश या विद्यार्थ्यांच्या वाचनविश्वात निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या या विद्यार्थ्यांंच्या हाती मोबाईल, टॅब, लॅपटॉप, किंडल यांसारखी उपकरणे आली असून त्यांच्या साहाय्याने ते आपल्या वाचनाची भूक भागवत आहेत. या माध्यमातून ई-बुक्स, श्राव्य पुस्तके, ग्राफीक कादंबऱ्या अशा डिजीटल स्वरुपातील पुस्तकांचे वाचन विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात करू लागले आहेत.
डिजीटल स्वरुपातील साहित्याच्या वाचनाला प्राधान्या देणारे आजच्या विद्यार्थी वाचकांनी वाचनाविषयीच्या चर्चानाही याच माध्यमाला जवळ केले आहे. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप सारख्या समाज माध्यमांवर रुळणाऱ्या या पिढीने आता या समाजमाध्यमांनाच आपल्या वाचनप्रेमाचा एक भाग बनवले आहे. या समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांचे अनेक गट सध्या अस्तित्त्वात आहेत. या गटांवर चाललेल्या चर्चावर नजर टाकल्यास तेथे वाचलेल्या पुस्तकांवर, त्यांच्या खरेदीवर अटीतटीने होणाऱ्या संवादांमुळे वेगळ्याच वाचनविश्वाचे दर्शन होते. हे विद्यार्थी आपल्या वाचनाविषयी येथे अधिक खुलेपणाने अभिव्यक्त होत असतात. पुस्तकाच्या विषयावर, त्याच्या आशयावर, त्यातल्या मतांवर या गटांवरील चर्चामधून गटाचे सदस्य आपली मते हिरिरीने व्यक्त करत असतात. अनेकवेळा यातून नव्या पुस्तकांबद्दल, पुस्तकांच्या खरेदीविषयीचे अनुभव, वाचनाविषयीचे किस्से अधिक रंजकपणे मांडले जात असतात.
पूर्वी महाविद्यालयांमध्ये स्कॉलर समजले जाणारे विद्यार्थी किंवा मराठी-इंग्रजी साहित्याचे विद्यार्थीच प्रामुख्याने वाचन करताना दिसायचे. परंतु, सध्या हे चित्र थोडे बदलू लागले आहे. विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे तसेच वक्तृत्व, कविता, वादविवाद आदी स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच निव्वळ वाचनानंद म्हणून वाचन करणारेही अनेक विद्यार्थी आहेत. तसेच वाचनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींमध्येही विविधता आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच जगभरच्या अनेक भाषांमधून अनुवादित झालेल्या पुस्तकांचेही वाचन विद्यार्थी उत्सुकतेने करत आहेत. समाजमाध्यमांवरील विद्यार्थ्यांच्या वाचक गटांमधून झालेल्या चर्चामधून त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडींबदद्ल माहिती मिळते. त्यातून आजच्या विद्यार्थ्यांमधील वाचनसंस्कृतीचे चित्र स्पष्ट होऊ शकते.
यात पु.ल.देशपांडे, व.पु.काळे आदी लेखकांच्या पुस्तकांबरोबरच स्वामी, मृत्यूंजय, छावा, पानीपत, राऊ अशी पुस्तकेही विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच ‘दुनियादारी’ या चित्रपटापासून काहीजण सुहास शिरवळकरांच्या कादंबऱ्यांकडेही वळलेले आहेत. त्यामुळे कादंबरी हा साहित्यप्रकार विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे. भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही कादंबरी तर गेल्या तीन-चार पिढय़ांमधील विद्यार्थी वाचकांवर गारूड करून आहे. सध्याची तरुणाईही कोसलाची वाचक आहेच. परंतु, कोसला बरोबरच नेमाडे यांच्या इतर कादंबऱ्यांबाबतही विद्यार्थी उत्सुकतेने बोलत असतात. नेमाडेंना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर तर त्यांच्या लेखनाबद्दल विद्यार्थी वाचकांमध्ये कुतुहल निर्माण झाल्याचे अनेक महाविद्यालयांच्या ग्रंथालयांमधील पुस्तकांच्या आवक-जावक नोंदींवरून दिसून येत आहे. नेमांडेबरोबरच विलास सारंग, श्याम मनोहर, राजन गवस, राजन खान, मिलींद बोकील आदी लेखकांचे साहित्यही अनेकजण आवडीने वाचत आहेत. सध्याच्या तरुणाईला साहित्यातील गटतट, साहित्यिक वाद यांच्याबद्दल रस नसल्याचे अनेक विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून जाणवते. हे विद्यार्थी जून्या पिढीने वाचनाची केलेली व्याख्या किंवा ठराविक पुस्तके, लेखक वाचले म्हणजेच वाचन अशाप्रकारच्या तयार समिकरणांना विरोध करतात. ‘वाचनानंद’ हाच आमच्या वाचनाचा हेतू व ध्येय असल्याचे अनेक विद्यार्थी वाचकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुसुमाग्रज, खानेलकर, बोरकर, पाडगावकर यांच्यापासून ते नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, ना.धो. महानोर अशा अनेक कवींच्या कवितांचा आस्वाद हे विद्यार्थी वाचक घेऊ शकतात. याशिवाय सानिया, मेघना पेठे, कविता महाजन, निरजा, प्रज्ञा दया पवार या लेखिकांचे साहित्यही तितक्याच आवडीने वाचले जात आहे. ‘बलुतं’, ‘उपरा’, ‘कोल्हाटय़ाचं पोर’ यांसारख्या आत्मकथनांबरोबरच सध्याच्या पिढीतील गणेश मतकरी, अवधूर डोंगरे, संदिप खरे आदींचे साहित्यही विद्यार्थी आवर्जून वाचत आहेत.
हे झाले मराठी साहित्याच्या वाचनाचे. परंतु, मराठी बरोबरच इंग्रजी व अनुवादित साहित्याचेही वाचन सध्या मोठय़ा प्रमाणात केले जात आहे.यात चेतन भगत, सुदिप नगरकर यांसारख्या लेखकांच्या कादंबऱ्यांपासून ते शोभा डे, खुशवंत सिंग, अरुंधती रॉय, अरविंद अडीगा, सलमान रश्दी, झुंपा लाहिरी आदींचे साहित्यही विद्यार्थी वाचत आहेत. याशिवाय जेफ्री आर्चर, स्टीव्हन कींग आदी लेखकांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. इंग्रजीतील सेल्फ-हेल्प, व्यक्तीमत्त्व विकसन आदी विषयाच्या पुस्तकांना अनेक विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये विशेष स्थान आहे. याशिवाय विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास या विषयांतील पुस्तकांबरोबरच प्रेरणादाई व्यक्तीमत्त्वांची आत्मचरित्रेही विद्यार्थी विशेष आवडीने वाचत आहेत. तसेच जागतिक साहित्यातील नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांनाही काही विद्यार्थी
आस्थेने वाचत आहेत. यावरुन सध्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाचन झेप मराठी साहित्यापासून ते जागतिक साहित्यापर्यंत विस्तारल्याचे स्पष्ट होईल.
समाजमाध्यमांबरोबरच इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या ई-बुक्सचे वाचन हा आता अनेकांच्या आवडीचा भाग बनला आहे. छापील माध्यमातील पुस्तकांपेक्षा आजचा विद्यार्थी वाचक या ई-बुक्सच्या वाचनाला सरावलेला आहे. बस-रेल्वेमधून प्रवास करताना विद्यार्थी मोबाईल, टॅबवर ई-बुक्स वाचत असतात. किंवा श्राव्य पुस्तकांच्या माध्यमातून ती ऐकत असतात. त्यामुळे विद्यार्थी आपल्या प्रवासाच्या वेळेचा वाचनानंदासाठी उपयोग करू लागले आहेत. याशिवाय काहींनी तर स्वत:च्या वाचनप्रेमाविषयीचे ‘ब्लॉग्ज’ही लिहिलेले आहेत. त्यात आवडलेल्या-नावडलेल्या पुस्तकांपासून ते ग्रंथखरेदीपर्यंतच्या आपल्या अनुभवांना वाट मोकळी केली जाते. अशा ब्लॉग्जमधूनच विद्यार्थ्यांमधील लेखन कलेलाही वाव मिळत आहे. डिजीटल स्वरुपातील पुस्तकांना वाचणे व त्यांचा संग्रह करणे सोपे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय असली तरी काहीजण छापील पुस्तकांचा वैयक्तिक संग्रहही करत असतात. मुंबईतील चर्चगेट, दादर , किंग सर्कल, गिरगाव आदी अनेक ठिकाणी नव्या-जुन्या मराठी, इंग्रजी पुस्तकांची विक्री करणारी दुकाने आहेत. या दुकानांमध्ये अनेक विद्यार्थी पुस्तके खरेदी करत असतात. काही विद्यार्थी तर दुर्मिळ पुस्तकांचा खास संग्रहही करत असतात. त्यासाठी तासनतास विविध ठिकाणच्या नव्याजुन्या पुस्तकांच्या दुकानांबरोबरच रद्दीच्या दुकानांमधूनही काहीजण पुस्तके मिळवायचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकवेळा आपल्याला हवे असलेले पुस्तक महाविद्यालयाच्या ग्रंथालायत उपलब्ध नसते, किंवा मिळण्याची खात्री नसते. त्यामुळे केवळ महाविद्यालयाच्या ग्रंथालयांवरच अवलंबून न राहता विद्यार्थी स्वत:चाही ग्रंथसंग्रह तयार करत आहेत.
आजचा विद्यार्थी वाचक जाणीवपूर्वक विविध विषयांतील पुस्तकांचे वाचन करत आहे. त्यासोबत अभ्यासही आहेच. वाचनच नाही तर पुस्तकांचा संग्रह, चर्चा करत हा वाचनसंस्कृतीचा ध्वज
फडकत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा