ए म.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांमध्ये विशेषीकरणाचे (स्पेशलायझेशन) जे विविध पर्याय उपलब्ध असतात, त्यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन (हय़ूमन रिसोर्स मॅनेजमेंट) किंवा मनुष्यबळ व विकास (हय़ूमन रिसोर्स डेव्हलपमेंट) हा एक पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येक संस्थेमध्ये, मग ती निव्वळ व्यापारी तत्त्वावर चालणारी असो की स्वयंसेवी संस्था असो. संस्थेतील मनुष्यबळाचे, म्हणजेच असलेल्या कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन आणि विकास याची गरज नेहमीच भासते. संस्थेचे यश तिच्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. संस्थेतील मनुष्यबळ विकास या विभागातर्फे कर्मचाऱ्यांची भरती तसेच त्यांचे प्रशिक्षण, कामामध्ये त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता, कर्मचारी- व्यवस्थापन यामधील संबंध आदी अनेक प्रकारची कामे पार पाडली जातात. तसेच योग्य त्या  प्रसंगी शिस्तभंगाची कारवाई करणे, प्रसंगी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणे अशी अप्रिय कामेसुद्धा करावी लागतात. यामुळे मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयामध्ये या अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त कामगारविषयक कायदे या विषयाचासुद्धा समावेश होतो. मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयामध्ये विशेषीकरण पूर्ण केल्यानंतर वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र यासाठी विषयांशी संबंधित सर्व बाबींचे सखोल वाचन तसेच विश्लेषणात्मक क्षमता ही आवश्यक आहे. तसेच अत्यावश्यक असलेली चालू घडामोडींविषयीची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी वृत्तपत्र व वेगवेगळी नियतकालिके यांचे वाचन करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये एम.बी.ए. पूर्ण केल्यानंतर काही वर्षे नोकरीचा अनुभव घेऊन स्वत:ची सल्लागार संस्थासुद्धा काढणे शक्य आहे.
मटेरियल अँड प्रॉडक्शन मॅनेजमेंट हा विशेषीकरण करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मुख्यत: कच्च्या मालाचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच उत्पादन या महत्त्वाच्या घटकाचे व्यवस्थापन कसे करावे यासंबंधी माहिती देणारे विषय असतात. कच्च्या मालाच्या खरेदीपासून  त्याची साठवण (स्टोअरेज) आणि उत्पादनामध्ये त्याचा कार्यक्षम वापर करताना कोणकोणती काळजी घ्यावी यासंबंधीच्या वेगवेगळय़ा बाबी या अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे वस्तूंचे उत्पादन करताना यंत्रसामग्रीची रचना (प्लान्ट लेआऊट) तसेच दर्जा नियंत्रण इ. विषयसुद्धा शिकवले जातात. प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये पदवी असलेल्यांसाठी या विशेषीकरणाचा अधिक उपयोग होतो.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादा व्यवसाय करताना कोणती खबरदारी घ्यावी यादृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट) या विषयाची आखणी करण्यात आली आहे. या विशेषीकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवसायासाठी आवश्यक असणारे सर्व पैलू विचारात घेतलेले आहेत. म्हणजे व्यवस्थापनाचे जे विशेष विभाग आहेत या विषयांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे करायला पाहिजे हे शिकविले जाते. तसेच विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट), वित्तीय मॅनेजमेंट (फायनान्शियल मॅनेजमेंट) तसेच मनुष्यबळ व्यवस्थापन (हय़ूमन रिसोर्स मॅनेजमेंट) याशिवाय मटेरियल व प्रॉडक्शन मॅनेजमेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीने करावे याचाही अभ्यासक्रमामध्ये समावेश असतो. विविध देशांतील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन धोरणे कशी आखावीत याची कल्पना या अभ्यासातून येते. याशिवाय स्वत: पुढाकार घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्या कशा प्रकारे आपला व्यवसाय चालवतात आणि त्यांना काय अडचणी येतात व त्या कशा सोडवल्या जातात, याचा अभ्यास केल्यास त्याचा उपयोग होतो.
कॉम्प्युटर मॅनेजमेंट किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हासुद्धा पर्याय विशेषीकरणासाठी उपलब्ध आहे. हा विषय घेऊनसुद्धा वेगवेगळय़ा संस्थांमध्ये चांगले करीअर करता येते. मात्र या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानात होणारे बदल हे प्रचंड वेगाने होत असतात. यामुळे तंत्रज्ञानात सतत होणाऱ्या बदलाची माहिती करून घेण्यासाठी अतिशय जागरूक राहावे लागते. अन्यथा आपले ज्ञान हे कालबाहय़ ठरते. तसेच कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये वेगवेगळी सर्टिफिकेशन्स उपलब्ध आहेत. एम.बी.ए. करताना एखाद्या विषयाशी संबंधित सर्टिफिकेशन्स मिळवली तर त्याचा मोठय़ा प्रमाणावर फायदा होतो.
याशिवाय शेतीव्यवसाय व्यवस्थापन (अ‍ॅग्रिकल्चरल बिझिनेस मॅनेजमेंट) यामध्ये विशेषीकरण करता येते. परंपरागत शेतीमध्ये आधुनिक व्यवस्थापनाची तंत्रे वापरल्यास काय फायदा होतो याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग या क्षेत्रामध्येसुद्धा तज्ज्ञ व्यवस्थापकाची गरज आहे. त्यामुळे या विशेषीकरणाचासुद्धा करीअर करण्यासाठी फायदा होतो.
उद्योजकता विकास हा विशेषीकरणाचा विषय काही विद्यापीठांच्या एम.बी.ए. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. परंतु दुर्दैवाने हा विषय काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. एम.बी.ए. झाल्यानंतर नोकरीच केली पाहिजे असा एक गैरसमज बऱ्याच विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये आढळतो. तथापि, एम.बी.ए. झाल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करून त्यामध्ये चांगले करीअर करता येते ही वस्तुस्थिती आहे. मात्र यासाठी धोका पत्करण्याची तयारी, वेळेचे बंधन न ठेवता काम करणे, प्रसंगी तोटा सहन करण्याची तयारी, प्रामाणिकपणा, नकार पचविण्याची तयारी इ. गुणांची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे नोकरी करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून चाकोरीबाहेर काहीतरी करणे अशी तीव्र इच्छा असावी लागते. यशस्वी उद्योजकांची चरित्रे वाचल्यास त्यामधून स्फूर्ती मिळते. यादृष्टीने उद्योजकता विकास हासुद्धा एक चांगला पर्याय आहे.
विशेषीकरणाचे वेगवेगळे पर्याय बघितले असता असे म्हणता येईल की प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत. मात्र स्वत:चा कल समजून घेणे हे तेवढेच आवश्यक आहे. तसेच कोणतेही क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती करून घेणे, आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे व केवळ परीक्षेपुरता अभ्यास मर्यादित न ठेवता विषय मुळापासून समजून घेऊन अभ्यास करणे असा दृष्टिकोन ठेवल्यास यशस्वी होणे अवघड नाही.
यानंतर एम.बी.ए. अभ्यासक्रमातील एक प्रमुख घटक म्हणजे प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट) या विषयीची माहिती पुढील लेखात घेऊ.    

Story img Loader