रोहिणी शहा
अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याआधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रातिनिधीक प्रश्न पाहू.
प्रश्नांतील योग्य उत्तराचे पर्याय ठळक के लेले आहेत.
१) थॉमस पेनच्या विचारांनी प्रभावित झालेल्या समाजसुधारकाचे नाव सांगा.
(१) गोपाळ गणेश आगरकर
(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(३) न्यायमूर्ती रानडे
(४) महात्मा जोतिराव फुले
२) संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
(१) यशवंतराव चव्हाण
(२) बाळासाहेब खेर
(३) सी. डी. देशमुख
(४) के. एम. पण्णिकर
३) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचे १०० टक्के भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यात येत नाही?
(१) औरंगाबाद आणि बीड
(२) लातूर
(३) जालना आणि परभणी
(४) हिंगोली आणि नांदेड
४) जोडय़ा जुळवा :
अ. अनुच्छेद १५५ I. राज्यपालांचे कार्यकारी अधिकार
ब. अनुच्छेद १५४ II. राज्यपालांचा कालावधी
क. अनुच्छेद १५३ III.राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार
ड. अनुच्छेद १५६ IV .राज्यपाल पद V. राज्यपालांची नियुक्ती
(१) अ— III; ब— II; क— V; ड— I
(२) अ— II; ब— I; क— IV; ड— V
(३) अ— I; ब— II; क— III; ड— IV
(४) अ— III; ब— I; क— IV ; ड— II
५) खालील विधाने विचारात घ्या.
अ. ऑक्टोबर १९४५ मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली.
ब. मार्च १९५०मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली.
क. ऑगस्ट १९५२ मध्ये राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना झाली.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(१) अ आणि ब (२) ब आणि क
(३) अ आणि क (४) वरील सर्व
६) खालील विधाने विचारात घ्या :
अ. सरासरी ग्राहक किंमत भाववाढ २०१४—१५मध्ये ५.९ टक्केपासून २०१५—१६ मध्ये ४.९ टक्के घटली.
ब. सरासरी किंमतवाढ आधारित घाऊक किंमतचा निर्देशांक २०१४—१५मध्ये २.० टक्केपासून २०१५—१६ मध्ये (उणे)२.५ टक्केनी घटला.
क. एप्रिल — डिसेंबर २०१६ या काळात सरासरी किंमतवाढ २.९ टक्के होती.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(१) अ आणि ब (२) ब आणि क
(३) अ आणि क (४) वरीलपैकी सर्व
७) खालील विधाने लक्षात घ्या :
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
ब) महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.
क) पं. मदन मोहन मालवीय यांना २०१६मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
ड) सचिन तेंडुलकर यांना २०१४मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत?
(१) फक्त अ (२) फक्त ड (३) फक्त ब आणि क (४) फक्त अ आणि ड
८) २०१९ हे वर्ष महाराष्ट्रातील तीन नामवंत व्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ते म्हणजे—
१) पु. ल. देशपांडे — ग. दि. माडगूळकर — राजा परांजपे
२) बाबा आमटे — पु. ल. देशपांडे — राजा नवाठे
३) सुधीर फडके — पु. ल. देशपांडे —ग. दी. माडगूळकर
४) सुधीर फडके — कुमार गंधर्व — प्र. के. अत्रे
९) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना ही किनारी प्रदेशाच्या पर्यावरण संरक्षणासाठी काढलेली आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहासाठी कोणती किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना लागू आहे?
(१) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना— I
(२) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना— II
(३) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना— III
(४) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना— IV
१०) सन २०११च्या जणगणनेनुसार,— — — — — आणि — — या जिल्ह्यामंची १५ टक्केपेक्षा कमी लोकसंख्या शहरांमध्ये राहत आहे.
(१) गडचिरोली आणि सिंधुदुर्ग
(२) गडचिरोली आणि गोंदिया
(३) गोंदिया आणि सिंधुदुर्ग
(४) गोंदिया आणि वाशिम
वरील प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात.
अर्थव्यवस्था या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात व त्यानंतर चालू घडामोडींवर भर देण्यात येतो.
प्रत्येक घटकावर किमान एक प्रश्न विचारला जाईल याची दक्षता घेतली जाते, पण घटकनिहाय प्रश्नसंख्या दरवर्षी बदलत असलेली दिसते.
बहुविधानी प्रश्नांची संख्या आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत सन २०१९मध्ये लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे. सरळसोट किंवा बहुविधानी अशा कोणत्याही स्वरूपात विचारलेले असले तरी प्रश्नांची काठीण्य पातळी खूप जास्त नाही.
एकूण २० गुणांसाठी पाच पारंपरिक विषय आणि चालू घडामोडी अशा एकूण सहा घटकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असला तरी प्रत्येक विषयाच्या बेसिक आणि पारंपरिक मुद्दय़ांवरच प्रश्न आधारलेले असल्याने तयारीमध्ये फारसा ताण येणार नाही.
सामान्य अध्ययन घटकाच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.