MBAव्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर येनकेन प्रकारे पदवी मिळवण्यापेक्षा या कालावधीत भावी करिअरसाठी उपयुक्त ठरणारी कौशल्ये संपादन करण्याचे निश्चित करून त्यानुसार अभ्यास केला तरच व्यवस्थापनाची पदवी खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरू शकेल.
एमबीए अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षा दिल्यानंतर आणि हव्या त्या व्यवस्थापन संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच खरे आव्हान सुरू होते. हे आव्हान आपण कशा प्रकारे पेलू शकतो यावर आपले यश अवलंबून असते. एमबीए अभ्यासक्रम हा तसा फारसा कठीण नाही. तसेच वेगवेगळ्या विद्यापीठांचा एमबीए परीक्षेचा निकाल हा कॉस्ट अकौंटन्ट, चार्टर्ड अकौंटन्ट, कंपनी सेक्रेटरी यांसारख्या व्यावसायिक परीक्षेच्या निकालांपेक्षा खूपच चांगला लागतो. त्यामुळे नियोजनपूर्वक आणि मनापासून अभ्यास केल्यास परीक्षेत उत्तीर्ण होणे अवघड नाही. मात्र खरा कस लागतो तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीमध्ये अथवा स्वत:च्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्याची धडपड करताना! व्यवस्थापक म्हणून यशस्वी करिअर करायचे असेल किंवा यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर नुसतीच परीक्षा उत्तीर्ण होऊन चालत नाही. ‘एमबीए’ची केवळ पदवी मिळाली, म्हणून चांगली नोकरी मिळेल किंवा आपण स्वत:चा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकू असे नाही. यासाठी प्रत्येकाने एमबीए अभ्यासक्रमाची दोन वर्षे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहेत हे समजून घ्यायला हवे आणि या दोन वर्षांमध्ये आपण काय करणार याचे काटेकोर नियोजन करायला हवे. ही दोन वर्षे म्हणजे आपण एक प्रकारची गुंतवणूक करीत आहोत आणि या गुंतवणुकीवर चांगला परतावा (रिटर्न) मिळेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या दृष्टीने अभ्यासक्रम पूर्ण करताना काही कौशल्ये विकसित करणे नितांत गरजेचे आहे. दुर्दैवाने आज वर्गात उपस्थित न राहता फक्त परीक्षा देऊन एमबीए पूर्ण करण्याची घातक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते. अशा संस्थांपासून लांब राहिले पाहिजे. भावी करिअरवर अशा पद्धतीचा विपरित परिणाम होतो. शेवटी करिअर  आपल्याला करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी समजणे गरजेचे आहे.
यशस्वी करिअर करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रमाचे विषय मुळापासून समजून घेणे आणि केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता विषय समजून अभ्यास करणे. पहिल्या वर्षांमध्ये अनेक विषय अनिवार्य असतात. यापैकी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम ठरवताना काही उद्दिष्टे निश्चित केलेली असतात. ही उद्दिष्टे वाचून त्यानुसार आपली तयारी होते आहे किंवा नाही याचा सातत्याने आढावा घ्यायला हवा. उदा. मॅनेजमेंट अकौंटन्सी शिकताना या विषयाची उद्दिष्टे कोणती आहेत हे जाणून घेत त्यानुसार अभ्यास करावा.  या विषयाचे व्यवहारात काय महत्त्व आहे हेही पाहायला हवे. व्यवस्थापकीय अर्थशास्त्र (मॅनेजेरियल इकॉनॉमिक्स) या विषयाचा अभ्यासक्रम शिकताना त्यामधील वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर व्यवहारामध्ये कसा करता येईल याचाही विचार करावा. यासाठी या विषयांच्या प्राध्यापकांची मदत घेतली पाहिजे. मॅनेजमेंट अकौंन्टिंग तसेच संख्याशास्त्र यांचा अभ्यास करताना आणि या संबंधित वेगवेगळी उदाहरणे सोडवताना तर्कशुद्ध विचार (लॉजिकल थिंकिंग) करण्याची सवय आपोआप लागते. भावी करिअरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करताना गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी या तर्कशुद्ध विचारसरणीचा फायदा होतो. अकौंटन्सीतील उदाहरणे सोडवताना त्याचे प्रेझेंटेशन कसे करायचे, बेरीज-वजाबाकी कॅल्क्युलेटर न वापरता कशी करावी याचीही तयारी होते. मात्र यासाठी तसा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी बाळगला पाहिजे.
वेगवेगळ्या विषयांच्या सविस्तर अभ्यासाने निर्णय घेण्याची क्षमता वाढवता येते. यामध्ये मॅनेजमेंट अकौंटन्सी, संख्याशास्त्र, मार्केटिंग अशा अनेक विषयांचा समावेश होतो. या विषयांमुळे तार्किक विचारक्षमता आणि निर्णय क्षमता अशा कौशल्यांमध्ये वाढ होते.
या दृष्टिकोनातून विचार केला असता प्रत्येक विषयाला अनेक पैलू आहेत हे लक्षात येईल. ऑर्गनायझेशनल बिहेवियर या विषयामधून संस्थेमध्ये काम करताना परस्परसंबंध कसे निर्माण करावेत आणि वाढवावेत याचे शिक्षण मिळते.  प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत कशी वेगळी असू शकते हेही समजते. बदलाचे व्यवस्थापन (चेंज मॅनेजमेंट), संघर्षांचे व्यवस्थापन (कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट) यासंबंधीही माहिती मिळते. संशोधनाच्या पद्धती (रिसर्च मेथॉडॉलॉजी) या विषयातून नवीन विषयांचे/ कल्पनांचे संशोधन कसे करावे तसेच याचा अहवाल कसा तयार करावा याचे प्रशिक्षण मिळते. मार्केटिंग विषयातून नवीन वस्तू/ सेवा यांची संकल्पना प्रत्यक्षात कशी आणावी हे समजते. प्रत्येक विषयाचा व्यवहारात उपयोग तर आहेच, पण स्वत:च्या जीवनामध्ये आणि करिअरमध्येसुद्धा त्याचा उपयोग होतो. आणखी एक उदाहरण द्यायचे म्हणजे वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट) विषय शिकल्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वित्तीय निर्णय कसे घ्यावेत, गुंतवणूक कशी करावी, त्यातील धोके व परतावा यांची सांगड कशी घालावी इत्यादी बाबी समजतात. त्यामुळे वित्तीय साक्षरता वाढून चुकीची गुंतवणूक करण्याचे धोके टाळता येतात.
सारांश, सर्व विषयांचे सारखेच महत्त्व असून त्यातील संकल्पना अतिशय उपयुक्त आहेत. या विषयांचा अभ्यास परीक्षेच्या आदल्या दिवशी एखादे गाईड वापरून करणे म्हणजे स्वत:चे नुकसान करून घेणे ठरेल. अशा पद्धतीने परीक्षा उत्तीर्ण होऊन एमबीए पदवी मिळवणे हे आता जरी विद्यार्थ्यांना सुखावह वाटले तरी पुढील आयुष्यात या वृत्तीचा अत्यंत विपरीत परिणाम होतो हे समजून घ्यायला हवे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपली मनोवृत्ती  बदलणे गरजेचे आहे.
आपले विचार इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे कौशल्य प्राप्त करण्याची संधी एमबीए अभ्यासक्रम  करताना मिळते. अनेक विद्यापीठांतील एमबीए अभ्यासक्रमात ‘संज्ञापन कौशल्ये’ (कम्युनिकेशन स्किल्स) हा विषय असतो, पण त्याचा अभ्यास परीक्षेच्या चौकटीतच राहतो. खरे तर ही कौशल्ये वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा. एखाद्या विषयावर पॉवर पॉइन्ट प्रेझेंटेशन प्रभावीपणे कसे करता येईल हे शिकता येते. पॉवर पॉइन्टच्या स्लाइडस् कशा तयार कराव्यात यापासून सुरुवात करता येते. याबाबत असा अनुभव आहे की, अनेक वेळा विद्यार्थी-विद्यार्थिनी पॉवर पॉइन्ट प्रेझेंटेशन करताना स्लाइडमध्ये इतका मजकूर लिहितात की तो त्यांना स्वत:लाच वाचता येत नाही. स्लाइडची रंगसंगती अशा प्रकारची असते की पहिल्या-दुसऱ्या रांगेतील लोकांनाही ती नीट दिसत नाही. हा सर्व सरावाचा भाग आहे. व्यवस्थापक म्हणून काम करताना अनेक वेळा प्रेझेंटेशन द्यावे लागते. त्याचा सराव या अभ्यासक्रमातून होतो. आपले लिखाण प्रभावी होण्यासाठीही प्रयत्न करायला हवा. लेखनकौशल्य हे अगदी परीक्षेचे पेपर लिहिण्यापासून कार्यालयीन अहवाल, मेमो, आदेश इत्यादी अनेक बाबतीत आवश्यक असते. याचा सराव हा विद्यार्थिदशेपासूनच करता येतो. उदा. संस्थेतील एखाद्या उपक्रमाची माहिती वृत्तपत्रांना देण्यासाठी बातमी तयार करणे, एखाद्या चांगल्या लेखाचा सारांश लिहिणे, एखाद्या सामाजिक घडामोडीवर आपले विचार मांडणे अशा अनेक पद्धतींनी सराव करता येतो. लेखनकौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी उत्तम वाचन आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग वाढवायला हवा. अभ्यासाची पुस्तके वाचण्याबरोबरच मातृभाषेतील तसेच इंग्रजीतील दर्जेदार लिखाणही आवर्जून वाचावे. अशा वाचनाने आपली भाषा समृद्ध होते आणि त्याचा उपयोग कळत-नकळत आपल्या लिखाणात तसेच आपले म्हणणे मांडताना होतो. म्हणून चाकोरी पलीकडचा विचार करणे गरजेचे आहे.
 nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

Story img Loader