आज पुरवठा साखळी व्यवस्थापनाला मोठे महत्त्व आले आहे. एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांमध्ये अभ्यासाव्या लागणाऱ्या ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या स्पेशलायझेशनच्या अभ्यासक्रमाविषयी –
उत्पादन केलेली कोणतीही वस्तू ही शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचप्रमाणे उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल तसेच इतर साहित्य हे उत्पादकाकडे वेळेवर पोहोचले पाहिजे. सेवाक्षेत्रामध्ये कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्याचा प्रश्न नसला तरीदेखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी त्यांना काही गोष्टींची आवश्यकता भासते. या सर्व गोष्टी करण्यासाठी म्हणजेच उत्पादन करण्यासाठी, उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अत्यंत आवश्यक असते. ही पुरवठा साखळी कशा पद्धतीने अमलात आणावी, तिचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच यावरील खर्च कमीत कमी कसा करावा आणि एकूणच पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढवावी या सर्व महत्त्वाच्या विषयांची माहिती ‘पुरवठा साखळी व्यवस्थापन’ म्हणजेच ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या स्पेशलायझेशनमध्ये होते. एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांमध्ये हे स्पेशलायझेशन काही विद्यापीठांमध्ये घेता येते.
पुरवठा साखळीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिकीकरणामुळे पुरवठा साखळी ही केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे कित्येक औद्योगिक संस्थांमध्ये असे दिसते की मालाची खरेदी एका देशामध्ये तर उत्पादन दुसऱ्या देशामध्ये आणि मार्केटिंग हे सर्व जगामध्ये. यामुळे पुरवठा साखळीमधील गुंतागुंत जरी वाढली असली तरी खर्च मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे पुरवठा साखळी व्यवस्थापनाला मोठय़ा प्रमाणावर महत्त्व आले आहे. या दृष्टीने या स्पेशलायझेशनमध्ये पुढील विषय महत्त्वाचे ठरतात आणि त्यांचा अभ्यास करता येतो.
पुरवठा साखळी व्यवस्थापन (सप्लाय चेन मॅनेजमेंट) – पुरवठा साखळी ही एखाद्या व्यवसायामध्ये, मग तो उत्पादन क्षेत्रामधील असो किंवा सेवा क्षेत्रातील, अतिशय आवश्यक असते. या साखळीचा प्रमुख उद्देश असा की, निर्माण केलेली वस्तू किंवा देत असलेली सेवा ही ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. याचबरोबर एखादी वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत म्हणजेच वेगवेगळ्या मध्यस्थांची मदत आवश्यक ठरते. उत्पादकांकडून घाऊक व्यापाऱ्याकडे आणि नंतर किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत अंतिम ग्राहकाकडे असा पारंपरिक वितरण साखळीचा प्रकार असतो. यामध्ये वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच, उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्यांकडे आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांकडे पोचवणे हे कामही वितरण साखळीमधून केले जाते. या दृष्टीने वितरण साखळीचे व्यवस्थापन कसे करावे की, ज्यामुळे कोणताही अडथळा न येता वस्तू ग्राहकांपर्यंत पोचतील, यासंबंधीचा अभ्यास या विषयाद्वारे करता येतो, याचबरोबर वितरण पुरवठा साखळीतील आधुनिक प्रवाह, तसेच वितरण साखळीवर तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम, जागतिकीकरणाचे परिणाम इ. अनेक गोष्टी या विषयांमध्ये समाविष्ट होतात. याशिवाय वितरणाच्या वेगवेगळ्या पद्धती, ग्राहकांच्या पुरवठा साखळीकडून असलेल्या अपेक्षा, ग्राहकांना अधिक चांगल्या सोयी कशा पद्धतीने देता येतील याचे नियोजन आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या सर्व गोष्टींचा समावेश या विषयामध्ये होतो.
लॉजिस्टिक मॅनेजमेंट : वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांची मदत घ्यावी लागते. यासाठी प्रत्यक्ष वस्तूची वाहतूक कशा पद्धतीने करावी की कमीत कमी खर्चामध्ये ग्राहकांपर्यंत पोचवली जाईल याची माहिती या विषयातून मिळते. पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ती वाहतुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांशी इंटिग्रेट करणे आवश्यक ठरते. उत्पादित वस्तूंबरोबर, दिल्या जाणाऱ्या सेवांचे वितरण कसे करावे याचीही माहिती या विषयामध्ये होते.
वितरण साखळीतील वस्तूंचे नियोजन : वितरण साखळी कार्यक्षम होण्यासाठी या साखळीला वस्तूंचा पुरवठा हा सुरळीत म्हणजेच कोणत्याही अडथळ्याविना झाला पाहिजे. यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. यासाठी वस्तू निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल व वस्तू तयार झाल्यानंतर तिचे वितरण याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या दोनही गोष्टी सुरळीत होण्यासाठी वाहतुकीच्या साधनांचे काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक ठरते. यासाठी वाहतुकीची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत, त्यांचा तुलनात्मक खर्च किती आहे याबरोबर वाहतुकीस लागणारा वेळ इ. सर्व बाबींचा विचार करावा लागतो. वस्तूंचा आणि कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी त्यांची साठवण व साठवणीचे योग्य व्यवस्थापन आवश्यक ठरते. यादृष्टीने गोदामांची रचना, साठवणीची क्षमता तसेच गोदामे नक्की कोणत्या ठिकाणी असावीत याचे नियोजन, गोदामे भाडय़ाने द्यावीत की कंपनीने बांधावीत आदी इ. अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक असते. वितरण साखळीमध्ये वस्तूंचे संरक्षण व्हावे यासाठी लागणारे पॅकिंग व मटेरियल हॅन्डलिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा विचार करावा लागतो.
म्हणून पुरवठा साखळी ही कार्यक्षमतेने चालण्यासाठी वस्तूंचा पुरवठा हा अबाधित कसा ठेवता येईल या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास होतो, या व्यतिरिक्त यासंबंधित असलेले वेगळे कायदे जाणून घेण्यासाठी या विषयाची मदत होते.
वस्तूंच्या साठय़ाचे व्यवस्थापन (इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट) – पुरवठा साखळी कार्यक्षम करण्यासाठी ज्याप्रमाणे वाहतूक आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वस्तूंची व कच्च्या मालाची उपलब्धता तितकीच आवश्यक आहे. ही उपलब्धता विनाअडथळा व्हावी म्हणून मालाची साठवण करणे आवश्यक असते. परंतु नुसतीच साठवण करून प्रश्न सुटत नाही. या साठवणीचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. यालाच इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट असे म्हटले जाते. साठवणीचे व्यवस्थापन म्हणजेच इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट. याचे उद्देश म्हणजे, वस्तूंचा साठा एका ठरावीक मर्यादेपलीकडे जाऊ न देणे (ओव्हरस्टॉकिंग), तसेच तो ठरावीक मर्यादेपेक्षा खाली न येऊ देणे (अंडर स्टॉकिंग), साठवणीचा खर्च मर्यादित करणे, वस्तूंचे योग्य ते संरक्षण करणे आणि ज्या वेळी मागणी असेल त्या वेळी वस्तू उपलब्ध करून देणे, पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी, उत्पादित वस्तू की ज्या विक्रीस तयार आहेत, कच्चा माल आणि संस्थेला लागणाऱ्या इतर दैनंदिन वस्तू यांच्या साठय़ाचे व्यवस्थापन करणे ही मोठी जबाबदारीची बाब आहे. यासाठी वेगवेगळी तंत्रे, उदा. (ए.बी.सी., अॅनालेसिस, साठय़ाची जास्तीत जास्त संख्या (मॅक्झिमम लेव्हल) व कमीत कमी संस्था (मिनिमम लेव्हल) ठरवणे. इ. वापरावी लागतात. तसेच साठय़ाचे रेकॉर्ड व्यवस्थित, बिनचूक आणि योग्य जागी ठेवणे हेसुद्धा एक महत्त्वाचे काम आहे. रेकॉर्डवर असलेली साठय़ाची संख्या व प्रत्यक्षात असलेली संख्या यांची वेळोवेळी तपासणी करून, काही गैरप्रकार किंवा चुका होत नाहीत ना याचीही खबरदारी घ्यावी लागते. या दृष्टीने इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा विषय महत्त्वाचा ठरतो.
वरील महत्त्वाच्या विषयांव्यतिरिक्त इतर तितक्याच महत्त्वाच्या विषयांचासुद्धा समावेश या स्पेशलायझेशनमध्ये होतो. यामध्ये पुरवठी साखळी ही पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक कशी होईल याचा विचार होतो. यादृष्टीने पुरवठा साखळीचा पर्यावरणावर काय परिणाम होतो याचा विचार केला जातो. तसेच ज्याला आपण वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो ते कशा पद्धतीने केले जाते किंवा करता येईल याचाही अभ्यास होतो. याबरोबरच स्ट्रॅटेजिक सप्लाय चेन मॅनेजमेंट यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये सप्लाय चेन ही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कशा पद्धतीने कार्यक्षम करता येईल याचा विचार केला जातो. आजकाल माहिती तंत्रज्ञानामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे शक्य झाले आहे. तसेच निर्णय घेण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम कशी करता येईल, याचा अभ्यासही करता येतो.
सारांश, पुरवठा साखळी व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे स्पेशलायझेशन आहे. मात्र चांगली करिअर करण्यासाठी, प्रत्येक विषयाचा मुळापासून अभ्यास व प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना येण्यासाठी केस स्टडीचा वापर हे आवश्यक आहे.
nmvechalekar@yahoo.co.in
पुरवठा साखळी व्यवस्थापन
आज पुरवठा साखळी व्यवस्थापनाला मोठे महत्त्व आले आहे. एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांमध्ये अभ्यासाव्या लागणाऱ्या ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या स्पेशलायझेशनच्या अभ्यासक्रमाविषयी
आणखी वाचा
First published on: 30-09-2013 at 07:01 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About supply chain management studies