केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. राज्यातील शंभरहून अधिक उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले. वेगवेगळी पाश्र्वभूमी, शिक्षण असलेल्या या उमेदवारांमध्ये काही गोष्टी मात्र समानच! ध्येय साध्य करण्यासाठी केलेला संघर्ष, जिद्द या बळावर या उमेदवारांनी मिळविलेले यश हे अनेकांसाठी पुढील काळात प्रेरणादायी ठरणारेच आहे. यशस्वी झालेल्या राज्यातील काही उमेदवारांची प्रातिनिधिक स्वरूपात ओळख.

कृतीशील समाज संशोधनाला सुरुवात
कौस्तुभ मूळचा मुंबईचा. प्रशासकीय सेवेचे संस्कार त्याला घरातूनच मिळाले. वडील आणि आजोबा पोलीस सेवेत असल्यामुळे प्रशासकीय सेवेबद्दल लहानपणापासूनच आकर्षण निर्माण झाले. पुढील विचार करून त्याने दहावीनंतर कला शाखेला प्रवेश घेतला इतिहास विषयांत पदव्युत्तर पदवीचे (एम.ए.) शिक्षण घेतल्यानंतर हातात एक पर्याय हवा म्हणून सोफिया महाविद्यालयात शिक्षक म्हणूनही काम केले. महसूल सेवेसाठी त्याची निवड झाली आहे. मात्र परदेश सेवेसाठी काम करण्याची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा परीक्षेची तयारीही आता त्याने सुरू केली आहे. ‘प्रशासक हा कृतिशील समाज संशोधक असतो,’ अशा आशयाचे वाक्य माझ्या वाचनात आले होते. त्याच वेळी घरातूनही प्रशासनातील काम पाहात होतो त्यामुळे यूपीएससी देण्याचे निश्चित केले होते,’ असे कौस्तुभ याने सांगितले.
कौस्तुभ जोग (रँक ३९६)

दहा तासांचा अभ्यास कामी आला
मी मूळचा अहमदनगरचा असून सध्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायीक आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मी २०१३ ला पुण्यात साहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून रुजू झालो. पण केंद्र सरकारमध्ये काम करायचे असल्याने मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. कामाच्या व्यापातून अभ्यासासाठी मी दररोज संध्याकाळी ५-६ तास अभ्यास करायचो. मात्र परीक्षा जवळ आल्यावर कामातून दीड महिने सुट्टी घेऊन दिवसातून १० ते १२ तास अभ्यास करीत होतो. यामध्ये मला ज्ञान प्रबोधिनीचे सर्वात चांगले मार्गदर्शन मिळाले. कठीण परिस्थितीत खचून न जाता सतत प्रयत्न करीत राहावे, सतत प्रयत्न केल्याने यश नक्की मिळत असते त्यामुळे प्रयत्न करणे कधीही सोडू नका. यापूर्वीही मी ६ वेळा ही परीक्षा दिली होती, या वेळी मी उत्तीर्ण होऊन देशातून ६०१ वा क्रमांक मिळवला आहे.
– प्रवीण डोंगरे

कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा
राज्याच्या सेवेत कार्यरत असलेला किरण शिंदे हा उमेदवार आता केंद्रीय सेवेत दाखल झाला आहे. त्याची २००९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून राज्यसेवेत निवड झाली. मूळचा नगर जिल्ह्य़ातील चिलवडी गावचा किरण वित्त आणि कोषा विभागात कार्यरत आहे. अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतल्यानंतर खासगी कंपनीत काम करत असताना मित्रांबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तयारीबाबत किरणने सांगितले, ‘माझी महसूल सेवेसाठी निवड झाली आहे आणि मला त्यातच काम करण्याची इच्छा होती. शासकीय नोकरी करत असताना एकीकडे परीक्षेचीही तयारी करत होतो. त्यात माझ्या पत्नीने आणि सहकाऱ्यांनी खूप मदत केली.’
किरण शिंदे (रँक ६१८)

सामूहिक अभ्यासाचा फायदा झाला
मी गेली चार वर्षे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्न करीत होतो. पुण्यातून बी.टेक्.ची पदवी घेतल्यानंतर मी अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेलो. तेथून परत आल्यावर मी यूपीएससीची तयारी सुरू केली. आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी झटून अभ्यास केला. पहिल्या दोन वर्षांत मी पुण्यातून अभ्यास केला. पण अगदी कमी मार्कानी माझी निवड होत नव्हती. अनेक मित्रांनी दिल्लीत जाऊन अभ्यास करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर यूपीएससीचे हब मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील राजेंद्रनगर या भागात राहून मी सुमारे दोन वर्षे अभ्यास केला. या वेळी सामूहिक अभ्यासाचा मला अतिशय उपयोग झाला. यूपीएससीचा अभ्यास करताना मुलांनी सामूहिक अभ्यासाला जास्त महत्त्व दिले जावे असे मला वाटते. कारण एकटे अभ्यास करताना तुमच्या चुका दुरुस्त केल्या जाऊ शकत नाहीत आणि येथे अभ्यासाचा आवाका जास्त असल्याने मुलांना सर्व पुस्तके वाचणे अशक्य आहे. आम्ही दिवसभर अभ्यास केल्यानंतर सायंकाळी काही तास ग्रुपने चर्चा करीत असून यामध्ये न समजलेले विषय समजावणे, पुस्तकांचे संदर्भ दिले जात असत, त्यामुळे अभ्यासाची योग्य दिशा ठरविण्यास मदत होते. यूपीएससीच्या शिकवण्यांना न जाता मी घरीच अभ्यास करणे पसंत केले. माझे ध्येय खूप स्पष्ट होते त्यामुळे खूप वाचण्यापेक्षा काही महत्त्वाच्या पुस्तकांची निवड करून तेच वारंवार वाचणे उपयुक्त आहे.
-रोहन बोत्रे, यशस्वी विद्यार्थी, १८७

वाचनाबरोबरच वैचारिक प्रगल्भता महत्त्वाची..
माझे शिक्षण पुणे जिल्हय़ातील पिंपळेजगताप गावातील नवोदय शाळेत झाले. या शाळेमध्ये गावातील अभ्यासू विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक पक्की केली जाते. या शाळेचा मला फायदा झाला. सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी सीएचा अभ्यास सुरू केला. मात्र शाळेमधील शिकवण मला स्वस्थ बसू देईना आणि मी दीड वर्षांपूर्वी यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. मुळात यूपीएससी समजून घेणे महत्त्वाचे आहे. यूपीएससीमध्ये यश मिळविण्यासाठी विश्लेषण करण्याची सवय महत्त्वाची आहे. मुलांनी वाचनाबरोबरच विश्लेषणसाठीही वेळ काढणे गरजेचे आहे. यूपीएससीच्या परीक्षेत प्रश्नांच्या उत्तरांपेक्षा तुमचे मत, निरीक्षण, वेगळे मुद्दे जास्त प्रभावी ठरतात.आमचे शेतकरी कुटुंब असल्यामुळे माझ्या शिक्षणासाठी आई-बाबांनी जोडधंदा सुरू केला.
-अक्षय कोंडे, यशस्वी विद्यार्थी, २७८

प्रशासनव्यवस्थेचा भाग झालो..
योगेश हा मूळचा माढा तालुक्यातील कुंभेज या गावचा. त्याचे वडील विजय कुलकर्णी हे बँक ऑफ इंडियात अधिकारीपदावर तर आई सुनीता कुलकर्णी पुण्यात स्टेट बँकेत सेवेत आहेत. योगेशचे शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत झाले. दहावीच्या परीक्षेत तो गुणवत्ता यादीत चमकला होता. पुण्यातील एसपी महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर योगेशला पवईच्या आयआयटीत प्रवेश मिळाला आणि तो इलेक्ट्रिक विषयात बी.टेक. झाला. पहिल्या प्रयत्नात त्याला देशात १३८वा क्रमांक मिळाला होता. त्याची निवड पोलीस सेवेसाठी झाली. ‘प्रशासनाविषयी नुसतीच चर्चा केली जाते. मित्रांमध्येही व्यवस्थेबद्दल सातत्याने चर्चा व्हायच्या. चर्चेपेक्षा या व्यवस्थेचा भाग झाले पाहिजे .
योगेश कुंभेजकर (राज्यात पहिला, देशात आठवा)

ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण
लातूरच्या श्रीकृष्ण पांचाळ याने राज्यात दुसरा, तर देशात सोळावा क्रमांक मिळवून यशाचा झेंडा रोवला. श्रीकृष्णने ‘जे. जे.’मधून एमबीबीएस पूर्ण केले. शेवटच्या वर्षांत असताना आयएएस झाल्यानंतर आरोग्य क्षेत्रातही चांगले काम करता येते याची जाणीव झाल्याने त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्याच प्रयत्नात त्याला हे यश मिळाले. श्रीकृष्ण हा चाकूर तालुक्यातील हणमंत जवळगा गावचा राहणारा. मुंबईच्या जे. जे. महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केले. ‘ग्रामीण भागातील असल्यामुळे प्रश्नांची जाण आहे.
श्रीकृष्ण पांचाळ(राज्यात दुसरा, देशात सोळावा)

लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेची आवड
राहुल स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या एका संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कोलकाता येथील आयआयएममधून व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर पदवीचे (एमबीए) शिक्षण घेतले आहे. अभ्यास करतानाच कामही करण्याच्या हेतूने शिक्षक म्हणून काम सुरू केले. गेल्यावर्षीही त्याची यूपीएससीमध्ये निवड झाली होती. राहुलने सांगितले, ‘माझे वडील जिल्हा आरोग्य अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेचे आकर्षण निर्माण झाले. त्यामुळेच नोकरी सोडून मी स्पर्धापरीक्षांची तयारी केली.
-राहुल पांडवे (रँक २००)

Story img Loader