एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे
या लेखामध्ये भारतीय राजकारणातील राजकीय पक्ष, निवडणूक प्रक्रिया, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण व्यवस्था या गतिमान मुद्यांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
राजकीय पक्ष व हितसंबंधी गट
राष्ट्रीय पक्षांची स्थापना, संस्थापक, स्थापनेमागील कारणे व पार्श्वभूमी, विचारप्रणाली, अजेंडा, निवडणूक चिन्ह, त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे व मुद्दे, महत्त्वाचे नेते इत्यादी मुद्यांची कोष्टकामध्ये मांडणी करून अभ्यास करता येईल.
राष्ट्रीय पक्षांच्या निवडणुकीतील कामगिरीचा अभ्यास लोकसभा निवडणुकांवर फोकस ठेवून करायला हवा. मात्र महाराष्ट्रातील त्यांची विधानसभा निवडणुकांतील कामगिरीही पाहायला हवी.
राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठीचे निकष, यामध्ये झालेले बदल, पक्षांचे वित्तीय व्यवहार इत्यादी मुद्यांचा विचार करावा. यामध्ये चालू घडामोडींचा संदर्भ असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ निवडणूक बंधपत्रांचा (Electoral Bonds) मुद्दा.
प्रादेशिक पक्षांचा अभ्यास करताना महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांवर फोकस असायला हवा. पण राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असणाऱ्या इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांचाही अभ्यास अपेक्षित आहे. सर्व महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष अभ्यासताना राष्ट्रीय पक्षांसाठी वापरलेल्या कोष्टकामधील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. मात्र त्या पक्षांचे प्रभावक्षेत्र, सामाजिक आधार हे मुद्देही अत्यंत महत्वाचे आहेत.
महाराष्ट्रातील मुख्य प्रादेशिक पक्षांबाबत त्यांचे प्रभावक्षेत्र लक्षात घेताना सामाजिक, आर्थिक सामाजिक घटक लक्षात घ्यायला हवेत. सहकार क्षेत्रातील त्या त्या पक्षांचा वाटा, शहरी – ग्रामीण प्रभावामधील तफावत व त्यामागील कारणे हे गतीशील (Dynamic) मुद्दे समजून घ्यायला हवेत.
राजकीय पक्षांचा अभ्यास करताना समजून घ्यायचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतरबंदी बाबतच्या तरतूदी व घटनादुरुस्त्या. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निकाल Floor test चा सिद्धांत अशा बाबी नीट समजून घेतल्या पाहिजेत.
राजकीय पक्ष आणि हितसंबंधी गट (pressure groups) यांमधील फरक व्यवस्थित समजून घ्यावा. त्यांचे प्रकार व हितसंबंध समजून घेणे आवश्यक आहे. देशातील व महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि प्रभावी हितसंबंधी गट माहीत असायला हवेत. त्यांचे अध्यक्ष, स्थापनेचा हेतू, कार्यपद्धती, लक्षणीय कामगिरी इत्यादी बाबी लक्षात घ्यायला हव्यात.
निवडणूक प्रक्रिया
आधीची मतपत्रिकांची व्यवस्था, त्यानंतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्रांचा निर्णय, ईलेक्ट्रानिक मतदान यंत्रे, त्यातील शंका निरसनासाठीची व्हीव्हीपॅट व्यवस्था अशा ठळक टप्प्यांतून भारतीय निवडणूक प्रक्रियेची खास वैशिष्टय़े लक्षात घ्यावीत.
विधानमंडळ आणि लोकसभेसाठीच्या मतदारसंघांची रचना, मतदारसंघांचे सीमांकन, राखीव मतदारसंघांची संकल्पना या बाबी बारकाईने समजून घ्याव्यात. याबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत विवाद उद्भवल्यास कारवाईची तरतूदही समजून घ्यावी.
निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्रीय व राज्य आयोगांबाबतचे घटनेतील अनुच्छेद, त्यांची रचना, सदस्यत्वासाठीचे निकष, कार्ये, अधिकार हे पारंपरिक मुद्दे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, निवडणूक सुधारणा, आयोगाचे नियम व त्यांचे यशापयश यांचा अभ्यास आवश्यक आहे. मतदानाचा काळ, मतदारावर प्रभाव टाकणारे घटक, आयोगासमोरची समस्या या मुद्यांबाबत विश्लेषणात्मक अभ्यास गरजेचा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाचे महत्त्वाचे निर्णय समजून घ्यावेत.
आदर्श आचारसंहिता, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर या संबंधातील ठळक घडामोडींवर निवडणुकांच्या काळात जास्त भर देणे अपेक्षित आहे. मतदारावर प्रभाव टाकणारे घटक, आयोगासमोरील समस्या या बाबींवर वृत्तपत्रे, चॅनल्स यातून होणाज्या चर्चा या आधारे स्वत:चे विश्लेषण व चिंतन करणे गरजेचे आहे.
प्रसारमाध्यमे –
शासकीय धोरणानिर्मितीवर प्रसारमाध्यमांचा होणारा परिणाम उदाहरणांच्या आधारे समजून घेता येईल. एखाद्या मुद्यावर जनमत तयार करणे, लोकजागृती करणे, लोकांच्या विचारांना दिशा देण्यासाठी चर्चा करणे व त्याबाबतचे विविध आयाम अभ्यासपूर्णरीत्या लोकांसमोर आणणे हे प्रसारमाध्यमाचे कार्य आहे. त्या दृष्टीने त्यांचे महत्व समजून घ्यावे.
वरील मुद्याच्या अनुषंगाने Press Council of India ने जाहीर केलेली नितितत्त्वे (code of conductcode of conduct) अभ्यासणे आवश्यक आहे. Council ची रचना, कार्ये, आत्तापर्यंतचे महत्त्वाचे निर्णय व कामगिरी आणि मूल्यमापन या मुद्यांच्या आधारे तयारी करायला हवी. शासकीय व राजकीय जनसंपर्क माध्यमांसाठीची आचारसंहिता समजून घ्यायला हवी.
PCI ची नीतीतत्त्वे व सर्वसाधारण आदर्श निकषांवर न बसणारी प्रसारमाध्यमे आणि कसलेही संनियंत्रण नसलेली समाजमाध्यमे यांमुळे जनमतावर, सामाजिक सलोख्यावर, सौहार्दपूर्ण मतभेदांवर आणि समावेशी निर्णय प्रक्रियेवर होणारा विपरीत परिणाम समजून घ्यायला हवा. याबाबत फेक न्यूज व पेड न्यूज या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.
महिलांची माध्यमातील प्रतिमा निर्मिती (portrayal) हा भाग विश्लेषणात्मक व मूल्यात्मक (ethical/moral) आहे. याबाबत तसेच प्रसारमाध्यमांबाबत चर्चेत येणारा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा अभ्यासताना वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्सवरील गांभीर्यपूर्ण चर्चा, इंटरनेटवरील लेख यांचा अभ्यास करुन स्वत:चे चिंतन करणे आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय तसेच चालू घडामोडी पहाणे आवश्यक आहे.
शिक्षण व्यवस्था –
या घटकामध्ये शिक्षणाबाबतच्या घटनेतील तरतुदी, घटनादुरुस्त्या हा पूर्णपणे राज्यव्यवस्थेतील भाग आहे. शिक्षणाबाबतची मार्गदर्शक त्तत्वे, मूलभूत कर्तव्ये यांच्या मागील उद्देश व त्यांचे निहीतार्थ व्यवस्थित समजून घ्यावेत.
वंचित घटकांच्या शिक्षणाबाबतच्या समस्या, कारणे, उपाय हा पेपर ३ चाही भाग आहे. यातील अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट घटकांबरोबरच अन्य सामाजिक प्रवर्गाबाबतही अभ्यास आवश्यक ठरेल. शिक्षण संस्थांमधील आरक्षणाचा विषय नीट समजून घ्यायला हवा.
खासगीकरणामुळे शिक्षणाच्या उपलब्धता, गुणवत्ता व दर्जावरील परिणाम समजून घ्यावेत. याबाबत न्याय्य व्यवस्था साकारण्यासाठी शिक्षण संस्थांमधील आरक्षण, शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदी, शिक्षण हा मूलभूत हक्क मानण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
उच्च शिक्षणातील समकालीन आव्हानांमध्ये अभ्यासक्रमांमध्ये कालानुरूप बदलांची गरज, रोजगार क्षमता अशा मुद्यांचा विचार करावा.
माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रातील वापर, शासकीय प्रकल्प त्यांतील तरतुदी समजून घ्याव्यात. यामध्ये प्रकल्पाचा उद्देश, त्याचे स्वरुप, उद्दिष्टय़े, उपलब्धता या बाबी पीहाव्यात.
सर्व शिक्षा अभियान व माध्यान्ह भोजन योजना तसेच राज्य शासनाच्या शिक्षणविषयक विविध योजना यांच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.