प्रवीण चौगले
प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘पर्यावरण परिस्थितिकी’ या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नसंख्येवरून याचे महत्त्व अधोरेखित होते. या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पुढीलप्रमाणे – वर्ष आणि कंसात प्रश्नसंख्या दिली आहे.
२०११ (१६), २०१२ (१२),
२०१३ (१३), २०१४ (१७),
२०१५ (१०), २०१६ (१८),
२०१७ (११), २०१८ (१३),
आणि २०१९ (१३) इ.
पर्यावरण परिस्थितिकी हा अभ्यासघटक परस्परव्यापी (ओव्हरलॅपिंग) स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये जीवशास्त्र, परिस्थितिकी आणि भूगोल या विषयांचा अंतर्भाव होतो. ढोबळमानाने या अभ्यासघटकामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, वातावरणबदल, इ. शी संबंधित मुद्दय़ांचा समावेश असल्याने यूपीएससीने या घटकाच्या तयारीकरिता कोणत्याही प्रकारच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नसल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद केले आहे. या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे या घटकाचे समकालीन स्वरूप होय. असे असले तरी पारंपरिक घटकांचे अध्ययन करणे आवश्यक आहे, ही बाब पुढील प्रश्नांवरून स्पष्ट होते.
२०१५ मध्ये परिसंस्था (इकोसिस्टीम) काय आहे?
२०१३ मध्ये अन्नसाखळी, ecological niche इ. मूलभूत संकल्पनांवर आलेल्या प्रश्नांवरून पारंपरिक घटक महत्त्वाचे असल्याचे दिसते.
या अभ्यासघटकांवर पकड मिळविण्याकरिता काही घटकांचे प्राधान्यक्रमाने अध्ययन करावे. उदा. परिसंस्था, अन्नसाखळी, किस्टोन स्पेसीज, Eutrophication इ. परिस्थितिकीशी
संबंधित महत्त्वाच्या संकल्पना माहीत करून घ्याव्यात.
या अभ्यासघटकांमध्ये पर्यावरणीय प्रदूषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये हवा, जलप्रदूषण आणि त्याची कारणे, प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेले कायदे, संस्था, प्रदूषणावरील उपाययोजना याबाबत जाणून घ्यावे. २०१९ मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ या कायद्यावर प्रश्न विचारला गेला.
खालील विधाने लक्षात घ्या :
पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ हा भारत सरकारला प्राधिकृत करतो.
१) पर्यावरण संरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये जनसहभागाची आवश्यकता व असा सहभाग प्राप्त करण्याची पद्धत व प्रक्रिया यांचे विवरण देणे.
२) विविध स्रोतांकडून होणारे पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा विसर्जनाविषयीचे मानक निर्धारित करावे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे?
यासोबतच पर्यावरणीय प्रदूषणासंबंधीच्या COD, BOD, Bioaccumulation, Biomagnification इ. संकल्पना समजून घ्याव्यात.
या अभ्यासघटकामध्ये अधिक गुण मिळवून देणारा घटक म्हणजे जैवविविधता होय. कारण जैवविविधतेवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या अधिक आहे. यामध्ये जैवविविधतेची संकल्पना, प्रकार, इकोसेन्सिटिव्ह झोन, वन्यजीव अभयारण्ये, नॅशनल पार्क, देवराई, जीवावरण, राखीव क्षेत्रे, जैवविविधता हॉटस्पॉट, in—situ आणि Ex—situ संवर्धन, व्याघ्रप्रकल्प, इ. बाबी महत्त्वपूर्ण आहेत. या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न पाहू या.
प्र. १. खालील विधाने विचारात घ्या. (२०१९).
१) आशियायी सिंह नैसर्गिकरीत्या फक्त भारतात आढळतो.
२) दोन कुबडवाला उंट नैसर्गिकरीत्या फक्त भारतात आढळतो.
३) एकशिंगी गेंडा नैसर्गिकरीत्या फक्त भारतातच आढळतो.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
प्र. २. खालील जोडय़ा लक्षात घ्या. (२०१९). वन्यजीव नैसर्गिक आढळ
१. निळ्या कल्ल्याचा महाशीर कावेरी नदी
२. इरावदी डॉल्फिन चंबळ नदी
३. रस्टी स्पॉटेड कॅट पूर्व घाट
वरीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?
जैवविविधतेबरोबरच दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हवामान बदल होय. हा घटक समकालीन स्वरूपाचा आहे. परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या अधिक आहे. या घटकामध्ये हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, हरितवायू परिणाम, हरितगृह वायू आदी संकल्पनांबरोबरच हवामान बदलाशी संबंधित संस्था जसे UNFCC, क्योटो प्रोटोकॉल, IPCC, REDD/REDD+ आदी पुढाकार, ओझोन अवक्षय, कार्बन सिंक, कार्बन क्रेडिट, उत्सर्जन व्यापार, माँट्रियाल प्रोटोकॉल, महासागरांचे आम्लीकरण, हवामान बदलविषयक दरवर्षी होणाऱ्या परिषदांचा आढावा घ्यावा.
२०१९ च्या पूर्वपरीक्षेत हरितगृह वायूविषयक विचारण्यात आलेला प्रश्न पुढीलप्रमाणे –
प्र. खालील बाबींवर विचार करा.
अ) कार्बन मोनॉक्साइड ब) मिथेन
क) ओझोन ड) सल्फर डायऑक्साइड
वरीलपैकी कोणता वायू पिकांचे/जैववस्तूंचे अवशेष जाळल्यानंतर वातावरणात सोडला जातो.
पर्यावरणविषयक कार्यरत असणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय परिषदा उदा. रिओ परिषद, रामसर करार, CITES, ICUN,, स्टॉकहोम परिषद, रोस्टरडॅम परिषद, बेसल करार, इ. विषयी माहिती घेणे आवश्यक ठरते. याचबरोबर राष्ट्रीय
पातळीवर कार्यरत असलेल्या नॅशनल बायोडायव्हर्सिटी अॅथोरिटी, वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल, अॅनिमल वेल्फेअर बोर्ड, सेन्ट्रल झू अॅथोरिटी, NGT तसेच CAMPA, क्लीन एनर्जी फंड, वन्यजीव कृती आराखडा, इ. संस्थांविषयी जाणून घ्यावे.
पर्यावरण परिस्थितिकी या घटकाच्या तयारीसाठी ‘पर्यावरण व परिस्थितिकी’ (इंद्रजीत यादव आणि अतुल कोटलवार) हे पुस्तक उपयुक्त आहे. याबरोबरच ‘Ecology and Environment’ (पी. डी. शर्मा) हे संदर्भ
पुस्तक पाहावे. पर्यावरण क्षेत्रातील घडामोडींसाठी ‘द हिंदू’ आणि ‘डाऊन टू अर्थ’ आदींचे नियमितपणे वाचन करून नोट्स बनवाव्यात. शिवाय केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संकेतस्थळांना नियमित भेटी द्याव्यात.