श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये भारताचा व जगाचा भूगोल कसा अभ्यासावा आणि याचबरोबर मागील मुख्य परीक्षांमध्ये (२०१३ ते २०२० पर्यंत) या घटकांवर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची चर्चा करणार आहोत. या विषयाचे स्वरूप Semi-Scientific असल्यामुळे या विषयाचा संकल्पनात्मक पाया याचबरोबर संबंधित प्रदेशाची प्राकृतिक रचना, आर्थिक व सामाजिक पद्धती तसेच लोकसंख्या इत्यादींची सखोल माहिती असणे परीक्षेच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरते. मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न ‘भारताचा भूगोल’ या घटकावर विचारले जातात. यामध्ये भारताची प्राकृतिक रचना, आर्थिक व सामाजिक पध्दती तसेच लोकसंख्या यासारख्या वैशिष्टय़पूर्ण पैलूंवर अधिक भर असतो. याचबरोबर जगाचा भूगोल या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या तुलनेने कमी असते.
२०२० मध्ये ‘वाळवंटीकरण प्रक्रियेस हवामानाच्या सीमा नसतात. उदाहरणासह समर्थन करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. याच वर्षी ‘हिमालयामधील हिमनद्यांचे वितळणे भारताच्या जल संसाधनावर कशाप्रकारे दूरगामी परिणाम करणारे आहे?’ हा प्रश्न विचारला होता.
२०१९ मध्ये जागतिक तापमानवाढीमुळे प्रवाळ जीवन पद्धतीवर ((coral life system) परिणामाची उदाहरणासह मूल्यांकन करा.
२०१८ च्या मुख्य परीक्षेत समुद्री पारिस्थितिकीवर मृत क्षेत्रे यांच्या विस्ताराचे कोणकोणते परिणाम होतात?
२०१७ च्या मुख्य परीक्षेत ‘महासागरीय क्षारता मधील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा’.
२०१६ च्या मुख्य परीक्षेत भारतातील प्रमुख शहरामधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
२०१५ च्या मुख्य परीक्षेत ‘मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीतील वायू प्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचा कल हवामान व पर्यावरणसंबंधी अनुषंगाने होता, पण याचबरोबर या शहरांची भौगोलिक स्थाने व यासाठी जबाबदार असलेल्या प्राकृतिक घटक, त्याचबरोबर औद्योगिकीकरण व शहरीकरण इत्यादी गोष्टींचा एकत्रित विचार करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.
२०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणात मर्यादित असतात का’, हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न प्राकृतिक भूगोलातील हवामान घटकाशी संबंधित आहे व जगातील तीन भौगोलिक स्थानाशी जोडला गेलेला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित भौगोलिक स्थानांची प्राकृतिक रचना तसेच या प्रदेशातील हवामानपद्धती व याच प्रदेशामध्ये ही चक्रीवादळे इतर प्रदेशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात याची कारणे सर्वप्रथम माहिती असणे आवश्यक आहे. या प्रश्नांचा रोख हा उष्णप्रदेशीय चक्रीवादळे यासाठी नेमके कोणते घटक (प्राकृतिक) जबाबदार आहेत व उत्तरामध्ये फक्त यासाठीची कारणे लिहिणे अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून असणारी सुसंगत व समर्पक माहिती उत्तरामध्ये आपण देऊ शकतो.
२०१३ च्या मुख्य परीक्षेत ‘दक्षिण भारतातील राज्यामध्ये नवीन साखर उद्योग स्थापन करण्याचा कल वाढत आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? समर्थनासह चर्चा करा.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता व हा प्रश्न भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित आहे. पण यासाठी काही भौगोलिक कारणे महत्त्वाची ठरतात व त्यांचा उल्लेख उत्तरामध्ये करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. साखर उद्योग स्थापन करण्यासाठी नैसर्गिकरीत्या पूरक असणारे घटक व उपलब्ध साधनसंपत्ती, सक्षम दळणवळणाचे उपलब्ध पर्याय व यासाठी पूरक असणारी जमीन ज्यामध्ये ऊस हे पीक घेणे अधिक उपयुक्त ठरते इत्यादी माहितीची चर्चा उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे.
भूगोल या घटकावर २०१३ ते २०२० पर्यंतच्या मुख्य परीक्षांमध्ये एकूण ६४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की भूगोल या विषयामधील जवळपास सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि सर्वाधिक भर हा भारताच्या भूगोलावर आहे पण बहुतांश प्रश्न प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले आहेत. यातील अनेक प्रश्नांना विषयाच्या पारंपरिक ज्ञानासह चालू घडामोडींची पार्श्वभूमी जोडण्यात आलेली आहे, हे पुढील विश्लेषणावरून लक्षात येते. उपरोक्त नमूद केलेल्या मागील प्रश्नांचा एक संक्षिप्त आढावा तुम्हाला भूगोल या विषयाचा परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असे वाटते. पण याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नाचा नेमका रोख ओळखता येणे आणि अपेक्षित असणारी माहिती उत्तरामध्ये समर्पकपणे देता आली पाहिजे. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी शब्द मर्यादा दिलेली असते. याचे भान ठेवून परीक्षार्थीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.