दुकानात पांढऱ्या शुभ्र गाठींनी जागा व्यापली आहे. रंग खेळण्याच्या पिचकाऱ्या दर्शनी भागात मांडल्या गेल्या आहेत. होळीनिमित्त पाण्याची उधळपट्टी टाळावी म्हणून सामाजिक संस्था, संघटनाही पुढे सरसावून पाण्याच्या बचतीवर उपदेश करू लागले आहेत. होळीनिमित्त ही सर्व लगबग आहे. वर्षभर अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यानिमित्त सुट्टीबरोबरच विद्यार्थ्यांना होळीविषयी काय वाटते, ती कशी साजरी करावी आणि सणाच्या बदलत्या स्वरुपाविषयी तरुणाईची मते जाणून घेण्यात आली.
होळीत पाणी वाया घालवू नका
वैज्ञानिक दृष्टिकोणातून जर पाहिले, तर होळी अशा वेळी येते, थंडी कडून वातावरण उष्ण व्हायला लागते. एकप्रकारे निरुत्साही वातावरणाला उत्साही बनवण्यासाठी या सणाची स्थापना झाली असावी. होळी फक्त रंग लावण्यापुरताच मर्यादित नसावी. एकत्र येणे, विचारांची देवाणघेवाण करणे व खेळणे अशी होळी साजरी करावी. आता तर आधीच दुष्काळी स्थिती आहे. आपणही करूया की या होळीत पाणी वाया घालवणार नाही. कारण याच पाण्यापायी शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहेत. ‘पाण्याची बचत करून साजरी करूया होळी कारण शेतकऱ्यांमुळेच पिकते पुरणाची पोळी’
– धनंजय कव्हर
शासकीय दंत महाविद्यालय
रंगाऐवजी गोरगरिबांना मदत करा
भारतीय विविध सण साजरे करतात. पण होळीची मजा वेगळीच. माणसांच्या अंगावर रंगीबेरंगी कपडे शोभून दिसतात. रंगीबेरंगी फुले फक्त झाडावरच शोभून दिसतात. त्यामुळे होळीला रंग उधळून जल प्रदूषण करण्यापेक्षा रंगावर पैसे खर्च न करता जी गोरगरीब आहेत. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, त्यांना या दिवशी पोटभर अन्न द्यावे. त्यामुळे ‘इकोफ्रेंडली होळी’ साजरी करता येईल. पाणी वाचवा मोहीम आपोआपच राबवली जाईल. मुलांकडे पैसे नाहीत म्हणून त्यांना शाळा सोडावी लागते. शिक्षणासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे भारतीयांनी विचारांचे रंग बदलून नवीन पद्धतीने ही होळी साजरी करावी.
प्रमोद काणेकर
नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग
होळीला रंग उधळू द्या!
होळी आली. होळीला रंग लावू नका. पाणी उडवू नका. इको फेंडली रंगच वापरा, वगैरे वगैरे उपदेश देणे सुरू झाले. होळी हा संवादाचा, मिलापाचा सण आहे. सर्वधर्माचे लोक एकत्रितपणे या सणाचा आस्वाद घेतात आणि बंधुभाव जपतात. मात्र हल्ली हे करायचे नाही ते करायचे नाही. याचा अतिरेक दिसतो. उपदेश तेच लोक करतात ज्यांनी याचा यापूर्वी पूर्ण अनुभव घेतला आहे. मग आता जेव्हा आम्हा तरुण लोकांना यात मजा करायची वेळ असते तेव्हाच असा दबाव टाकून किंवा कसली तरी भीती दाखवून रंगाचा बेरंग केला जातो. असे किती पाणी वाया जाणार? रोज रोज थोडीच होळी खेळायला मिळते. एकच दिवस खेळायची ना मग खेळू द्या की मनासारखे. रंग उधळू द्या!
अल्पिता गजभिये
सेंट्रल इंडिया वुमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन