मित्रहो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र वन सेवा परीक्षेची ५५ जागांसाठीची जाहिरात अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आजच्या अंकात आपण ‘महाराष्ट्र वन सेवा’ परीक्षेद्वारे केल्या जाणाऱ्या नेमणुकीविषयी, अभ्यासक्रमाविषयी व आवश्यक पात्रतेविषयी माहिती घेऊ.
महाराष्ट्र लोकसवा आयोगाद्वारे वन सेवा विभागातील साहाय्यक वन संरक्षक गट ‘अ’ (अउा) व वनक्षेत्रपाल – गट ‘ब’ (फाड) या पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे निवड केली जाते. अंतिम गुणवत्ता यादीतील गुणांच्या आधारे वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल अशी उमेदवारांची नेमणूक होते.
परीक्षेचे टप्पे
- पूर्वपरीक्षा- १०० गुण
- मुख्य परीक्षा- ४०० गुण
- मुलाखत- ५० गुण
परीक्षेसाठी आवश्यक पात्रता
१. शैक्षणिक अर्हता – वनस्पतीशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपकी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे.
विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारात विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. शारीरिक पात्रतेविषयीचा तक्ता स्वतंत्रपणे दिला आहे.
३. डोळयाची दृष्टीतीक्ष्णता (व्हिज्युअल अॅक्विटी) ६/६ असावी.
पूर्व परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वन सेवा पूर्वपरीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम १/१०/२०१५ रोजी त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेला आहे.अभ्यासक्रम :
- मराठी भाषा
- इंग्रजी भाषा
- जागतिक, भारतातील चालू घडामोडी.
- बुद्धिमत्ता आणि अंकगणित.
२०१४च्या वन सेवा परीक्षेचे विश्लेषण केल्यास आयोगाने प्रश्न वरील घटकांवर विचारल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र, सुधारित अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान हा घटक पूर्व परीक्षेतून वगळण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार वरील चार घटकांवर समप्रमाणात प्रश्न विचारले जातील असे गृहीत धरल्यास प्रत्येक घटकावर किमान २० ते २५ प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही घटकावर दुर्लक्षित न करता परीक्षार्थीनी प्रत्येक घटकाच्या अभ्यासाला समप्रमाणात वेळ द्यावा.
२०१४ च्या पूर्वपरीक्षेच्या निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास प्रामुख्याने असे नमूद करणे योग्य ठरेल की, जास्त प्रश्न सोडविण्याच्या ओघात परीक्षार्थीना निगेटिव्ह मार्किंगचा फटका बसला आहे. त्यामुळे स्वत: परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिकेचे सूक्ष्म विश्लेषण करावे व सखोल अभ्यास आणि प्रश्नपत्रिकेचा सराव यावर भर द्यावा.
अभ्यासाचे नियोजन
मराठी व इंग्रजी या विषयांचे व्याकरण व उताऱ्यांचा सराव दररोज करावा.
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या घटकाला दिवसातून किमान दोन तास द्यावेत.
चालू घडामोडी या घटकासाठी परीक्षार्थीनी दररोज किमान एक मराठी व इंग्रजी वर्तमानपत्र वाचून स्वत:चे टिपण तयार करावे.
संदर्भ साहित्य सूची
१) मराठी भाषा-
* सुगम मराठी व्याकरण- मो. रा. वािळबे
* मराठी व्याकरण- बाळासाहेब िशदे
* संपूर्ण मराठी- के सागर पब्लिकेशन
२) इंग्रजी भाषा-
* English Grammer- Wern & Martin
* English Grammer- Pal & Suri
* संपूर्ण इंग्रजी- के सागर पब्लिकेशन
३) बुद्धिमत्ता व अंकगणित-
* बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित- आठवी, नववी, दहावी.
* एमटीएसची पुस्तके.
* क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड- आर. एस. अगरवाल
* रिझिनग- आर. एस.अगरवाल.
४) चालू घडामोडी-
योजना, लोकराज्य मासिके, करंट ग्राफ वार्षकिी, एखादे आघाडीचे इंग्रजी व मराठी दैनिक.
(महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेची माहिती आपण पुढील अंकात घेऊ.)